घरदेश-विदेशविमानापेक्षा रिक्षाप्रवास महाग - नागरी उड्डाणमंत्री जयंत सिन्हा

विमानापेक्षा रिक्षाप्रवास महाग – नागरी उड्डाणमंत्री जयंत सिन्हा

Subscribe

भारतामध्ये दळणवळण क्षेत्रात झपाट्याने क्रांती होत असून देशांतर्गत विमान प्रवासाचे भाडे कमी झाले आहे. त्यामुळे विमान प्रवास करणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे, असे प्रतिपादन नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी केले

विमानाचे तिकिटदर पाहून अनेकदा लोकांना धडकी भरते. एका शहरातून दुसऱ्या शहरात, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी विमानाचे दर पाहून लोक एस.टी किंवा ट्रेनने जाण्याला जास्त पसंती देतात. परंतु सध्या भारतात विमानापेक्षा रिक्षाप्रवास महाग असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी म्हटले आहे. सोमवारी उत्तर प्रदेशमधील गोरखपूर येथे सिन्हा बोलत होते. त्यांनी यावेळी विमान प्रवास आणि रिक्षाची तुलना केली. यावेळी त्यांनी विमानप्रवास रिक्षापेक्षा स्वस्त कसा आहे, याचे गणित मांडले. सिन्हा महणाले की, भारतातील अनेक विमान कंपन्यांनी त्यांचे तिकिटांचे दर कमी आले आहेत. त्यामुळे विमानप्रवास हा रिक्षा प्रवासापेक्षा स्वस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गोरखपूरमध्ये जयंत सिन्हा यांनी टर्मिनल भवनाचे उद्घाटन केले, यावेळी ते बोलत होते.

काय म्हणाले जयंत सिन्हा?

सिन्हा म्हणाले की, माझ्याकडे जी आकडेवारी आहे,त्यावरुन असे स्पष्ट होते की, देशातील विमान उड्डाण क्षेत्रात क्रांती होत आहे’. त्यानंतर सिन्हा म्हणाले की, ‘दोन व्यक्ती रिक्षाने प्रवास करत असतील, तर रिक्षावाले १० रुपये प्रति किलोमीटरच्या दराने प्रवास भाडे घेतात. याचाच अर्थ एका व्यक्तीला एक किलोमीटर प्रवासासाठी ५ रुपये इतका खर्च येतो. परंतु तुम्ही विमानाने प्रवास करत असाल, तर तुम्हाला एक किलोमीटर प्रवासासाठी फक्त ४ रुपये खर्च येतो. तसेच सिन्हा म्हणाले की, ‘विमान वाहतूक क्षेत्रात घडलेली क्रांती डोळ्यात भरणारी आहे. यामुळे प्रवासी वाहतूक अतिशय स्वस्त झाली आहे.

- Advertisement -

भाजपला श्रेय

सिन्हा म्हणाले की, भाजप सरकार येण्यापूर्वी भारतात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या ६ कोटी इतकी होती. गेल्या ४ वर्षात देशात दळणवळण क्षेत्रात झालेल्या क्रांतीमुळे हाच आकडा आता ११.५ कोटींच्याही पुढे गेला आहे. देशात ७५ विमानतळ होती. ती संख्या वाढवून आता १०० करण्यात आली आहे. विमानांच्या फेऱ्या वाढल्या आहेत. याचे उदाहरण देताना सिन्हा यांनी सांगितले की, झारखंडच्या रांची येथील विमानतळावर पूर्वी ८ ते १० विमाने येत होती. ती संख्या आता ३० वर पोहोचली आहे. त्यासोबतच आता अलाहाबाद, कानपूर, गोरखपूर या विभागांचाही वेगानं विस्तार केला जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -