Petrol diesel prices : देशात इंधन दराने गाठला उच्चांक, एक लिटरमागे मोजावे लागतात…

Petrol diesel prices hiked again on 5 october 2021 latest update petrol diesel rate
Petrol diesel prices देशात इंधन दराने गाठला उच्चांक, एक लिटरमागे मोजावे लागतात...

देशातील सततच्या इंधन दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिकांचे दैनंदिन जीवन अधिकच अवघड होत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या दरामध्ये सात वर्षांत यंदा सर्वात मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. याचा परिणाम देशातील इंधनाच्या किमतींवरही दिसत आहे. देशात सध्याही पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींनी मोठा उच्चांक गाठला आहे. भारतीय तेल कंपन्यांनी ऑक्टोबरमध्ये एक दिवस दर स्थिर ठेवत आज मंगळवारी पेट्रोल, डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ केली आहे. आज पेट्रोल २५ पैसे प्रति लीटर आणि डिझेल ३० पैसे प्रति लीटरने महाग झाले आहे. ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून सलग ४ दिवस पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ होत आहे. या वाढत्या दरवाढीमुळे सर्व सामान्य नागरिक चिंतेत पडलेय.

पेट्रोलियम कंपन्यांनी मंगळवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत आज पेट्रोल प्रतिलीटर १०८.६७ रुपये तर डिझेल ९८.८० रुपये प्रतिलीटर झाले आहे. राजधानी दिल्लीच पेट्रोलचा दर १०२.६४ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ९१.०७ रुपये प्रतिलीटर झाले आहे. याशिवाय कोलकत्तामध्ये पेट्रोल आणि डिझेल प्रति लीटर अनुक्रमे १०३.३६ रुपये आणि ९४.१७ रुपये झाले आहे. तर चेन्नईमध्ये पेट्रोल प्रतिलीटर १००.२३ रुपये आणि डिझेल ९५.५९ रुपये झाले आहे. देशातील चार मोठ्या महानगरांच्या तुलनेत मुंबईत पेट्रोल-डिझेलचे सर्वाधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. याशिवाय भोपाळ आणि राजस्थानमध्येही पेट्रोलच्या दराने ११० रुपयांचा आकडा पार केला आहे.

पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना जीएसटी कक्षेत आणण्याची मागणी अनेक दिवसांपासून जोर धरतेय, मात्र केंद्र सरकार टॅक्स कपातीच्या भीतीने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींना जीएसटी कक्षेत आणण्यास तयार नाही. कारण असे केल्यास पेट्रोल-डिझेलच्या किंमती अर्ध्या होतील. यामुळे सरकारला पेट्रोल-डिझेलवर मिळणारा टॅक्स मोठ्याप्रमाणात कमी होईल. आजच्या अंदाजानुसार, जर पेट्रोल-डिझेल जीएसटी कक्षेत आणल्यास, पेट्रोल प्रतिलीटर ५६ रुपये आणि डिझेल ५५ रुपयांनी विकले जाण्याची शक्यता आहे.

असा पहा पेट्रोल- डिझेलचे ऑनलाईन, ऑफलाईन दर

देशात दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर होत असतात. त्यामुळे सकाळी सहा वाजल्यापासूनचे हे नवे दर देशात लागू होतात. तुम्ही हे पेट्रोल-डिझेलचे दर SMS या ऑफलाईन किंवा IndianOil ONE Mobile App या ऑनलाईन माध्यमातूनही जाणून घेऊ शकता. IndianOil ONE Mobile App हे मोबाईल अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यातून तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील दर जाणून घेऊ शकता.
याशिवाय एसएमएसद्वारे दर जाणून घेण्यासाठी तुम्ही इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).