घरअर्थजगत'मोदींचा झगमगाट बिनकामाचा', प्रियंका गांधींची खोचक टीका!

‘मोदींचा झगमगाट बिनकामाचा’, प्रियंका गांधींची खोचक टीका!

Subscribe

देशात आलेल्या आर्थिक मंदीच्या लाटेवरून प्रियंका गांधींनी भाजप सरकारवर टीका केली आहे.

भारतीय अर्थव्यवस्थेनं थेट खालच्या दिशेनं मारलेला सूर अद्याप वर चढायचं नाव घेत नसतानाच भाजप सरकारवर आता टीका होऊ लागली आहे. त्यातच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मंदी नसल्याच्या केलेल्या दाव्याचा नेटिझन्स देखील समाचार घेऊ लागले आहेत. त्यातच आता काँग्रेसच्या उत्तर प्रदेशमधील सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी देखील भाजप सरकारवर खोचक शब्दांमध्ये टीका केली आहे. ‘मोदी सरकारचा झगमगाट काही कामाचा नाही, त्यामुळे गुंतवणूकदार येणार नाहीत. गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला आहे’, अशा शब्दांमध्ये प्रियंका गांधी यांनी निशाणा साधला आहे. आपल्या ट्वीटर अकाऊंटवरून त्यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

- Advertisement -

‘परदेशातल्या इव्हेंटमुळे गुंतवणूकदार येत नाहीत’

काही दिवसांपूर्वी देखील प्रियंका गांधी यांनी एक व्हिडिओ ट्वीट करून त्यातून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं होतं. आता पुन्हा एकदा त्यांनी निशाणा साधला आहे. ‘मोदी सरकार फक्त झगमगाट दाखवून रोज ५ ट्रिलियनच्या गप्पा झोडत आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांमधल्या हेडलाईन्स मॅनेज होत असतील. पण परदेशात इव्हेंट करून गुंतवणूकदार भारतात येत नसतात. गुंतवणूकदारांचा विश्वास डगमगला आहे. आर्थिक गुंतवणूक संकटात सापडली आहे’, असं ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या आहेत. शिवाय, ‘एवढं सगळं होऊन देखील भाजप सरकार ते स्वीकारायला तयार नाही. भारत आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर ही मंदी हा मोठा स्पीड ब्रेकर आहे. त्यावर उपाय केल्याशिवाय हा सगळा झगमगाट बेकार आहे’, असंही प्रियंका गांधी यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – ओला-उबरमुळेच ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी! केंद्रीय अर्थमंत्र्यांचा अजब दावा!

आर्थिक धोरणावर चहूबाजूंनी टीका

दरम्यान, नुकताच अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी पिछाडीवर पडलेल्या अर्थव्यवस्थेला तिसरा बुस्टर दिला. गृहकर्ज आणि वाहनकर्ज स्वस्त करणारा निर्णय रिझर्व्ह बँकेने घेतल्यानंतर बाजारात काही काळ उत्साह पाहायला मिळाला. मात्र, तो उत्साह अल्पकालीक ठरला. देशात अवतरलेल्या मंदीवर माजी पंतप्रधान आणि अर्थतज्ज्ञ मनमोहन सिंग यांनी देखील केंद्र सरकारला धोरणांतील चुकांमुळे खडे बोल सुनावले होते. वाहन उद्योगात आलेली मंदी ओला-उबरमुळे आल्याच्या निर्मला सीतारमण यांच्या निष्कर्षावर देखील चौफेर टीका झाली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -