घरमहाराष्ट्रनाशिकमालेगाव - महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर प्राणघातक हल्ला

मालेगाव – महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर प्राणघातक हल्ला

Subscribe

मालेगाव येथील जाफरनगर भागात पालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर परिसरातील लोकांनी त्याचा निषेध केला आहे.

मालेगाव येथील जाफरनगर भागात काल रविवार (दि.१३) रोजी मध्यरात्री येथील महापालिकेचे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता मोहम्मद अन्सारी बद्रूद्दोजा (५०) यांचेवर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मोहम्मद यांना तातडीने नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मनपा कर्मचाऱ्यावरील हल्ल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली होती. या हल्ल्याच्या निषेधार्थ सोमवारी महापालिका कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारले होते. शहरातील प्रभाग ३ व ४ मधील पाणीपुरवठा विभागात मोहम्मद हे कनिष्ठ अभियंता म्हणून काम पाहतात. रविवारी मध्यरात्री मोहम्मद हे जाफरनगर परिसरातील इक्बाल हॉटेल परिसरात बसलेले असतांना त्यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याने ते गंभीर जखमी झालेत. त्यांच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत असल्याने त्यांना तत्काळ उपचारासाठी येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर जखम गंभीर असल्याने त्यांना नाशिक येथील एका खाजगी रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी हलवण्यात आले असून सोमवारी त्यांच्यावर तेथे उपचार सुरु होते. कनिष्ठ अभियंते मोहम्मद यांच्यावरील हल्ल्यानंतर येथील पवारवाडी पोलीस ठाण्यात हॉटेल चालक मोह. युसुफ अली अबकर यांच्या फिर्यादीवरून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पवारवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हल्ल्याचा निषेध

मोहम्मद यांच्यावरील हल्ल्याचा महापौर शेख रशीद यांनी तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हेगारास पोलीस प्रशासनाने अटक करावी. अशी मागणी महापौर शेख यांनी केली आहे. महापालिका कर्मचा-यांवर हल्ला होणे ही अत्यंत गंभीर घटना असून असे हल्ले होणे दुर्दैवी आहे. या आधी देखील असे हल्ले झाले आहेत परंतु रविवारी रात्री झालेला हल्ला प्राणघातक होता. शहरातील अतिक्रमण हटवणे, अनधिकृत नळ जोडणी तोडणे अशा कारवाई दरम्यान महापालिका कर्मचारी व अधिकाऱ्यांवर वारंवार असे हल्ले होत असतात. नगरसेवक व लोकप्रतिनिधींनी अनधिकृत नळजोडणी होणार नाही याची दक्षता घ्यावी असे आवाहन शेख यांनी केले आहे. आयुक्त किशोर बोर्डे यांनी देखील या हल्ल्याचा निषेध करीत पोलीस प्रशासनाकडे कठोर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -