वडोदऱ्यातील केमिकल कंपनीमध्ये अग्नितांडव; सुदैवाने जीवितहानी नाही

गुजरात राज्यातील वडोदऱ्यामध्ये असलेल्या एका केमिकल कंपनीला शनिवारी रात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये कंपनीचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.

Fire breaks out in a chemical company in Vadodara

गुजरात राज्यात असलेल्या वडोदरा येथील एका केमिकल कंपनीला शनिवारी भीषण आग लागली. या घटनेनंतर आग वीजविण्यासाठी तात्काळ अग्निशनमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झालेली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीच जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री अचानक वडोदरा येथे असलेल्या एका केमिकल कंपनीमध्ये आग लागली. काही वेळातच या आगीने रौद्ररूप धारण केले. ही आग इतकी भीषण होती की आकाशामध्ये सर्वत्र या आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोळ दिसू लागले. दरम्यान, या घटनेनंतर काही वेळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. तसेच रात्रभर शर्थीचे प्रयत्न करून अग्निशमन दलाकडून या आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरु होते. परंतु, अद्यापही या आगीचे कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.

दरम्यान, महिन्याभरापूर्वीच गुजरातमध्ये एका कंपनीला भीषण आग लागली होती. सुरत येथे असलेल्या उधना भागामध्ये ही घटना घडली होती. एका कार शोरुमला अचानक आग लागली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या. त्या आगीचं कारण देखील स्पष्ट झालेलं नव्हतं.

गुजरातमध्ये गेल्या काही महिन्यात आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. गुजरातमध्ये सुरत, वडोदरा, अहमदाबाद, वापी या भागांमध्ये अनेक मोठमोठे कारखाने आहेत. या कारखान्यांना लागणाऱ्या आगीच्या प्रमाणात देखील वाढ झाली आहे. ज्यामुळे कारखान्यांच्या जवळ राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तर कारखान्यांना लागणाऱ्या आगीचे कारण देखील स्पष्ट होत नसल्याने नागरिकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. तर सरकारने या घटनांकडे लक्ष घालण्याची मागणी करण्यात येत आहे.


हेही वाचा – पुण्यात भाविकांच्या गाडीला भीषण अपघात; गाड्यांचा झाला चक्काचूर