नेहमीच वेगळ्या भूमिका साकारून बॉलीवूडची ‘क्वीन’ बनलेली कंगना रानौत आता लवकरच कबड्डी खेळण्यासाठी सज्ज होत आहे. दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारीच्या आगामी चित्रपटामध्ये एका कबड्डी खेळाडूची भूमिका कंगना साकारणार असल्याची माहिती आहे.
सध्या ‘मेंटल है क्या’चं चित्रीकरण
कंगना सध्या ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाचं चित्रीकरण सुरु आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण संपल्यानंतर कंगना या नव्या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. त्याशिवाय ‘मणिकर्णिका – द क्वीन ऑफ झांसी’ या बहुचर्चित चित्रपटाचं पोस्ट प्रॉडक्शन सध्या सुरू असल्यामुळे कंगना यामध्ये व्यस्त आहे. हे सर्व संपल्यानंतर ऑगस्टमधील १५ दिवस कबड्डी या खेळाबद्दल जाणून घेण्यासाठी कंगना कार्यशाळेत जाईल आणि चित्रपटाची पुढील तयारी सुरु करेल, अशीही माहिती मिळाली आहे.
चित्रपटासाठी घेणार योगाचा आधार
या चित्रपटासाठी कंगना विशिष्ट मेहनत घेणार असून, कबड्डीचा अभ्यास करतानाच योगाचा देखील आधार घेणार आहे. कबड्डी खेळताना श्वासावर नियंत्रण लागतं. त्यासाठी योगामुळे चित्रपटाच्या चित्रीकरणात त्याचा अधिक फायदा होईल, असं कंगनाला वाटत आहे. तसंच कंगनाला प्रशिक्षण देण्यासाठी खऱ्या कबड्डी खेळाडूला नेमण्यात येणार असल्याचं दिग्दर्शक अश्विनी अय्यर तिवारीनं सांगितलं आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कंगनाला आपल्या शरीरयष्टीमध्ये बराच बदल करावा लागणार आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण ऑगस्टनंतर सुरु होण्याची शक्यता आहे.
यापूर्वी भूमिकेसाठी ‘या’ अभिनेत्री झाल्या होत्या फिटनेस फ्रीक
‘मेरी कॉम्स’ चित्रपटासाठी प्रियांका चोप्रानं फिटनेस जपला होता. मेरी कॉमसारखं शरीर पिळदार होण्यासाठी तिनं व्यवस्थित व्यायाम केला होता. तर ‘दंगल’साठी फातिमा सना शेख आणि सनाया मल्होत्रानंदेखील फोगट भगिनीप्रमाणं कुस्तीसाठी लागणारं शरीर कमावलं होतं. याव्यतिरिक्त ‘धूम ३’ आणि ‘टायगर जिंदा है’साठी कतरिनानं फिटनेस जपत आपली एक वेगळी बाजू प्रेक्षकांसमोर आणली होती. आता यामध्ये चित्रपटातील भूमिकेसाठी फिटनेस फ्रीकच्या यादीमध्ये कंगनाचादेखील समावेश होत आहे.