लालू यादवांच्या कुटुंबाकडून 600 कोटींच्या संपत्तीचे पुरावे मिळाल्याचा ईडीचा दावा

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्ली : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शनिवारी सांगितले की लालू प्रसाद आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या विविध ठिकाणी छापे मारून एक कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय छाप्यांदरम्यान 600 कोटी रुपयांच्या गुन्ह्यांचा खुलासा झाल्याची माहिती ईडीने दिली. ईडीने माजी रेल्वे मंत्री लालू प्रसाद यांचे कुटुंब आणि त्यांच्या सहकाऱ्यांविरुद्ध जमीन-नोकरी प्रकरणाशी संबंधित मनी लाँड्रिंगच्या आरोपांची चौकशी करत असल्याचे स्पष्ट केले. ईडीने शुक्रवारी लालू प्रसाद यांचे पुत्र आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासह कुटुंबातील इतर सदस्यांशी संबंधित दिल्लीतील अनेक ठिकाणी छापे टाकले.

हेही वाचा – पुलवामा शहिदांच्या पत्नींची निदर्शने, राजस्थानमध्ये भाजपच्या आंदोलनावर पोलिसांचा लाठीचार्ज

20 हून अधिक ठिकाणांवर छापे
ईडीने लालू प्रसाद यादव यांच्या तीन मुली आणि राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) नेत्यांच्या निवासस्थानांसह 20 हून अधिक ठिकाणी छापे टाकले आहेत. ज्यात नोकरीच्या बदल्यात जमीन घोटाळ्याच्या प्रकरणातील मनी लाँड्रिंग चौकशीच्या संदर्भात आहे. लालूंचे समदी सपा नेते जितेंद्र यादव यांच्या गाझियाबाद येथील निवासस्थानावर ईडीने छापा टाकला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, छाप्यात 53 लाख रुपये रोख, युएसडी 1,900, 540 ग्रॅम सोने आणि 1.5 किलो सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. आरजेडी नेता मनोज झा यांनी आरोप केला आहे की, त्यांच्या पक्षाच्या नेत्यांवर छापेमारी ही गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये बिहारमधील सरकार बदलाची प्रतिक्रिया होती.

कारवाई कुठे करण्यात आली
ईडी अधिकाऱ्यांनी पटना, फुलवारीशरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची आणि मुंबई येथे बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यांच्या मुली रागिणी यादव, चंद्रा यादव, हेमा यादव आणि माजी आरजेडी आमदार अबू दोजाना यांच्या मालकीच्या जागेत कारवाई केली. याशिवाय लालूंचा धाकटा मुलगा आणि बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दक्षिण दिल्लीतील घरावरही छापा टाकण्यात आला. लालूंचे मेहुणे जितेंद्र यादव यांच्या गाझियाबाद येथील निवासस्थानावरही ईडीने कारवाई केली.

हेही वाचा – “ईडीला भाजप नेत्यांच्या घरचा रस्ता माहीत नाही…” कपिल सिब्बल यांची टीका