घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ते मोहमदिरा भुलले । विषयविखें घारले । अज्ञानपंकीं बुडाले । निभ्रांत मानीं ॥
ते मोहरूपी मद्यपान करून भुललेले, विषयरूप विषाने व्यापलेले आणि अज्ञानरूपी चिखलात रुतलेले आहेत, असे निःसंशय समज.
देखैं शवाच्या हातीं दिधलें । जैसें रत्न कां वायां गेलें । नातरी जात्यंधा पाहलें । प्रमाण नोहे ॥
पहा की, प्रेताच्या हाती दिलेले रत्न जसे वाया जाते किंवा जन्मांधाला उजाडले तरी त्या प्रकाशाचा जसा काही उपयोग होत नाही,
कां चंद्राचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा । मूर्खा विवेकु हा तैसा । रुचेल ना ॥
अथवा चंद्रप्रकाश ज्याप्रमाणे कावळ्याच्या उपयोगी पडत नाही, त्याचप्रमाणे जे मूर्ख आहेत त्यांना हा विचार रुचत नाही.
तैसे जे पार्था । विमुख या परमार्था । तयांसी संभाषण सर्वथा करावेना ॥
तसेच पार्था, जे जन या परमार्थापासून पराङ्मुख आहेत, त्यांच्याशी भाषणसुद्धा करू नये.
म्हणौनि ते न मानिती । आणि निंदाही करूं लागती । सांगैं पतंग काय साहती । प्रकाशातें ॥
कारण ज्याप्रमाणे पतंग दिव्याचा मत्सर करितात, त्याप्रमाणे ते जन त्या विचारावर भरवसा न ठेविता उलट त्यांची निंदा करतात.
पतंगा दीपीं आलिंगन । तेथ त्यासी अचुक मरण । तेवीं विषयाचरण आत्मघाता ॥
पतंगाने दिव्याला आलिंगन दिले असता तेथेच त्याचे जसे बिनचुक मरण आहे, तसे विषयाचरण करण्यातच आत्मघात आहे.
म्हणौनि इंद्रियें एकें । जाणतेनि पुरुखें । लाळावीं ना कौतुकें । आदिकरुनी ॥
म्हणून कोणी विचारवान मनुष्याने या इंद्रियांच्या कौतुकानेदेखील लाड पुरवू नयेत.
हां गा सर्पेंसी खेळों येईल? । कीं व्याघ्रसंसर्ग सिद्धी जाईल? । सांगैं हाळाहाळ जिरेल । सेविलिया काई? ॥
अरे असे पहा, सर्पाबरोबर खेळता येईल का? किंवा वाघाचा सहवास सिद्धीस जाईल का? अथवा हलाहल विष प्राशन केले तर ते जिरले का, सांग पाहू?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -