सिसोदियांची सीबीआय चौकशी, ‘आप’ कार्यकर्त्यांकडून ‘मोदी XX XX’ची घोषणाबाजी

दिल्लीतील मद्य धोरण घोटाळाप्रकरणी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया (DCM Manish Sisodiya) यांची सीबीआयकडून चौकशी केली जात आहे. मद्यविक्री धोरण घोटाळाप्रकरणी चौकशीला सामोरे जाण्याआधी त्यांनी एक ट्वीट केलं होतं. त्यानुसार, मला अटक झाली तरी मी अटकेसाठी तयार आहे, असं ते म्हणाले होते. दरम्यान, मनीष सिसोदिया यांची सीबीआय चौकशी सुरू असून आपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सीबीआयच्या मुख्यालयाबाहेर आपच्या समर्थकांकडून आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर पोलिसांकडून दक्षिण दिल्लीत १४४ कलम लागू करण्यात आला आहे. मात्र, आपच्या काही कार्यकर्त्यांकडून ‘मोदी XX XX’ची घोषणाबाजी करण्यात आली.

मनीष सिसोदियांच्या सीबीआय चौकशीला विरोध करत आपच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीत आंदोलन करण्यास सुरूवात केली. यावेळी एका महिला आंदोलकाने ‘मोदी XX XX’च्या घोषणा दिल्या. एएनआयने यासंबंधी माहिती दिली आहे. दिल्ली पोलिसांनी राज्यसभा खासदार संजय सिंह, सौरभ भारद्वाज आणि गोपाल राय यांच्यासह ५० जणांना ताब्यात घेतले असून या सर्व आमदारांना मैदान गढी आणि फतेहपूर बेरी येथे नेण्यात आले आहे.

संजय सिंह यांचा मोदींवर हल्लाबोल

मोदींनी आमच्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी, ते आमचं मनोबल कमी करू शकत नाहीत. मनीष सिसोदिया दिल्लीतील लाखो मुलांना चांगले शिक्षण देत आहेत. मोदींचे मित्र अदानी लाखो कोटींचा घोटाळा करत आहेत. हिंमत असेल तर अदानींवर कारवाई करून दाखवा, असा हल्लाबोल आप नेते संजय सिंह यांनी मोदींवर केला.

भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांचा आपवर निशाणा

दरम्यान, मोदींविषयी आपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात आलेल्या घोषणेवर भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आम आदमी पक्षाने आज ‘मोदी XX XX’ हे अत्यंत दुर्दैवी शब्द वापरले आहेत. ते काय दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. तुमचा भ्रष्टाचार लपविण्यासाठी तुम्ही हे करत आहात का? यापूर्वी काँग्रेसनेही आपल्या पंतप्रधानांसाठी अपशब्द वापरले आहेत, त्यामुळे याला खरोखरच दुर्दैवं म्हणावं लागेल, असं म्हणत भाजप प्रवक्ते संबीत पात्रा यांनी आपवर निशाणा साधला आहे.

नव्या मद्यविक्री धोरणप्रकरणी गेल्या वर्षी २५ नोव्हेंबरला सीबीआयने सात जणांविरुद्ध पहिले आरोपपत्र दाखल केले होते. यात सिसोदिया यांचे नाव आरोपी म्हणून नव्हते. त्यामुळे सीबीआयने याप्रकरणी तपास करत त्यांचे पैशांचे व्यवहार, मद्यव्यापारी आणि आपनेते यांची माहिती गोळा केली. प्राप्त झालेल्या माहितीबाबत सीबीआय आज सिसोदिया यांच्याकडून स्पष्टीकरण घेणार आहे.


हेही वाचा : भगतसिंगांचं नाव घेत मनीष सिसोदिया सीबीआय चौकशीला हजर; म्हणाले, तुरुंगात जावं…