Corona Vaccine: फायझरची लस घेतलेल्या अमेरिकेच्या आरोग्यसेवकाला कोरोनाची लागण

pfizer vaccine
Corona Vaccine: फायझर

संपूर्ण जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. आतापर्यंत जगातील १७ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे सध्या संपूर्ण जगाचे लक्ष कोरोनाच्या लसीकडे आहे. अनेक देशांमध्ये कोरोना लसीच्या लसीकरणाला सुरुवात झाली आहे. दरम्यान आता फायझरची लस घेतलेल्या अमेरिकेतल्या आरोग्यसेवकाला कोरोना लागण झाल्याचे समोर आले आहे. लसीचा डोस घेऊन आठवडा उलटताच आरोग्य सेवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या आरोग्य सेवकांने फेसबुकद्वारे ही धक्कादायक माहिती दिल्याने जगभरात एकच खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या एफडीएने ११ डिसेंबरला कोरोना लसीकरणासाठी परवानगी दिली होती. त्यानुसार १८ डिसेंबरला कॅलिफोर्नियामधील एका रुग्णालयातील आरोग्य सेवक मॅच्यु याला कोरोना लसीचा डोस देण्यात आला. कोरोनाचा डोस दिल्यानंतर साधारणातः पाच ते सहा दिवसांनी त्याला थंडी वाजू लागली, अंग भरून दुखायला लागले आणि ताप आला. त्यामुळे २४ तारखेला त्याने रुग्णालयात जाऊन कोरोना चाचणी केली. मग त्याच्यात कोरोना सदृश लक्षणे असल्यामुळे तो क्वारंटाईन झाला. ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच २६ डिसेंबरला त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

यासंदर्भात जेव्हा रुग्णालयातील प्रशासनाशी अमेरिकेतील माध्यमांनी माहिती घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी सांगितले की, फायझरने एफडीएला दिलेल्या माहितीनुसार, पहिला डोसाच्या यशाचा टक्का ५० टक्के असतो. त्यानंतर दुसऱ्या डोसामध्ये लसीच्या यशाचा टक्का ९५ टक्क्यांपर्यंत जातो. त्यामुळे पहिल्या डोस घेतल्यानंतर व्यक्तीला कोरोनाची लागण होणार नाही, याची शक्यता नाकारू शकत नाही.’ पण फायझरचा लसीमुळे सध्या चिंता वाढली आहे.


हेही वाचा – लसीकरणावर विश्वास ठेवा म्हणत कमला हॅरिस यांनी टोचून घेतली कोरोनाची लस