लडाखमध्ये लष्करी जवानांची बस नदीत कोसळली; 7 जवान मृत्यू

लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस (Bus Accident) नदीत कोसळल्याने 7 जवानांना (7 Indian Army soldiers) आपला प्राण गमवावा लागल्याची घटना लडाखमध्ये (Ladakh) घडली.

लष्कराच्या जवानांना घेऊन जाणारी बस (Bus Accident) नदीत कोसळल्याने 7 जवानांना (7 Indian Army soldiers) आपला प्राण गमवावा लागल्याची घटना लडाखमध्ये (Ladakh) घडली. या बसमध्ये एकूण 26 जवान होते. त्यापैकी 7 जवानांचा मृत्यू झाला असून, अनेक जवान जखमी असल्याची माहिती समोर येत आहे. या जखमी जवानांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात कोल्हापूर जिल्ह्यातील एका जवानाचा समावेश असल्याची माहिती समोर येतेय. प्रशांत जाधव असे या शहीद जवानाचे नाव आहे. ते गडहिंग्लज तालुक्यातील बसर्गे गावचे रहिवासी होते. प्रशांत जावध यांचे पार्थिव उद्या बेळगावमध्ये आणलं जाणार असल्याची माहिती लष्करी अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. साताऱ्याच्या खटाव तालुक्यातील विसापूरचे सुभेदार विजय सर्जेराव शिंदे हे देखील या अपघातात शहीद झाले आहेत.

ट्रांझिस्ट कॅम्पहून सब सेक्टर हनिफला जात असताना बसला अपघात झाला. मात्र, या बसचा अपघात कसा झाला, याची माहिती अद्याप अस्पष्ट आहे. तसेच, लष्कराकडूनही अपघाताबद्दलची अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, जवानांची बस श्योक नदीत कोसळली. बसमध्ये 26 जवान होते. ही बस 50 ते 60 फूट खोल कोसळल्याचे समजते. तसेच, जवळपास बसमधील सगळेच जवान जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी परतापूर येथील 403 फील्ड रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. शिवाय, सर्जिकल टीमला लेहहून परतापूरला पाठवण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या जवानांच्या मदतीसाठी हवाई दलाशी संपर्क करण्यात आला आहे. त्यांना उपचारांसाठी वेस्टर्न कमांडला पाठवले जाऊ शकते.

पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त

‘लडाखमधील बस दुर्घटनेमुळे आम्ही दुःखी झालो आहोत. ज्यात आम्ही आमचे शूर सैनिक गमावले आहेत. शोकाकुल कुटुंबांसोबत माझ्या संवेदना आहेत. मला आशा आहे की जे जखमी आहेत ते लवकरात लवकर बरे होतील. बाधितांना शक्य ती सर्व मदत केली जात आहे’, असं ट्वीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंहांकडून श्रद्धांजली अर्पण

‘लडाखमधील बस दुर्घटनेत आपल्या शूर जवानांना प्राण गमवावे लागले. त्याचे खूप दु:ख आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा आम्ही कधीही विसरणार नाही. शहीद जवानांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आहेत’. तसंच सिंह यांनी जमखी जवानन लवकरात लवकर बरे व्हावे अशा सदिच्छाही व्यक्त केल्या. सिंह म्हणाले की, मी लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांच्याशी बोललो. त्यांनी मला परिस्थितीची माहिती दिली आणि जखमी जवानांचे प्राण वाचवण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. जखमी जवानांना लष्कर सर्वतोपरी मदत करत आहे’, अशी माहिती संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली.


हेही वाचा – मोठी बातमी! हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना चार वर्षांची शिक्षा