घरइको फ्रेंडली बाप्पा स्पर्धामाय महानगरच्या इको फ्रेंडली स्पर्धेला तुफान प्रतिसाद; निकाल जाहीर

माय महानगरच्या इको फ्रेंडली स्पर्धेला तुफान प्रतिसाद; निकाल जाहीर

Subscribe

इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणाऱ्या आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावणाऱ्या अशा ‘हिरोंना’ आपलं महानगरने www.mymahanagar.com या वेबसाईच्या माध्यमातून 'इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट' सुरु केले होते. त्याचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.

देशभरात लाखो घरांमध्ये गणेशोत्सव साजरा केला जातो. तेवढ्याच संख्येने सार्वजनिक मंडळे देखील गणपती बसवत असतात. गणेशोत्सव म्हटल की सजावट, देखावा, आगमन आणि विसर्जनाची मिरवणूक आलीच. गणेशोत्सवात प्लॅस्टर ऑफ पॅरीसची मूर्ती आणि सजावटीला थर्माकॉल, प्लास्टिक किंवा इतर अविघटनशील साहित्य हमखास वापरले जाते. मात्र यातून पर्यावरणाचे अपरिमित हानी होत असते? हा प्रश्न खुप कमी लोकांना पडतो. ज्यांना हा प्रश्न पडतो ते यातून मार्ग काढतात. विविध संकल्पना राबवून इको फ्रेंडली म्हणजेच पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करतात. मात्र त्यांची ही संकल्पना इतरांपर्यंत पोहोचत नाही. इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करणाऱ्या आणि पर्यावरणाचे संवर्धन करण्यासाठी हातभार लावणाऱ्या अशा ‘हिरोंना’ आपलं महानगरने www.mymahanagar.com या वेबसाईच्या माध्यमातून ‘इको फ्रेंडली बाप्पा काँटेस्ट’ सुरु केले होते.

या स्पर्धेला स्पर्धकांनी तुफान प्रतिसाद दिला. राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांनी आपापल्या घरातील, मंडळातील इको फ्रेंडली बाप्पाबद्दलची माहिती पाठवली. राज्यभरातून तब्बल ८० स्पर्धकांनी या निकषांची पूर्तता केली. या सर्व स्पर्धकांमधून सहा प्रमुख बक्षिसे काढण्यात आली आहेत. सार्वजनिक मंडळातून ज्यांना जास्त वोट मिळाले, त्या मंडळाना प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिके देण्यात येणार आहेत. तसेच घरगुती इको फ्रेंडली स्पर्धकांपैकी देखील प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे तीन पारितोषिक देण्यात येतील. दोन्ही कॅटेगरीमध्ये पहिले पारितोषिक हे रु. ५५५५/-, दुसरे रु. ३३३३/- आणि तिसरे पारितोषिक रु. २२२२/- देण्यात येणार आहे. उर्वरीत सर्व सहभागी स्पर्धकांना आपलं महानगर आणि माय महानगरतर्फे एक आठवण भेट दिली जाईल. २५ ऑक्टोबर २०१८ रोजी एका सार्वजनिक कार्यक्रमात ही पारितोषिके वितरीत करण्यात येणार आहेत.

- Advertisement -

ही स्पर्धा सुरु करताना याचे निकष महानगरने आधीच ठरवले होते. शाडू, कागद किंवा इतर विघटनशील साहित्यापासूनच बनलेली मूर्ती असावी आणि सजावटीसाठी वापरलेले साहित्य हे थर्माकॉल आणि प्लास्टिकमूक्त असावे अशी अट घातली होती. प्रत्येक स्पर्धकाची एक स्वतंत्र बातमी बनवून ती https://www.mymahanagar.com/eco-friendly-bappa-contest/ या लिंकवर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

घरगुती इको फ्रेंडली बाप्पा

१. ग्रामीण जीवनशैली साकारणारा बाप्पा – ५०८५७८ वोट

कल्याण येथील गायत्री गोरे यांना घरगुती इको फ्रेडंली स्पर्धेत पहिले पारितोषिक मिळाले आहे. गोरे कुटुंबियांनी इको फ्रेंडली देखावा तयार केला असून यात त्यांनी ग्रामीण भागातील घर, तेथील सण कसे साजरे केले जातात याचे चित्र या देखाव्यातून मांडले आहे. शाडूमाती, भातुकलीची खेळणी, पुरणपोळी बनवणारी बाई, विहीर, विहीरीतील पाणी भरणारी बाई, गणपतीची पूजा करणारे भटजी, सूप, आईस्क्रिमच्या काडीपासून बैलजोडी असे सर्व ग्रामीण जीवनशैली तयार करण्यात आली आहे.

- Advertisement -

२. प्लास्टिक बंदीचा संदेश देणारा रेखा मालपुरेंचा बाप्पा – ९५९७१ वोट

कल्याणच्या रेखा मालपुरे यांच्या बाप्पाची संकल्पना पर्यावरण संवर्धनाची असून त्यातून प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा अशाप्रकारचे संदेश दिले गेले आहेत. त्यांना दुसरे पारितोषिक मिळाले आहे.

३. शाळेतल्या आठवणी जागवणारा प्रमोद महाडिक यांचा बाप्पा – ७६१४७ वोट

जोगेश्वरी येथील प्रमोद महाडिक यांनी शाळेतल्या आठवणी जागवणारा देखावा साकारला आहे. विशेष म्हणजे महाडिक हे स्वतः शिक्षक असल्यामुळे शाळेतील बारीक सारीक बारकावे त्यांनी देखाव्याच्या माध्यमातून दाखवले आहेत. इको फ्रेंडली स्पर्धेत महाडिक यांच्या घरच्या गणपतीला तृतीय पारितोषिक मिळाले आहे.

इको फ्रेंडली बाप्पा सार्वजनिक मंडळ

१. मानवी दुर्गुणांवर बोट ठेवणारा जनता मार्केटचा बाप्पा – ६०८६३३

भांडुप येथील जनता मार्केट सार्वजिनक गणेशोत्सव मंडळाने यंदा ही एक सामाजिक संदेश देणारा देखावा तयार केला आहे. या मंडळाला सार्वजनिक गणपती या कॅटेगरीतून पहिले पारितोषिक मिळाले असून त्यांनी देखावाच्या माध्यमातून मानवी स्वभावाचे वाईट गुण कसे आपल्याला दूर ठेवता येतील याविषयीचा संदेश दिला आहे. ‘सेल्फी मनाचा आरसा’ अशी या देखाव्याची थीम आहे.

२. पंधरा फुटाचा इको फ्रेंडली बाप्पा – २०८४४३

नालासोपारा येथील श्री साईनाथ मित्र मंडळातर्फे इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्यात आला. इको फ्रेंडली उत्सव साजरा करणारे सर्वात जुने असे पालघर जिल्ह्यातील हे पहिलेच मंडळ आहे. ग्रीन इंडिया आणि पर्यावरण संवर्धनासाठी मंडळाने १५.५ फुटाची कागदाच्या लगद्याची इको फ्रेंडली मूर्ती बनवून घेतली आहे. श्री साईनाथ मित्र मंडळाला द्वितीय पारितोषिक मिळाले आहे.

३. पाण्याचे महत्त्व विषद करणारा गणपती बाप्पा – ७८२

कल्याणचे रहिवासी सतीश मनगुटकर यांनी आपल्या सोसायटीमध्ये इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा केला आहे. त्यांनी ‘पाणी पुन:प्रक्रिया’ या विषयावर देखावा केला आहे. देखाव्यामध्ये मूर्ती स्नान करत आहे आणि ते पाणी पुन:प्रक्रिया करून त्यामधून शेती पिकवण्याचे दृश्य निर्माण केले आहे. या मंडळाला तृतीय पारितोषिक जाहीर करण्यात आले आहे.

इको फ्रेंडली गणेशोत्सवाची संकल्पना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक सहभागी स्पर्धकाच्या बातमीला वोटिंगचा पर्याय दिला होता. त्यामुळे महानगरच्या वाचकांना प्रत्येक बातमीला आपल्या पसंतीनुसार वोट देता आले. तसेच प्रत्येक स्पर्धकाच्या बातमीला मायमहानगरच्या फेसबुक, ट्विटर आणि इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले होते. तसेच स्पर्धा भावनेमुळे स्पर्धकांनीही आपल्या बातमीची लिंक जास्तीत जास्त लोकांना पाठवली होती. त्यामुळेच प्रत्येक स्पर्धकाचा ‘इको फ्रेंडली बाप्पा’ व्हायरला होऊन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -