घरताज्या घडामोडीसिरमच्या लसीचे वितरण प्रथम भारतात

सिरमच्या लसीचे वितरण प्रथम भारतात

Subscribe

अदर पुनावाला यांची घोषणा, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून कौतुक

कोरोनावरील लसीचे वितरण सर्वप्रथम भारतात होणार, अशी घोषणा सिरमचे मुख्याधिकारी अदर पुनावाला यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सिरम संस्थेला दिलेल्या भेटीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत पुनावाला बोलत होते. सिरममध्ये सुरू असलेल्या संशोधनातील लसीची चाचणी तिसर्‍या टप्प्यात आहे. लसींच्या साठवणुकीसाठी आपल्याकडे पुरेशी आणि सक्षम व्यवस्था असल्याचे पुनावाला यांनी सांगितले. संपूर्ण भारतात या लसींचे किती डोस लागणार याबाबत लेखी स्वरूपात भारत सरकारने अद्याप काहीही सांगितलेले नसले तरी सिरमने जुलै २०२१ पर्यंत ३० ते ४० कोटी लस उत्पादित करण्याचे लक्ष्य ठेवले आहे, असे पुनावाला यांनी नमूद केले. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरमच्या प्रयत्नांचे मनापासून कौतुक केले.

लसींबाबत देशाचे आरोग्य मंत्रालय अंतिम निर्णय घेईल. एकदा त्यावर शिक्कामोर्तब झाले की सर्वप्रथम या लसींचे वितरण भारतात करण्यात येईल, असे पुनावाला म्हणाले. भारतात लसीचे वितरण झाल्यावर कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका बसलेल्या देशांत लसपुरवठा केला जाईल. यात प्रामुख्याने आफ्रिकन देशांचा समावेश आहे.

- Advertisement -

ब्रिटनसह युरोपमध्ये लस वितरणाची जबाबदारी अ‍ॅस्ट्राझेनेका आणि ऑक्सफर्ड यांची असेल असे पुनावाला म्हणाले. कोविशिल्ड लसीचा आपत्कालीन स्थितीत वापर करण्यासाठी परवानगी मिळावी म्हणून आम्ही पुढील दोन आठवड्यांत अर्ज करणार आहोत. याबाबत आज पंतप्रधानांशीही चर्चा झाली, अशी मोठी माहिती अदर पुनावाला यांनी दिली.

एकाचवेळी अनेक लसींवर आमचे काम सुरू आहे. त्या सर्वांचाच तपशील आम्ही पंतप्रधानांना दिला. कोविशिल्ड ही लस करोना संसर्गावर अत्यंत प्रभावी असल्याचा दावाही पुनावाला यांनी केला. लसीकरण कशाप्रकारे करायचे याचा कृती आराखडा तयार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले, असे पुनावाला यांनी स्पष्ट केले. पंतप्रधानांसोबत कोरोनावरील लसींच्या किमतीबाबत कोणतीही चर्चा झाली नाही, असेही एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले.

- Advertisement -

लस पूर्णपणे सुरक्षित
सिरमची कोविशिल्ड लस पूर्णपणे सुरक्षित असल्याचा दावा पुनावाला यांनी केला आहे. ही लस घेतल्यानंतर शून्य टक्केही रुग्णांना रुग्णालयात जाण्याची गरज भासणार नाही. तसेच ६० टक्क्यांपर्यंत संसर्गाची तीव्रता कमी होईल. लस पुरवठा आणि कोल्ड स्टोरेजसाठी पुरेशा सुविधा उपलब्ध आहेत. त्याशिवाय जानेवारीनंतर दरमहा ५ ते ६ कोटी लस उत्पादनाची क्षमता तयार होईल, असेही अदर पुनावाला यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -