घरमुंबईपवई तलाव परिसर गुन्हेगारांचा अड्डा

पवई तलाव परिसर गुन्हेगारांचा अड्डा

Subscribe

 दिवसेंदिवस सर्रास गुन्हेगारीच्या घटना

सुशोभीकरण करून नागरिकांना फिरण्यासाठी तयार करण्यात आलेला पवई तलाव परिसर असुरक्षित बनत चालला आहे. या ठिकाणी दारुडे, गर्दुल्ले यांच्याकडून लूटमार, महिलांची छेडछाड यांसारखे गुन्हे सर्रासपणे घडत आहे. महिन्याभरापूर्वीच या ठिकाणी एका विवाहितेवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना ताजी असताना गुरुवारी रात्री तलाव परिसरात एका तरुणावर धारदार हत्याराने जीवघेणा हल्ला कऱण्यात आला आहे. या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाला राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तलाव परिसरात एकांत मिळावा म्हणून येणार्‍या सामान्य नागरिक तसेच प्रेमीयुगलांमध्ये या घटनेमुळे भीतीचे वातवरण पसरले आहे. या हल्ल्याप्रकरणी पवई पोलिसांनी एकाला अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

रोहित भावधाने (२२) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. रोहित हा वाशी येथे राहण्यास असून ठाणे येथे एका कंपनीच्या कार्यालयात नोकरी करतो. गुरुवारी रात्री रोहित हा आपल्या आतेभावाला सोडवण्यासाठी पवई येथे मोटारसायकलवरून आला होता. दोघे जण पवई तलाव परिसरात गप्पा मारत उभे होते. त्यावेळी चार जण त्या ठिकाणी आले. त्यापैकी एकाने दारूच्या नशेत त्यांच्यासोबत शुल्लक वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद विकोपाला जाऊन दारूच्या नशेत असणार्‍या एकाने स्वतःजवळ असणार्‍या चाकूच्या पात्यासारखे दिसणार्‍या शस्त्राने रोहितच्या पोटात वार करून चौघांनी तेथून पळ काढला. या हल्ल्यात जखमी झालेल्या रोहितला त्याच्या आतेभावाने इतर नागरिकांच्या मदतीने रिक्षात बसवून राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. या घटनेची माहिती मिळताच पवई पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन रोहितचा जबाब नोंदवून चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी एकाला अटक करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -