घरताज्या घडामोडीस्थायी समिती अध्यक्ष जाधव यांच्यावर कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप

स्थायी समिती अध्यक्ष जाधव यांच्यावर कंत्राटदाराला धमकावल्याचा आरोप

Subscribe

ऑडिओ क्लिप व्हायरल

भायखळा ‘ई’ वार्डातील कंत्राटकाम मागे घेण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, वार्डातील दोन अधिकारी यांनी माझ्या कर्मचार्‍यांना धमकावल्याचा खळबळजनक आरोप यश कॉर्पोरेशनचे भागीदार रमेश सोळंकी यांनी केला आहे. याप्रकरणी त्यांनी महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वार्डातील सहाय्यक आयुक्त आणि आग्रीपाडा पोलीस स्थानक यांच्याकडे 12 नोव्हेंबर रोजी लेखी स्वरूपात तक्रार केली आहे. तसेच, याप्रकरणी तातडीने संबंधितांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.

याप्रकरणी यशवंत जाधव आणि कंत्राटदाराचा संबंधित कर्मचारी सूरजप्रताप देवडा यांच्यातील धमकीवजा संभाषणाची ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. रमेश सोळंकी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या कंपनीला यशवंत जाधव यांच्या वार्डात 14 स्थापत्य कामे करण्यासाठी लघुत्तम देकार असल्याने टेंडर लागले होते. मात्र या वार्डातील दुय्यम अभियंता व सध्या प्रभारी सहाय्यक अभियंता मनस्वी तावडे आणि कनिष्ठ अभियंता राकेश सागाठिया यांनी, माझ्या कर्मचार्‍यांना तुम्ही काम मागे घ्या, या वार्डात कामे करू नका. अन्यथा तुम्हाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यात येईल, अशी धमकी दिल्याचा आरोप केला आहे. तसेच, यशवंत जाधव , तावडे आणि सागाठिया हे त्रिकुट आपल्या मर्जीतील कंत्राटदारालाच कामे देण्यास इच्छुक असून इतर कंत्रादारांना धमकावत आहेत, अशी तक्रार सोळंकी यांनी केली आहे.

- Advertisement -

आमच्या कंपनीला कंत्राट मिळाले असतानाही वर्क ऑर्डर देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने कंपनीचे आर्थिक नुकसान होत असल्याचे सोळंकी यांनी लेखी तक्रारीत म्हटले आहे. माझ्या कर्मचार्‍यांच्या जीवितास काही बरे वाईट झाल्यास त्यास यशवंत जाधव व संबंधित पालिका अधिकारी जबाबदार राहतील, असे रमेश सोळंकी यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

ऑडिओ क्लिपमध्ये…
यशवंत जाधव यांनी, माझ्या वार्डात तुम्ही काम करू नका, जे काम लागले आहे ते मागे घ्या. मी प्रेमाने समजावत असताना तुम्ही समजून घेणार नसाल तर तुम्हाला प्रत्यक्ष भेटून मला समजवावे लागेल, अशी धमकीवजा भाषा वापरल्याचा आरोप कंत्राटदार सोळंकी यांनी केला आहे.

- Advertisement -

तुला माझ्या वार्डात काम करण्याची सिस्टीम माहिती नाही का, तू अगोदर ज्या ‘टी’ वार्डात काम करीत होतास तिथेच काम कर. आता माझ्या वार्डात हे काम मागे घे. तुला पुढे माझ्या वार्डात काम करायचे आहे ना? तू हे काम आज मागे घे इतर वार्डात कामे कर, असे यशवंत जाधव यांनी धमकावल्याचा आरोप कंत्राटदाराने केला आहे. कंत्राटदाराच्या कर्मचार्‍यांनी, सदर कंत्राटकाम रद्द करायला लावू नका, मी गरीब असून एवढे काम करू द्या, अशी विनंती वारंवार क्लिपमध्ये आहे.

स्थायी समिती अध्यक्षांनी राजीनामा द्यावा: भाजपची मागणी
हा सर्व प्रकार मुंबई महापालिकेच्या कामकाजाला काळीमा फासणारा आहे. आणि म्हणूनच स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी याची नैतिक जबाबदारी स्विकारुन स्थायी समिती अध्यक्ष पदाचा तातडीने राजीनामा द्यावा आणि या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी व्हावी, अशी मागणी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केली आहे.

षड्यंत्राचा पर्दाफाश करणार -: यशवंत जाधव
मी सदर कंत्राटदाराला कोणत्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. माझ्या वार्डात काम करणार्‍या कंत्राटदाराकडून मी केवळ कंत्राटकामाबद्दल माहिती घेतली. त्या कंत्रादाराचे यापूर्वीचे काम योग्य नाही. त्यामुळे मी त्याला काम न करण्याबाबत विनंती केली. मात्र मला या प्रकरणात जाणीवपूर्वक अडकविण्याचे, माझी व शिवसेनेची बदनामी करण्याचे मोठे षड्यंत्र कंत्राटदाराच्या मदतीने रचण्यात आले आहे, असे सांगत यशवंत जाधव यांनी त्यांच्यावर करण्यात आलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, या कंत्राटदाराने आतापर्यंत पालिकेत जी काही कामे केली आहेत, त्यांची चौकशी करण्यात यावी आणि त्याला काळ्या यादीत टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -