घरसंपादकीयओपेडअक्षय आनंदाचा ठेवा!

अक्षय आनंदाचा ठेवा!

Subscribe

‘विविधतेतील एकता’ हे भारतीय परंपरांचे मुख्य वैशिष्ठ्य आहे. निरनिराळ्या प्रांतांत एकच परंपरा निरनिराळ्या पद्धतीने पुढे नेली जाते, परंतु या सर्व परंपरांच्या मुळाशी असणार्‍या श्रद्धा आणि त्याचा गाभा सगळीकडे समान असल्याचेच दिसून येते. सर्वसामान्य मराठी माणूससुद्धा संकटावर मात करून सतत जगण्यातला आनंद शोधत असतो. परंपरेने येणारे सण-उत्सव त्याची इम्युनिटी वाढवतात. सणातला उत्साह हाच त्याचा ऑक्सिजन असतो. यातूनच तो आपलं दुःख विसरून जगणं सुसह्य करत असतो. अक्षय्य तृतीयेचा सणदेखील असाच मराठी माणसाच्या इम्युनिटीसाठी बूस्टर डोसचं काम करत असतो. हा दिवस हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया म्हणजेच त्रेतायुगाच्या वर्षाचा पहिला दिवस म्हणूनही या दिवसाकडे पाहिले जाते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त मानला जात असल्याने हिंदू संस्कृतीमध्ये या दिवसाचे अनन्यसाधारण महत्व आहे. कोकणात या दिवसापासून शेतकरी पेरणी करतात. वसंतगौरीचा उत्सव चालतो. यालाच दोलोत्सव असेही म्हणतात. या उत्सवात स्त्रिया हळदीकुंकवाचा कार्यक्रम करतात. श्रीकृष्णाच्या मंदिरांमध्ये वसंतोत्सव साजरा होतो. खान्देशात या दिवसाला आखाजी म्हणतात. सासूरवाशिणीला माहेरचा अक्षय आनंद देणारी म्हणून अक्षय्य तृतीया ओळखली जाते. याविषयीची माहिती, परंपरा व खान्देशात आखाजीच्या प्रत्येक टप्प्यावर म्हटली जाणारी अहिराणी गाणी, याविषयीचा हा लेख...

धुळे, जळगाव, भुसावळ, नंदूरबार आणि नाशिक जिल्ह्याच्या सटाणा, कळवण, मालेगाव यांसारख्या काही भागात प्रामुख्याने अहिराणी ही बोलीभाषा आहे. अहिराणीत आखाजीविषयी अनेक गाणी आहेत. या गीतातून खान्देशातील संस्कृती, जनजनीवन, कुटुंब व्यवस्था, सासर-माहेर, नातेसंबंध यांचे असंख्य पदर उलगडून जातात. त्यामुळे आखाजी आणि गाणी यांचे अतूट समीकरण तयार झाले आहे. दरवर्षीची आखजी ही सासूरवाशिणीसाठी माहेरचा अक्षय आनंद देणारी असते.

अक्षय्य तृतीया हा त्रेतायुगाच्या वर्षाचा पहिला दिवस, म्हणून अहिराणी संस्कृतीत नव्या वर्षाची कालगणना आखाजीपासूनच होते. खानदेशात याच दिवशी शेतकर्‍यांकडून सालदाराची नेमणूक केली जाते. सासुरवाशिणी या दिवशी माहेरी येतात आणि झोक्याचा मनमुराद आनंद लुटतात. गवराईचा उत्सव व पितरांना ‘आगारी’ टाकायचा दिवस म्हणूनही आखाजीचे महत्त्व आहे. ‘आगारी’ म्हणजेच पितरांना ‘घास’ टाकायचा दिवस. स्वर्गातल्या पितरांचा ‘अक्षय आशीर्वाद’ ही संकल्पना अहिराणी संस्कृतीची. म्हणून हा सण अहिराणी संस्कृतीचा प्रमुख सण म्हणून ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी महत्वाचे मुहूर्त म्हणून धार्मिक परंपरेने या सणाला मान्यता दिली आहे.

- Advertisement -

आखाजीच्या निमित्ताने सर्वजण एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवत असतात. शेतकरी, शेतमजूर सुट्टी घेतात. सालदार म्हणून हातात पैसे खुळखुळत असतात. माहेरवाशिणी सासरचे व्याप-ताप विसरून माहेरी आलेल्या असतात. नोकरी-व्यवसायानिमित्त शहराकडे गेलेल्यांना गावाची ओढ लागलेली असते. सगळेजण एकत्र आल्याने झोके, गाणी, झिम्मा, फुगड्या-मन प्रसन्नतेने भरून जात असते.

द्वितीयेच्या दिवशी गावातील स्त्री वर्ग मिरवणुकीने कुंभाराकडे जाऊन पार्वतीची छानशी मूर्ती वाजत गाजत घेऊन येतात. घरातील कोनाड्यात तिची प्रतिष्ठापना करतात. गावातून जात असताना त्या पुरुष वेषात सजवलेल्या मुलीला वाजत गाजत नेतात. त्याला ‘मोगल’ म्हणतात. मोगल ही मुलगी पॅन्ट, शर्ट, हॅट, डोळ्यावर गॉगल, हातात उघडे पुस्तक अशा थाटात चालत असते. तिच्या डोक्यावर छत्री धरलेली असते, त्यावेळी तीला उद्देशून

- Advertisement -

अरे तू सुटबूटवाला मोगल,
मना घर येजो रे
तुले टाकस चंदन पाट,
मना घर येजो रे

तृतीयेच्या दिवशी अक्षय्यघट म्हणजे पाण्याची घागर भरली जाते. त्याच्यावर छोटं मातीचंच भांडं ठेवून त्यावरती खरबुज आणि दोन सांजोर्‍या, दोन आंबे ठेवतात. छोटं भांडं पितरांसाठी असतं. सकाळी उंबरठ्याचं औक्षण करत पूर्वजांचं स्मरण केलं जातं. उंबर्‍यावर कुंकवाचं एकेक बोट उमटवत एकेका पितराचे नाव उच्चारत त्यांना आमंत्रण दिलं जातं. दुपारी चुलीवर (आता गॅसवरच) ‘घास’ टाकतात. आमरस, पुरणपोळी, कटाची आमटी, भजी, कुरडई असा जोरदार बेत असतो.

घट पूजन झाल्यानंतर गावातल्या सगळ्या माहेरवाशिणी एकत्र येतात. एकमेकींची विचारपूस केली जाते. सुख-दुःखाच्या गप्पागोष्टी रंगतात, नंतर आमराईत झोका, झिम्मा, फुगड्यांचा जल्लोष सुरू होतो. या जल्लोषाला अहिराणी भाषेतल्या गाण्यांची साथ मिळते आणि त्या गाण्यातून सासरवाशीणींच्या मनोभावना व्यक्त होतात. यावेळी वैशाख वणव्याचं ऊन कितीही दाह पेरीत असलं तरी झाडांच्या शेंड्यांशी स्पर्धा करणारे झोके माहेरच्या शितल शिडकाव्याचा आनंद देतात आणि झोक्यांवर बसलेल्या सख्यांचा एका सुरातला आवाज आसमंतात पैंजणनादाचा शिडकावा करून जातो…

आथानी कैरी तथानी कैरी कैरी झोका खाय वं ।
कैरी तुटनी खडक फुटना झुयझुय पानी व्हायं वं ॥
झुयझुय पानी व्हाय तठे कसाना बाजार वं ॥
झुयझुय पानी व्हाय तठे बांगड्यास्ना बाजार वं ॥
माय माले बांगड्या ली ठेवजो, ली ठेवजो
बन्धुना हातमा दी ठेवजो ली ठेवजो ॥

झोके घेता घेता या माहेरवाशिणी आपल्या सासरी किती वैभव आहे, आपल्याला कसं सुख आहे, नवरा आपली किती काळजी घेतो हे गाण्यातून सांगताना म्हणते…

वाटवर हिरकनी खंदी वं माय
संकर राजानी खंदी वं माय
वाटवर जाई कोनी लाई वं माय
संकर राजानी लाई वं माय ॥

एखाद्या सखीच्या घरी तिला त्रास असतो, इतर सख्यांच्या घरचे कौतुक ती ऐकते, मात्र आपल्या मनातले दुःख ती आपल्या जिवलग मैत्रीणीच्या कानात कुजबुजते आणि आपल्या सासरची व्यथा मांडते.

आखाजीचा दुसरा दिवस गौरी विसर्जनाचा असतो. पाटावर आपापल्या घरातील गौराई घेऊन सामुदायिक गौराईची गाणी म्हणत नदीकाठी जातात. त्यावेळी नदीच्या दुसर्‍या काठावरील स्त्रियादेखील गौरी विसर्जनासाठी आलेल्या असतात. या दोन गावांमधील स्त्रियांमध्ये शिव्या देणे, गोटे मारणे अशा तर्‍हेची गौराई लढाई होते. सध्या ही प्रथा काळाच्या पडद्याआड लुप्त होत चालली आहे. त्यानंतर याच दिवशी गौराईला सासरी पाठविण्याची तयारी सुरू होते. लेकीला माहेराहून देण्यासाठी पापड, कुरड्या, शेवया, लोणचं अशा सामानाची बांधाबांध सुरू होते. तिला जे जे हवं ते ते देण्यासाठी आई-बापाची धावपळ सुरू असते. त्याचवेळी माहेरवाशीण लेक ही आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंची खरेदी करते. ही लगबगदेखील गीतातून व्यक्त होते…

काया घोडानी काय मन्ही गौराई
इन्हा प्रताप चालस ठाई ठाई
प्रताप कोन्या वाडी गेला
प्रताप शिंपी वाडी गेला
शिंपी उठला घाई घाई
साड्या काढल्या नवलाई
सोनार उठला घाई घाई
नवसर हार लयी येई
वाणी उठला घाई घाई
नारय लयी पयी पयी

आता वेळ येते ती मुलीला निरोप देण्याची. जड मनाने ती सासरी जाण्यास निघते. आता पुढची भेट ६ महिन्यांनी दिवाळीलाच होणार असते, तेव्हा आईला दिवाळीला घ्यायला लहान भावाला न पाठवता मोठ्या भावाला पाठविण्याची सूचना ती करते कारण रस्त्यात घनदाट आमराई आहे आणि तिथून येताना लहाण्याचा जीव घाबरतो म्हणून ती थोरला ‘मुर्‍हाळी’ पाठवण्यास सांगताना म्हणते….

आखाजी दिवायी सहा महिनानी लाम्हन
भाऊसे पाव्हन मझार दसरा जामिन
धाकला मुराई नको धाडजो माय बाई
आंबानी आमराई राघो मैनाना जीव भ्याई

गौराईला घ्यायला तिचा नवरा येतो. माहेरचा पाहुणचार घेऊन ती सासरी जायला निघते, सासरी निघताना पतीने तिच्यासाठी आणलेल्या रथाचे झोकदार वर्णन करते.

याच आखाजीच्या सणाची पितरांचे पूजन ही दुसरी बाजू. या दिवशी पितरांना तर्पण केल्यास त्यांच्या आत्म्याला शांती मिळते असे मानले जाते. मोसमातील आंबा तसेच माठातील पाणी, वाळा अशा गोष्टी पितरांना अर्पण केल्याशिवाय घरात खाल्ल्या जात नाहीत.पाण्याने भरलेला घट या दिवशी आवर्जून दान करतात. खान्देशामध्ये पितरांची पूजा करताना दोन पद्धतीने केली जाते. गेलेल्या व्यक्तीचे पहिले श्राद्ध असेल तर डेरगं वापरतात, तर एक वर्षापेक्षा जास्त काळ झालेला असेल तर घागर वापरतात. खरे तर डेरगं आणि घागर एकाच आकाराची मातीची भांडी असतात. फक्त डेरग्याला बाहेरून तैलरंग दिलेले असतात.

या डेरगं अथवा घागरीत पाणी भरून त्यावर पाण्याने भरलेले मातीचे घट ठेवतात. या मातीच्या घटांना कडांवर सुताचे पाच वेढे गुंडाळले जातात. आधीच उगवून ठेवलेल्या गव्हाच्या हिरव्या पिवळ्या रोपांचे जुडगे दोरा गुंडाळून त्यावर उभे करतात. घागर मातीच्या चार ढेकळांवर ठेवली जाते. या सर्वांच्या वर सांजोरी व इतर पदार्थांचे पान ठेवतात. याच दिवशी अग्नीलासुद्धा नैवेद्य अर्पण करतात. याला ‘आगरी टाकणे’ असे म्हणतात. याशिवाय एका द्रोणात खीर कानोले अथवा आमरस वा इतर गोड पदार्थ घालून ब्राह्मणाला दान दिल्यास पितरांचा आत्मा तृप्त होतो अशी मान्यता आहे. गंगास्नानालादेखील या दिवशी महत्त्व असते.

संस्कारांची रुजवण करणारा उत्सव
या सणाला घराघरात अविवाहित मुली गौराईची अर्थात पार्वतीची पूजा करतात. या निमित्ताने शंकराचीही पूजा होते. शंकर-पार्वतीला घ्यायला येतात व पार्वती त्यांच्यासोबत सासरी जाते. ही गौराई लाकडाची घडवलेली असते. तिला सांजोर्‍या,पापड्या, मिठाई, शेव, काजू, बदाम, किसमिस यांच्या माळा तयार करून सजवतात. यातून लेकीच्या शृंगाराचं कौतुकाचे दर्शन होते. माहेर कितीही श्रीमंत असलं तरी सासरी जावेच लागते हा संस्कार मिळतो.

गवराई ही निर्मळ आनंद देणारी उत्सवदेवता आहे. हा सण खानदेशच्या सुजाण संस्कृतीचं प्रतीक आहे. समूहमनाच्या उत्कट आविष्काराचा उत्सव आणि सासुरवाशिणींसाठी सोनियाचा दिन आहे. या दिवशी सासुरवाशिणीला माहेरी यावंच लागतं हा रिवाज आहे आणि हा रिवाज म्हणजेच माहेरचा साज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -