घरताज्या घडामोडीJNU मधला हल्ला कुणी केला, हे अखेर समोर आलं!

JNU मधला हल्ला कुणी केला, हे अखेर समोर आलं!

Subscribe

जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी झालेल्या हल्ल्याची जबाबदारी हिंदू रक्षा दलाने घेतली आहे.

रविवारी म्हणजेच ५ जानेवारी रोजी संध्याकाळी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये काही विद्यार्थी आणि प्राध्यापकांवर अज्ञातांनी हल्ला केला होता. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने घडवून आणल्याचा आरोप विद्यार्थी संघटनेकडून करण्यात आला होता. मात्र, हा हल्ला हिंदू रक्षा दल या कट्टर उजव्या विचारसरणीच्या संघटनेकडून करण्यात आल्याचं आता समोर आलं आहे. या संघटनेचा अध्यक्ष म्हणवून घेणाऱ्या एका व्यक्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमध्ये ही व्यक्ती जेएनयूमधला हल्ला हिंदू रक्षा दलानेच केल्याचा दावा करत आहे. शिवाय, अशा प्रकारे जर कुणी आमच्या धर्माच्या विरोधात बोललं, तर त्याचेही हाल जेएनयूमधल्या त्या विद्यार्थ्यांप्रमाणेच होतील, असा इशारा देखील या व्यक्तीने दिला आहे.

‘जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी कृत्य’

या व्हिडिओमध्ये बोलणारी व्यक्ती भूपेंद्र तोमर उर्फ पिंकी चौधरी आहे. पिंकी चौधरी हा हिंदू रक्षा दलाचा नेता असून जेएनयूमध्ये राष्ट्रविरोधी आणि हिंदूविरोधी कृत्य होत असल्यामुळेच आपण हे पाऊल उचलल्याचा दावा तो व्हिडिओमध्ये करत आहे. ‘या सगळ्या प्रकाराची जबाबदारी आम्ही घेत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून जेएनयू कम्युनिस्टांचा अड्डा बनला आहे. असे अड्डे आम्ही सहन करणार नाही. यापुढे देखील अशा विद्यापीठांमध्ये अशा कारवाया होतील’, असं देखील या व्हिडिओमध्ये पिंकी चौधरी म्हणत आहे.

- Advertisement -

हल्ला पूर्वनियोजितच; पोलीस तपासात स्पष्ट

रविवारी संध्याकाळी तोंडाला फडकं बांधलेल्या काही अज्ञात व्यक्तींनी जेएनयूमधल्या साबरमती हॉस्टेलमध्ये तोडफोड केली. तसेच त्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये काही विद्यार्थी, प्राध्यापक जखमी झाले होते. दरम्यान, या प्रकरणात एकूण ५० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचं दिल्ली पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आलं आहे. आता हिंदू रक्षा दलाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आता दिल्ली पोलीस काय कारवाई करणार? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.


हेही वाचा – मोदी-शहांना जे हवं होतं तेच घडत आहे – शिवसेना
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -