अमेरिकाः भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

कमला हॅरिस निवडून आल्याने अमेरिकन निवडणुकीत इतिहास रचला जाईल.

US Presidential candidate Joe Biden picks Indian-origin Senator Kamala Harris for US vice presidential candidate
अमेरिकाः भारतीय वंशाच्या कमला हॅरिस उपाध्यक्षपदाच्या उमेदवार

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पार्टीचे अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांनी खासदार कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्याची घोषणा केली आहे. या पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या त्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला असतील. त्यामुळे हॅरिस निवडून आल्याने अमेरिकन निवडणुकीत इतिहास रचला जाईल. महत्त्वाचे म्हणजे कमला हॅरिस या भारतीय वंशाच्या आहेत.

उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून निवड झाल्यानंतर कमला हॅरिस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली की, ‘जो बिडेन अमेरिकेतील लोकांना एकत्र करू शकतात, कारण त्यांनी आयुष्यभर आपल्यासाठी संघर्ष केला आहे. मी त्यांच्यासोबत उपाध्यक्षपदाची उमेदवार म्हणून निवड झाल्याचा मला अभिमान वाटतो आणि त्यांना आमचा कमांडर-इन-चीफ बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन.’

यापूर्वी कॅलिफोर्नियाच्या खासदार कमला हॅरिस अध्यक्षपदाच्या उमेदवारीच्या शर्यतीत होत्या. त्यावेळेस त्या जो बिडेन यांना आव्हान देत होत्या. पण डेमोक्रॅटिक पक्षाने जो बिडेन यांच्या नावावर अध्यक्षपदाच्या उमेदवारीचा शिकमोर्तब केला होता. त्यानंतर आता उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून हॅरिस यांना निवड करण्यात आली.

कमला हॅरिस कॅलिफॉर्नियाच्या एॅटॉर्नी जनरल (Attorney General) होत्या. ज्यावेळी अमेरिकेत कृष्णवर्यीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि आंदोलने होत होती. त्यावेळेस पोलीस दलातील सुधारणांचा मुद्दा हॅरिस यांनी उपस्थित केला होतो. दरम्यान ३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या अमेरिकन अध्यक्षाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात जो बिडेन आहेत. ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार आहेत. तसेच उपाध्यक्षापदासाठी हॅरिस यांच्या विरोधात रिपब्लिकन पक्षाचे माईक पेन्स असणार आहेत.

हॅरिस यांच्या उपाध्यक्षपदाच्या उमेदवाराची निवड झाल्याचे जो बिडेन यांनी सांगितले. त्यांनी याबाबत ट्विटरद्वारे माहिती दिली. बिटेन ट्विटमध्ये लिहिले की, ‘उपाध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून कमला हॅरिस यांचे नाव घोषित करताना अभिमान वाटत आहे. कमला निर्भीड आहेत. त्या अमेरिकेतील सर्वोत्कृष्ट लोकप्रतिनिधींपैकी एक आहेत.’


हेही वाचा – रशियाने कोरोनावर बनवली पहिली लस