ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची प्रकृती खालावली; आयसीयूमध्ये केलं दाखल

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची सोमवारी प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं आहे.

boris johnson
ब्रिटनचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन

गेल्या आठवड्यात कोरोना पॉझिटिव्ह आढळलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांची प्रकृती अधिकच बिकट झाली आहे. त्यांना अति दक्षता विभागामध्ये (आयसीयू) दाखल करण्यात आलं आहे. पंतप्रधान बोरिस जॉनसन यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर २७ मार्च रोजी त्यांनी स्वत:ला आयसोलेट केलं होतं. परंतु रविवारी ५ एप्रिल रोजी त्यांना लंडनच्या सेंट थॉमस रुग्णालयात दाखल केलं. त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्यानंतर त्यांना ६ एप्रिल रोजी संध्याकाळी अति दक्षता विभागामध्ये पाठवण्यात आलं. डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने सांगितलं की, “पंतप्रधानांची प्रकृती सोमवारी दुपारी बिघडली आहे आणि त्यांच्या वैद्यकीय पथकाच्या सल्ल्यानुसार त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आलं आहे.” पंतप्रधान बोरिस जॉनसन सोमवारी सकाळी ठीक होते. परंतु नंतर त्यांची प्रकृती दुपारनंतर खालावली आणि सायंकाळी सहा वाजता त्यांना आयसीयूमध्ये नेण्यात आलं.


हेही वाचा – जगातील हे १२ विषाणू आहेत सर्वात धोकादायक

बोरिस जॉनसन रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी पंतप्रधान पदाच्या सर्व जबाबदाऱ्या पाहत होते. परंतु नंतर त्यांनी यासाठी परराष्ट्रमंत्री डोमॅनिक रॉब यांना नियुक्त केलं आहे. दरम्यान, पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या पत्नि कॅरी सायमंड्स यांच्यातही कोरोना विषाणूची लक्षणे जाणवत आहेत. गेल्या आठवड्यात पंतप्रधान जॉन्सन यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यापासून सायमंड्स त्यांच्यापासून विभक्त झाले आहेत.

यापूर्वी ब्रिटनच्या प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रिन्स चार्ल्स यांची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याचे क्लेरेन्स हाऊसने जाहीर केलं होतं. पण त्यांची प्रकृती ठीक आहे.