union budget 2023 : जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यास भारत सज्ज – अमित शाह

नवी दिल्ली : आर्थिक सर्वेक्षण 2023नुसार (Economic Survey 2023) सर्व क्षेत्रांत झालेली वाढ आणि पुढील वाढीची शक्यता लक्षात घेता भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यास सज्ज झाला असल्याचे निदर्शनास येते, असे सांगून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या दूरदृष्टीचे आणि विकासामागील नियोजनाचे कौतुक केले. भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) 2023-24मध्ये 6 टक्क्यांवरून 6.8 टक्के होईल, असे आर्थिक सर्वेक्षणात म्हटले आहे. तथापि, ते आर्थिक आणि राजकीय घडामोडींवर अवलंबून असते.

या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री अमित शाह म्हणाले की, कोरोनासारख्या महामारीच्या काळातही अर्थव्यवस्था सुरळीत ठेवण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यश आल्याचे आर्थिक सर्वेक्षणातून पुष्टी मिळते. जेव्हा संपूर्ण जग मंदीचा सामना करत आहे, तेव्हा भारत सर्व क्षेत्रांमध्ये प्रगती आणि आशावाद दाखवत आहे. भारत जागतिक महासत्ता म्हणून उदयास येण्यास तयार असल्याचे हे प्रतिक आहे.

जगभरात मंदीचे सावट असतानाही भारताचा आर्थिक विकास दर येत्या 2023-24मध्ये 6.5 टक्के राहील. तथापि, चालू आर्थिक वर्षातील 7 टक्के आणि मागील आर्थिक वर्षातील म्हणजेच 2021-22मधील 8.7 टक्क्यांच्या तुलनेत तो कमी आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी मंगळवारी लोकसभेत सादर केलेल्या आर्थिक सर्वेक्षण 2022-23मध्ये हा अनुमान देण्यात आला आहे. परंतु असे असूनही, भारत जगातील सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असलेल्या प्रमुख देशांमध्ये राहील, असेही सीतारामन यांनी सांगितले.

अर्थसंकल्पातून सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न – पंतप्रधान
यंदाच्या अर्थसंकल्पातून सर्वसामान्य भारतीयांच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे प्रयत्न असतील. देशातील अर्थव्यवस्थेची सकारात्मकतेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. यंदाचा अर्थसंकल्प प्रत्येक क्षेत्रासाठी आशेचा किरण घेऊन येणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले.