घरताज्या घडामोडीरमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

रमेश बैस महाराष्ट्राचे नवे राज्यपाल

Subscribe

-भगतसिंह कोश्यारी निघाले माघारी

सातत्याने वादग्रस्त वक्तव्ये करून विरोधकांच्या टीकेचे धनी ठरलेले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा अखेर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजूर केला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी रविवारी देशातील १३ राज्यपाल आणि उपराज्यपाल यांची बदली केली. यासंबंधीचे आदेश काढतानाच महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि लडाखचे लेफ्टनंट राज्यपाल राधा कृष्णन माथूर यांचा राजीनामादेखील राष्ट्रपती मुर्मू यांनी स्वीकारला आहे. कोश्यारी यांच्या रिक्त होणार्‍या जागेवर रमेश बैस यांची महाराष्ट्राचे 20 वे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बैस यांनी कार्यभार स्वीकारल्याच्या तारखेपासून या नेमणुका प्रभावी होतील. यापूर्वी रमेश बैस झारखंडचे राज्यपाल होते. कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर होताच महाराष्ट्राची सुटका झाल्याचा प्रतिक्रिया विरोधकांकडून देण्यात आल्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदी विकासकामांच्या उद्घाटनासाठी १९ जानेवारी रोजी मुंबई दौर्‍यावर आले असता राजकीय जबाबदार्‍यांमधून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करण्याची इच्छा कोश्यारी यांनी व्यक्त केली होती. ही मागणी अखेर मान्य झाली आहे. येत्या 27 फेब्रुवारीपासून राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत आहे. हे अधिवेशन 25 मार्चपर्यंत म्हणजेच चार आठवडे चालणार आहे, तर 9 मार्च रोजी राज्याचा अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणाने अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होत असते. अधिवेशनात पुन्हा विरोधकांकडून राज्यपालांचा विरोध होण्याची दाट शक्यता होती.

- Advertisement -

कोश्यारींची वादग्रस्त कारकीर्द

अजित पवार-देवेंद्र फडणवीसांच्या पहाटेच्या शपथविधीमुळे सर्वात पहिल्यांदा चर्चेत आलेले भगतसिंह कोश्यारी यांनी त्यानंतर सत्तेत आलेल्या तत्कालीन मविआ सरकारला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडली नव्हती. विधानसभा अध्यक्षांची निवड, राज्यपालनियुक्त आमदारांची नियुक्ती ताटकळत ठेवण्यावरून त्यांच्या निर्णय प्रक्रियेवर मोठी टीका झाली. कोविड काळात मंदिरे उघडण्यावरून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत रंगलेले लेटर वॉर चर्चेचा विषय ठरले होते. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यासह अनेक महापुरुषांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे भाजपचीही कोंडी होत होती. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर अवघ्या 2 दिवसांत ठाकरे सरकारला विश्वासमत ठराव मांडण्याचे दिलेले आदेश, एकनाथ शिंदे यांचा शपथविधी हे त्यांचे निर्णय अद्यापही न्याय प्रलंबित मानले जातात.

- Advertisement -

कोण आहेत बैस

माजी राज्यपाल- झारखंड, त्रिपुरा
अटल बिहारी वाजपेयी सरकारमध्ये
केंद्रीय पर्यावरण आणि वन राज्यमंत्री
(स्वतंत्र प्रभार) म्हणून काम
रायपूरमधून 7 वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व

13 राज्यपालांची निवड

लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम पारनाईक (निवृत्त) यांची अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून नियुक्ती, सिक्कीमचे राज्यपाल म्हणून लक्ष्मण प्रसाद आचार्य, झारखंडचे राज्यपाल म्हणून सी. पी. राधाकृष्णन, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून शिव प्रताप शुक्ला, आसामचे राज्यपाल म्हणून गुलाबचंद कटारिया, आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून न्यायमूर्ती (निवृत्त) एस. अब्दुल नझीर, आंध्र प्रदेशचे सध्याचे राज्यपाल विश्व भूषण हरिचंदन यांची छत्तीसगड येथे नियुक्त करण्यात आली आहे, तर छत्तीसगडचे सध्याचे राज्यपाल अनुसुया उकिये यांची मणिपूरचे राज्यपाल म्हणून, मणिपूरचे राज्यपाल गणेशन यांची नागालँडचे, बिहारचे राज्यपाल फागू चौहान यांची मेघालयचे, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची बिहारचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून झारखंडचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल लेफ्टनंट ब्रिगेडियर (निवृत्त) डॉ. बी. डी. मिश्रा यांची लडाखचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -