शिवसेना ही ‘प्रायव्हेट लिमिटेड’ नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात

eknath shinde

नवी दिल्ली : सत्तेवर असताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कोणाच्याही गाठीभेटी घेतल्या नाहीत. कोणाशीही संपर्क ठेवला नाही. पण आता गाठीभेटी सुरू केल्या आहेत. शिवसेनाही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाही, कोणाची जागिर नाही. कार्यकर्त्यांना नोकर समजू नये, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी राजधानी दिल्लीत होते. महाराष्ट्र सदनात विविध राज्यांच्या प्रमुखांचा मेळावा झाला. त्यात त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर चौफेर टीका केली. महाराष्ट्रात भाजपासोबत निवडणूक लढविली. पण मुख्यमंत्रपदाच्या लालसेपोटी भाजपाला दूर करून ज्यांच्याविरोधात लढलो, त्यांनाच बरोबर घेऊन सत्तास्थापन केली. सत्तेच्या लालसेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, अशी टीका त्यांनी केली.

महाराष्ट्रात अडीच वर्षांनी परिवर्तन झाले आहे. आम्हाला गद्दार म्हटले जात असले तरी, खुद्दार आहोत. महाविकास आघाडी सत्तेवर असताना आमचे आमदार व पदाधिकारी माझ्याकडे व्यथा घेऊन येत होते, त्यांना शक्य तेवढी मदत करत होतो. आमचा मुख्यमंत्री असूनही आमच्यावर अन्याय सुरू होता. शेवटी याचा कडेलोट झाला आणि आम्ही उठाव केला, असे ते म्हणाले.

आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनापुढे नेत आहोत. मुख्यमंत्रीपदासाठी त्यांनी या विचारांना तिलांजली दिली. आम्हाला महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्र सरकारचे सहकार्य मिळत आहे. त्यानुसार आम्ही कामाचा धडाका लावला आहे. एकापाठोपाठ एक जनहिताचे निर्णय घेत आहोत. म्हणूनच अलीकडेच झालेल्या ग्रामपंचात निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळाले आणि ते सहाव्या क्रमांकावर फेकले गेले.

कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांचे ‘अच्छे दिन’
सत्तेचा त्याग करत आमदार आणि मंत्री माझ्याबरोबर आले. त्यामुळे आता विविध पदाधिकाऱ्यांच्या बैठका सुरू झाल्या आहेत. बुधवारी मुंबईत गटप्रमुखांची बैठक झाली. अडीच वर्षांनी या गटप्रमुखांची आठवण आली. आतापर्यंत कोणाला भेट मिळत नव्हती. मातोश्रीवर प्रवेश देखील नव्हता, असे सांगून, येथे जमलेल्या राज्यप्रमुखांशीही संपर्क ठेवला गेला नाही. आता त्यांना वारंवार फोन येत आहे. एकूणच आमच्या बंडानंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ‘अच्छे दिन’ आले आहेत, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.