घरसंपादकीयअग्रलेखइगोने केला शिवसेनेचा घात!

इगोने केला शिवसेनेचा घात!

Subscribe

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत वेगळा गट स्थापन करून आमच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असे जाहीर केले.

विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड करून शिवसेनेच्या ४० आमदारांसोबत वेगळा गट स्थापन करून आमच्याकडे आमदारांची संख्या जास्त असल्यामुळे आमची शिवसेना हीच खरी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे, असे जाहीर केले. त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेना पक्षप्रमुखच नव्हे तर अख्खी शिवसेनाच विचित्र कोंडीत सापडली आहे. त्यामुळे पुढे शिवसेनेचे काय होणार, असा प्रश्न सामान्य शिवसैनिकाला पडला आहे. शिवसेनेच्या पदाधिकारी दीपाली सय्यद यांनी सामान्य शिवसैनिकाची खंत व्यक्त करताना एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे दोन दिवसात भेटतील आणि काहीतरी चांगले घडेल, असा आशावाद व्यक्त केला. (eknath shinde and uddhav thackeray may be meet says each other says shiv sena leader dipali sayyad)

त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी दीपाली सय्यद यांना हे अधिकार कुणी दिले, असा सवाल उपस्थित करीत सर्वसामान्य शिवसैनिकाच्या मताला पुन्हा एकदा लाथाडले आहे. संजय राऊत हे त्यांंच्या अशा बेफिकीर आणि रगेल वृत्तीमुळे आज सर्वसामान्य शिवसैनिकांच्या रोषाचे लक्ष्य ठरले आहेत. त्यामुळे राऊत यांनी आपल्या अट्टाहासाखातर शिवसेनेला राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून संघटनेचे मोठे नुकसान केले आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना ४० आमदार फुटून पक्षातून बाहेर पडतात. आज संघटना गोत्यात आलेली आहे.

- Advertisement -

सर्वसामान्य शिवसैनिक संभ्रमात सापडला आहे. आमदार तर फुटलेच, पण एकापाठोपाठ नगरपालिकांमधील नगरसेवकही ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील होत आहेत. अशा वेळी दीपाली सय्यद यांनी ज्या सामान्य शिवसैनिकांच्या भावना व्यक्त केल्या, त्याचा सन्मान करणे हे राऊतांचे काम होते, पण शिवसेना फुटून पक्षाच्या हातची सत्ता गेली, पण गिरे तो भी टांग उपर, हा जो काही राऊत यांचा पवित्रा आहे, त्यामुळेच त्यांनी शिवसेनेतील अनेकांचा रोष ओढवून घेतला आहे. आपण स्वत: रोष ओढवून घेताना पक्षाचेही नुकसान करीत आहोत याचीही त्यांना जाणीव नाही याचेच आश्चर्य वाटते. संजय राऊत यांनी बराच काळ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्या सहवासात राहिलेले आहेत.

त्यांच्या अनेक मुलाखती घेऊन दै. ‘सामना’मध्ये प्रसिद्ध केल्या आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे अगदी तरुण होते आणि ते राजकारणात सक्रिय झालेले नव्हते. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’चे राऊत हे अनेक वर्षे कार्यकारी संपादक आहेत. त्यामुळे अनेक वर्षे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सहवास त्यांना लाभला. त्यामुळे बाळासाहेबांच्या वक्तव्याचा आणि व्यक्तिमत्त्वाचा जबरदस्त प्रभाव त्यांच्यावर पडलेला आहे हे त्यांच्या देहबोलीवरून, पत्रकारांशी बोलताना ते जे हातवारे करतात त्यावरून आणि त्यांच्या ‘बरं का’, या शब्दफेकीवरून दिसून येते.

- Advertisement -

त्यामुळे राऊत यांना आपणच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आहोत असा भास होतो की काय, असे त्यांना टीव्हीवर पाहणार्‍यांना आणि ऐकणार्‍यांना वाटते. एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहून त्याच्या काही गोष्टींचे अनुकरण आपल्याला करता येते, पण आपल्याला ती व्यक्ती होता येत नाही हे लक्षात घेण्याची गरज असते. काही दिवसांपूर्वी ईडीच्या धाडीनंतर राऊत यांच्या विविध ठिकाणच्या मालमत्तांचे लोकांना दर्शन घडले तेव्हा एखादा पत्रकार इतका श्रीमंत असू शकतो याचे अनेक पत्रकारांनाही आश्चर्य वाटले. शिवसेनेच्या मुखपत्राचे आपण कार्यकारी संपादक आहोत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या खास मर्जीतले आपण आहोत. त्यातूनच त्यांनी जणू काही आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या थाटात ईडीच्या नोटिशीनंतर या मला अटक करा, असे आव्हान दिले. या सगळ्यातून राऊत यांचा इगो किती टिपेचा आहे ते दिसून येते, पण त्या इगोमुळे संघटना रसातळाला चालली आहे, याच्याशी त्यांना काही देणेघेणे नाही असेच दिसत आहे.

२०१९ साली विधानसभेची निवडणूक भाजप आणि शिवसेनेने अनपेक्षितपणे युती करून लढवली होती. कारण २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत युती तोडून दोन्ही पक्ष निवडणूक लढले होते. त्यात शिवसेना पक्षप्रमुखांनी भाजपची आणि त्यांच्या केंद्रीय नेत्यांची प्रचारसभांमधून काही शिल्लक ठेवली नव्हती. त्यानंतर भाजपच्या आग्रहास्तव बर्‍याच दिवसांनी शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली होती. त्यानंतर ५ वर्षे भाजपविरोधात भूमिका घेऊन ते सत्तेत राहिले. कारण २०१४च्या निवडणुकीत शिवसेनेला बहुमत मिळायलाच हवे, असा भाजपविरोधी आक्रमक पवित्रा घेऊन उद्धव ठाकरे यांनी ती निवडणूक लढवली होती, पण त्यांना त्यात केवळ ६३ जागा जिंंकून आणता आल्या होता, तर भाजपला १२२ जागांवर विजय मिळाला होता. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे देहावसान झाल्यानंतरची ती पहिलीच विधानसभेची निवडणूक होती. त्यामुळे त्या निवडणुकीत शिवसेनेला मोठा प्रतिसाद मिळेल आणि भाजपचा चक्काचूर होईल, अशी उद्धव ठाकरे यांची अपेक्षा होती, पण मोदी लाटेमुळे त्यांचा मोठा अपेक्षाभंग झाला.

तो राग त्यांच्या मनात होता. त्यामुळे पुढील ५ वर्षे ते भाजपसोबत सत्तेत राहिले, पण त्यांना सुखासुखी काम करू दिले नाही. आमच्या मंत्र्यांचे राजीनामे त्यांच्या खिशात आहेत, असे ते सांगत राहिले, पण ५ वर्षे सत्तेतून बाहेर पडले नाहीत. २०१९ साली शिवसेना-भाजपची पुन्हा युती झाली, पण निवडणुकीनंतर आपल्याला मुख्यमंत्रीपद देण्याचे भाजपचे केंद्रीय नेते अमित शहा यांनी दिलेले वचन पाळले नाही, असे सांगून ते युतीतून बाहेर पडले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या कल्पकतेने साकार झालेल्या महाविकास आघाडीत सहभागी झाले आणि मुख्यमंत्रीपद मिळवले. जेव्हा आपली वेळ कठीण असते त्यावेळी आपण सबुरीने घेण्याची गरज असते, पण उद्धव ठाकरे यांचा इगो इतका टिपेला पोहोचला की त्यांनी त्यांच्या विचारसरणीशी न जुळणार्‍या पक्षांशी आघाडी केली. त्यामुळे सध्या शिवसेनेच्या ठिकर्‍या उडाल्या आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर राज ठाकरे, असे सगळ्या शिवसैनिकांना वाटत असताना बाळासाहेबांनी निर्णय फिरवून उद्धव यांच्याकडे शिवसेनेची सूत्रे दिली. त्यावेळी राज ठाकरे यांचा इगो इतका टिपेला पोहोचला की आता आपण शिवसेनेत राहण्यात काही अर्थ नाही. आपण वेगळा मार्ग धरला पाहिजे, असे त्यांनी ठरवले. त्यावेळी उद्धव यांनी राज यांना सांभाळून घेण्याची गरज होती. त्यावेळी शिवसेना फुटली आणि कोणता झेंडा घेऊ हाती, अशी कार्यकर्त्यांची आणि सामान्य मराठी माणसाची अवस्था झाली. दोन्ही भाऊ एकमेकांविरुद्ध लढत आहेत. मराठी माणसांच्या न्याय हक्कांसाठी स्थापन झालेल्या संघटनेला शीर्षस्थ नेत्यांच्या इगोचा सुरुंग लागला आहे. त्यामुळे संघटनेचा घात झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -