व्हायरस चीनला सोडेना; आता सापडला नवा विषाणू!

चीनच्या सुमारे ४.४ टक्के लोकांमध्ये आढळला नवा व्हायरस

प्रातिनिधीक फोटो

चीनमध्ये स्वाइन फ्लूचा एक नवीन प्रकार आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. ज्यामुळे शास्त्रज्ञ देखील हैराण झाले आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, हा नवीन फ्लू कोरोना विषाणूच्या साथीने ग्रस्त असलेल्या जगाला आणखी एक धक्का देऊ शकतो असे सांगण्यात येत आहे. अमेरिकन सायन्स जर्नल पीएनएएसमध्ये प्रसिद्ध झालेल्या संशोधकांच्या अहवालानुसार, नवीन स्वाइन फ्लू हा २००९ मध्ये जगभरात पसरलेल्या H1N1 स्वाइन फ्लूचा अनुवांशिक वंशज आहे, परंतु तो अधिक धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चीनमधील अनेक विद्यापीठ आणि चीनमधील रोग नियंत्रण व प्रतिबंधक केंद्रातील शास्त्रज्ञांनी असे म्हटले आहे की, हा नवीन स्वाइन फ्लू माणसांना मोठ्या प्रमाणात आजारी पाडू शकतो.

असे नाव आहे या नव्या फ्लूचे..

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, कोरोना साथीच्या काळात जर स्वाइन फ्लूचे नवीन संक्रमण पसरले तर लवकरच जगाला आणखी एका समस्येला सामोरे जावे लागेल, असे संशोधकांचे म्हणणे आहे. या नवीन स्वाइन फ्लूला जी ४ असे नाव देण्यात आले आहे. ते शोधण्यासाठी चिनी शास्त्रज्ञांनी २०११ ते २०१८ पर्यंत संशोधन केले आहे. वृत्तानुसार, या काळात शास्त्रज्ञांनी चीनच्या १० राज्यांतील ३० हजार डुकरांच्या नाकातून एक स्वॅब घेतले.

त्याच्या तपासणीदरम्यान, चीनमध्ये १७९ प्रकारचे स्वाइन फ्लू असल्याचे आढळले आहे. यापैकी जी ४ हा सर्व स्वाइन फ्लूपासून वेगळा करण्यात आला आणि त्याचा अभ्यास करताना असे आढळले की बहुतेक डुकरांना याचा संसर्ग झाला आहे.

नवा फ्लू २०१६ पासून डुकरांमध्ये आढळला आहे

अहवालानुसार, हा नवीन फ्लू २०१६ पासून डुकरांमध्ये दिसत आहे. संशोधनात असे दिसून आले आहे की नवीन स्वाइन फ्लू जी ४ माणसांना वेगवान आणि गंभीरपणे संक्रमित करू शकतो. हंगामी फ्लूमुळे कोणत्याही मनुष्याला जी ४ स्वाइन फ्लूपासून रोग प्रतिकारशक्ती मिळणार नाही आणि यामुळे कोणालाही भीतीदायक आजार होऊ शकतो, असेही अहवालात स्पष्ट झाले आहे.

शास्त्रज्ञांचा असा दावा आहे की, जी ४ चा संसर्ग चीनमधील डुकरांच्या फार्ममध्ये काम करणाऱ्या १० टक्के लोकांमध्ये आढळतो. अशा शास्त्रज्ञांनी अँटीबॉडीजची चाचणी केली आहे, ज्यानंतर जी ४ संसर्ग समोर आला आहे.

चीनच्या सुमारे ४.४ टक्के लोकांमध्ये नवा व्हायरस

चाचण्यांमधून असेही दिसून आले आहे की चीनच्या सुमारे ४.४ टक्के लोकांमध्ये जी ४ ची लागण झाली आहे, हा विषाणू डुकरांमधून माणसांमध्ये पसरला आहे. दरम्यान, एका माणसांद्वारे दूसऱ्या माणसांपर्यंत पोहोचण्याचा पुरावा मिळालेला नाही. चिनी शास्त्रज्ञांनी त्यांच्या अहवालात असे लिहिले आहे की, जी ४ माणसांमार्फत पसरल्यास एका धोकादायक साथीचे रूप घेऊ शकते, म्हणून डुक्कराचे संगोपन करणाऱ्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.


NASA Challenge: अंतराळात शौचालय बांधा, २६ लाख कमवा!