Parambir Singh : परमबीर सिंह भारतातच, पण मुंबई पोलिसांकडून जिवाला धोका

६ डिसेंबरपर्यंत परमबीर सिंह यांना अटकेपासून संरक्षण

Parambir singh and Supreme Court

मुंबईतील एका व्यावसायिकाने खंडणी प्रकरणात तक्रारीनंतर फरार असलेले मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अटकेपासून संरक्षण मिळण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. परमबीर सिंह कुठे आहेत आधी सांगा, मगच सुनावणी घेणार या सर्वोच्च न्यायालयाच्या पवित्र्यानंतर अखेर परबीर सिंहाच्या वतीने कोर्टात बाजू मांडण्यात आली. परमबीर सिंह हे भारतातच आहेत. मुंबईत त्यांच्या जीवाला धोका असल्याने ते सध्या महाराष्ट्राबाहेर असल्याची माहिती परमबीर सिंह यांच्या वकिलांनी सोमवारी सर्वोच्च न्यायालयात दिली.

त्यांच्या जिवाला मुंबई पोलिसांकडूनच धोका असल्याचा युक्तीवाद यावेळी वकिलांकडून करण्यात आला. परबीर सिंह हे भारतातच असून फरार नसल्याचेही वकिलांकडून न्यायालयाला यावेळी सांगण्यात आले. या प्रकरणात महाराष्ट्र सरकार आणि सीबीआयला येत्या ६ डिसेंबरपर्यंत अटक न करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. परमबीर सिंह यांनी अटकेपासून दिलासा मिळवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

अतिरिक्त मुख्य महानगर न्यायदंडाधिकारी यांनी १७ नोव्हेंबर रोजी परमबीर सिंह यांना फरार घोषित केले आहे. ३० दिवसांच्या आत परमबीर सिंह यांना न्यायालयापुढे हजर व्हावं लागेल. अन्यथा त्यांची संपत्ती जप्त करण्यात येणार आहे. सोमवारी युक्तीवादामध्ये परमबीर सिंह यांच्या वकिलाने राज्याचे पोलीस महासंचालक यांनी आपल्या अशिलाला यापूर्वी धमकावल्याचे न्यायालयात कथन केले. ज्यामध्ये माझ्याजवळ डीजीपींची ऑडिओ टेप आहे. ज्यामध्ये माजी गृहमंत्र्यांविरुद्ध दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकला जात आहे, ते मला धमकी सुद्धा देत आहेत. तक्रार आणि खटले मागे घेतले नाहीत तर माझ्यावर राज्यात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्याची धमकी दिल्याचा आरोप सिंह यांच्या वकिलांनी केला. यावर सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांना ६ डिसेंबरपर्यंत संरक्षण दिले आहे.

 

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या अतिरिक्त महानगर दंडाधिकारी न्यायालयाने परमबीर सिंह यांचा कोणताच थांगपत्ता लागत नसल्याने त्यांना फरार घोषित केले होते. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रॅंचसह अनेक तपास यंत्रणांच्या समन्सला कोणताही प्रतिसाद परबीर सिंह यांच्याकडून मिलाला नव्हता. परमबीर सिंह यांच्या मुंबईतील तसेच चंदीगढ येथील निवासस्थानी मुंबई पोलिसांनी समन्स पाठवला होता. पण त्यापैकी कोणत्याच समन्सला परमबीर सिंह यांच्याकडून उत्तर देण्यात आले नव्हते. अखेर आज झालेल्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीमध्ये परमबीर सिंह हे भारतातच असल्याचे जाहीर करण्यात आले. तसेच न्यायालयाने मागणी केल्यास ते ४८ तासांमध्ये हजर होतील असेही कोर्टाला परमबीर सिंह यांच्या वतीने सांगण्यात आले.

काय आहे प्रकरण ?

मुंबईतील एका व्यावसायिकाने परमबीर सिंह यांच्यावर खंडणीचे आरोप केले होते. त्यानंतर मुंबई पोलिसांकडून परमबीर सिंह यांच्या नावे समन्स पाठविण्यात आले होते. सचिन वाझे यांच्या माध्यमातून परमबीर सिंह खंडणी गोळा करत होते, असा आरोप या बांधकाम व्यावसायिकाने केला होता. त्याआधी परमबीर सिंह यांनी मुंबई पोलिस आयुक्तपदी असताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रूपयांची खंडणी वसुलीचे आरोप करणारे पत्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांची ईडी चौकशी सुरू झाल्याने त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता.


हेही वाचा – Extortion case: परमबीर सिंह कुठे आहेत ते सांगा? तोवर संरक्षण नाहीच, SC चा पवित्रा