घरUncategorizedचक्रीवादळाने महाराष्ट्राचा पाऊस पळवला

चक्रीवादळाने महाराष्ट्राचा पाऊस पळवला

Subscribe

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचा वेग हा अपेक्षेनुसार होता. मात्र अचानक उद्बवलेल्या चक्रीवादळाने मान्सूनच्या सरळ रेषेत व्यत्यय आणला. पुढचे काही दिवस कोरडे राहण्याची शक्यता असल्याने घामाच्या धारा नशिबी येणार आहेत.

बंगालच्या उपसागरात उत्तर-पूर्वेकडे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तयार झालेल्या चक्रीवादळाने महाराष्ट्राचा पाऊस पळवला आहे. महाराष्ट्रातून गायब झालेला पाऊस आसाम, त्रिपुरा, मणिपूर भागात प्रचंड बरसला. त्यामुळे तेथे पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे.

फक्त तळकोकणातच मान्सूनची हजेरी

मान्सूनचे वेळेआधी आगमन झाल्याने शेतकरी वर्गासह चाकरमान्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तशी झलकही वरुणराजाने दाखवली होती. जूनच्या पहिल्या आठवड्यात बरसलेला पाऊस ८ जूनपासून धो धो कोसळणार असा हवामान खात्याचा अंदाज होता. मात्र, तळकोकणात बरसलेल्या जोरदार पावसाचा अपवाद वगळता गेला आठवडाभर महाराष्ट्र कोरडाच राहिला आहे.

- Advertisement -

अजून काही दिवस घामाच्या धारा

हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सूनचा वेग हा अपेक्षेनुसारच होता. मात्र अचानक उद्भवलेल्या चक्रीवादळाने मान्सूनच्या सरळ रेषेत व्यत्यय आणला. पुढचे काही दिवस कोरडे राहण्याची शक्यता असल्याने घामाच्या धारा नशिबी येणार आहेत.
विशेष म्हणजे देशभरातील काही भागांत अजून मान्सूनने हजेरी लावलेली नाही. मात्र, उत्तर-पूर्व भागातील आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर राज्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पूरस्थितीमुळे येथील नागरिकांचे जीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून अनेक भागांत पाणी साचले आहे.

पूर्वांचलात मुसळधार

आसाममधील लमडिंग-बादरपूर हिल स्टेशन परिसरात मुसळधार पाऊस पडल्याने या ठिकाणी भूस्खलन झाले आहे. यामुळे येथील ४ ट्रेन रद्द करण्यात आल्या आहेत. यासह येथील लोकल सेवेवरसुद्धा परिणाम झाला आहे. रेल्वेसेवा हळूहळू पूर्वपदावर आणण्याचा प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहे. हवामान विभागाने त्रिपुरा आणि दक्षिण आसाममधील अनेक भागांत येत्या ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे. आसाममधील गोलाघाट, कारबी अंगलोंग ईस्ट, कारबी अंगलोंग वेस्ट, विश्वनाथ, करीगंज आणि हैलाकांडी भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -