घरताज्या घडामोडीनिवडणुका आल्या, राजकीय गप्पांचे जमू लागले फड !

निवडणुका आल्या, राजकीय गप्पांचे जमू लागले फड !

Subscribe

जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या ३ महिन्यांवर आल्या आहेत.

येत्या काही दिवसांतच निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर होण्याच्या शक्यतेने येथे चहाच्या टपर्‍यांवर, हॉटेलमध्ये ग्रामीण भागातून आलेल्या विविध राजकीय पक्ष कार्यकर्त्यांच्या गप्पांचा फड जमू लागला असून, अंदाजांवार आतापासूनच पैजा सुरू झाल्या आहेत.जिल्हा परिषद, तालुका पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या ३ महिन्यांवर आल्या असल्याने राजकीय घडामोडी वाढू लागल्या असून, पक्षांतर सोहळेही उदंड झाले आहेत. प्रत्येक पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली असून, इच्छुकही तिकिटासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या महाआघाडीमुळे राज्य पातळीवर तुझ्याविना जमेना, तुझ्यावाचून राहावेना अशी परिस्थिती असली तरी स्थानिक पातळीवर हेच पक्ष एकमेकांना पाण्यात पहात असल्यामुळे गप्पांच्या मैफलीला मोठे खाद्य मिळत आहे. यातून विविध अंदाज, आडाखे बांधले जात असून, आपले मत दुसर्‍याला पटविण्यासाठी उच्चरवात चर्चा सुरू असते. ही चर्चा इतरांसाठी मात्र करमणूक ठरत आहे.

पोलादपूर तालुक्यात देवळे आणी लोहारे जिल्हा परिषद गटाच्या दोन जागा, तर लोहारे, कोंढवी, गोवेले, देवळे या पंचायत समिती गणाच्या ४ जागा आहेत. यापैकी शेकाप पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या युतीने कोंढवी, देवळे आणि गोवेले गणाच्या ३ जागा आणि देवळे गटाची जागा जिंकली. तर सेनेने लोहारे गट आणि गणाची प्रत्येकी एक जागा जिंकली आहे. त्यामुळे सध्या सेना आणि शेकापकडे जिल्हा परिषदेची प्रत्येकी एक आणि पंचायत समितीच्या २ जागा काँग्रेसकडे आणि शेकापकडे एक जागा आहे.

- Advertisement -

४२ ग्रामपंचायतींपैकी धामणदेवी, कुडपण, ओंबळी, म्हाळुंगे, काटेतळी काँग्रेसकडे, तर राष्ट्रवादीकडे मोरसडे आणि शेकापकडे सडवली, बोरावळे आणि मोरगिरी आहे. उर्वरित ३७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेचे वर्चस्व आहे. असे असले तरी काही ग्रामपंचायतींमध्ये थेट सरपंच निवडीमुळे अन्य सदस्यांचे पाठबळ नसूनही अन्य पक्षांच्या ताब्यात या ग्रामपंचायती असून, १० वर्षांपासून पंचायत समितीवर काँग्रेस आणि शेकापचे वर्चस्व आहे. येत्या निवडणुकीत इतर पक्ष युती करतात किंवा नाही, हे स्पष्ट झाले नसले तरी शिवसेना स्वबळाचा नारा देण्याचे संकेत मिळत आहेत. सध्या सर्व पक्ष एकमेकांच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहेत.

       वार्ताहर – बबन शेलार

- Advertisement -

हे ही वाचा – नाशिकमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकलीचा मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -