फ्रान्सकडून राफेल विमानांची पहिली तुकडी भारताकडे झेपावली

अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि घातक बॉम्बनी सुसज्ज असलेले लढाऊ विमान 'राफेल'च्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण करत भारतात झेप घेतली आहे.

First five Rafale jets take off from France for India
फ्रान्सकडून राफेल विमानांची पहिली तुकडी भारताकडे झेपावली

अत्याधुनिक क्षेपणास्त्र आणि घातक बॉम्बनी सुसज्ज असलेले लढाऊ विमान ‘राफेल’च्या पहिल्या तुकडीने फ्रान्समधून उड्डाण करत भारतात झेप घेतली आहे. ही बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित राफेल फायटर विमाने बुधवारी २९ जुलै रोजी भारतात लँडिंग करतील. चीन आणि पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या राफेलचे भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात येणे ही अतिशय महत्त्वाची गोष्ट समजली जात आहे. विशेष म्हणजे राफेलने भारतासाठी उड्डाण घेण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय दूतावासाने राफेलची आणि भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांचे छायाचित्र ट्विट केले आहे.

राफेलची विमाने दोन दिवसांच्या प्रवासानंतर हरयाणामधील अंबाला येथील हवाई दलाच्या तळावर दाखल होणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार; आज फ्रान्समधील पाच ते सहा लढाऊ विमाने भारताकडे रवाना होणार आहेत. तसेच भारतात दाखल झाल्यानंतर या विमानांना एका आठवड्यातच ही लढाऊ विमाने कोणत्याही मोहिमेसाठी सुसज्ज करण्यात येणार आहेत. दरम्यान, २०१६ साली भारताने फ्रान्स सरकार बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदी करण्याचा ५९ हजार कोटींचा करार केला आहे.

प्रशिक्षण देण्यात आले

राफेल फायटर जेटच्या हाताळणीसाठी IAF चे बारा वैमानिक आणि इंजिनिअरींग क्रूला पूर्णपणे प्रशिक्षित करण्यात आले आहे. उड्डाणवस्थेत असतानाच या विमानांमध्ये इंधन भरण्यात येईल. तसेच अंबालामध्ये येण्यापूर्वी ही विमाने यूएईमधील फ्रेंच तळावर लँडींग करतील. सर्व काही नियोजनानुसार झाले, तर २० ऑगस्टला पारंपारिक पद्धतीने सोहळा आयोजित करुन या फायटर विमानांचा भारतीय हवाई दलात समावेश करण्यात येईल.

IAF च्या एअर क्रू आणि ग्राऊंड क्रू टीमला हे विमान कसे हाताळायचे, त्याबद्दल प्रशिक्षण देण्यात आले आहे. भारताने फ्रान्सबरोबर अशी ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. पूर्णपणे अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज विमाने फ्रान्सकडून भारताला देण्यात येतील. भारतात दाखल झाल्यानंतर लवकरात लवकर या विमानांचा वापर करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात येईल.

दरम्यान, भारताला मिळणारी राफेल फायटर विमाने मिटिओर आणि स्काल्प अशा मिसाइल्सनी सुसज्ज असतील. यामुळे शत्रूच्या प्रदेशात खोलवर अचूक हल्ला करण्याची भारतीय हवाई दलाची क्षमता कैकपटीने वाढणार आहे. तसेच हवाई वर्चस्व सुद्धा प्रस्थापित करता येईल. विशेष म्हणजे सध्या चीन आणि पाकिस्तानकडे राफेलच्या तोडीचे एकही विमान नाही.


हेही वाचा – ‘सुशांतच्या मृत्यूची CBI चौकशी करा’, खासदारांच्या पत्राला मोदींनी दिले उत्तर