घरसंपादकीयअग्रलेखभाजपसाठी डोकेदुखी!

भाजपसाठी डोकेदुखी!

Subscribe

भाजपच्या मदतीने राज्यात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात असले तरी लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार. भाजपने महाविजय २०२४ चा नारा देत शिंदे समर्थक खासदारांच्याही मतदारसंघांतही संघटना बांधणीवर दिलेला जोर. मुंबई महापालिका मिळवण्यासाठी सुरू असलेली व्यूहरचना. यामुळे शिंदे गटातील खदखद खासदार गजानन कीर्तिकर यांनी जाहीरपणे सांगून टाकली. मंत्रीपदाचा दर्जा असलेले दिव्यांग समाज कल्याण विभाग देऊन बोळवण केल्याने आमदार बच्चू कडू यांनी विधानसभेच्या १५ ते २० जागा आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात लढणार असल्याचे जाहीर करत भाजपला एकप्रकारे इशारा देत उघडपणे नाराजीच व्यक्त केली आहे.

ही वाढती नाराजी भाजपसाठी डोकेदुखी ठरणार आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर सत्तेवर आलेल्या भाजपने शिंदे गटाचा वापर करून स्वतःची ताकद वाढवण्याकडे अधिक लक्ष दिले आहे. शिंदे समर्थक आमदार, खासदार उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्या विरोधात बोलण्यात गुंग आहेत. फुटीनंतर आपापले मतदारसंघ सुरक्षित राहण्यासाठी संघटनात्मक बांधणी करण्याकडे शिंदे समर्थक लक्ष देताना दिसत नाहीत. या संधीचा फायदा उचलत मार्च महिन्यात नाशिकमध्ये पार पडलेल्या दोन दिवसीय प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपने आगामी निवडणुकांसाठी ‘महाविजय २०२४’ संकल्पाची घोषणा केली.

- Advertisement -

या बैठकीतून भाजपने लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी महाविजयाचा दृढनिश्चय केला असून लोकसभेसाठी ‘मिशन ४५’, तर विधानसभेसाठी ‘मिशन २००’ जाहीर करीत राज्यात शत-प्रतिशत भाजपचा नारा दिला होता. राज्यातील निवडक मंत्री, खासदार, आमदार अशा २०० पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत भाजपच्या आगामी काळातील वाटचालीवर मंथन करण्यात आले. राज्यातील भाजपच्या विस्तारावर मंथन होऊन राज्यात २ कोटी लोकांपर्यंत पोहचण्याचा संकल्प सोडण्यात आला. बैठकीतील राजकीय ठरावानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आगामी काळात विधानसभेसाठी २०० आमदार निवडून आणण्याचा प्रस्ताव सादर केला. समाजमाध्यमांवर २५ हजार समर्थक नसल्यास उमेदवारीही दिली जाणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. विरोधक समाजमाध्यमांवर सक्रिय होऊ लागल्याने त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी कार्यकर्त्यांना सज्ज करण्याचे संदेश देण्यात आले होते.

या पार्श्वभूमीवर भाजपने जे मतदारसंघ याआधी भाजपच्या वाट्याला आलेले नाहीत, अशा राज्यातील लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केले असून बहुतांश मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार आहेत. लोकसभा मतदारसंघात कुणाचा खासदार आहे याकडे न बघता सर्वच मतदारसंघात भाजपने सारखीच तयारी केली असून तसे निर्देश देण्यात आले आहेत. बूथरचनेपासून वॉररुम उभी करण्यापर्यंतची सर्व तयारी याठिकाणी उभी केली जात आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपचे केंद्रीय मंत्री दौरा करीत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या होमग्राऊंडवरील पालघर लोकसभा मतदारसंघातही भाजपने व्यूहरचना सुरू केली आहे. या दोन्ही मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

- Advertisement -

त्यासाठी त्यांनी दौरेही सुरू केले आहेत. भाजपला मुंबई महापालिका स्वतःच्या ताब्यात घ्यायची आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जातीने लक्ष देत असून त्यांचे मुंबईतील वारंवारचे दौरे भाजपचा मनसुबा जाहीर करतात. भाजपचा मनसुबा काही शिंदे समर्थक आमदारांच्या लक्षात आला आहे. म्हणूनच शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. आम्ही १३ खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आलो आहोत. आमचा शिवसेना हा पक्ष राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष आहे, मात्र घटक पक्ष असलो तरी त्या प्रमाणात आमची कामे होत नाहीत. भाजपकडून आम्हाला अद्याप घटक पक्षाचा दर्जा मिळालेला नाही. भाजपकडून आमच्या खासदारांना सापत्न वागणूक मिळत असल्याची तक्रार आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली असल्याची माहिती गजानन कीर्तिकर यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे शिंदे गटातील खदखद आता चव्हाट्यावर येऊ लागली आहे.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना एकत्र असताना शिवसेनेने २३ आणि भाजपने २६ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी २२ जागांवर भाजपचे आणि १८ जागांवर शिवसेनेचे खासदार निवडून आले होते. आगामी लोकसभा निवडणुकीतदेखील ते सूत्र कायम राहणार असल्याचा दावा गजानन कीर्तिकर यांनी केला आहे. त्यापाठोपाठ प्रहार जनशक्ती पार्टीचे आमदार बच्चू कडू यांनीही विधानसभेच्या १५ ते २० जागा लढवणार असल्याचे सांगत लोकसभेसाठी अमरावती मतदारसंघावर दावा केला आहे. आम्ही शिंदे-फडणवीस सरकारमध्ये घटक पक्ष आहोत. मेळघाटामध्ये आमदार राजकुमार पटेल आहेत.

मी अचलपूरचा आमदार आहे. त्यामुळे अमरावतीची लोकसभेची जागा आमच्यासाठी सोडावी, अशी मागणी आम्ही करणार आहोत, असे बच्चू कडू यांचे म्हणणे आहे. अमरावतीत दोन, अकोल्यात दोन, वाशिम, नागपूर, नाशिक, सोलापूरमध्ये एक अशा १५ ते २० जागांसाठी बच्चू कडू आग्रही आहेत. आगामी निवडणुका भाजप, शिवसेना आणि प्रहार जनशक्ती एकत्र लढणार आहोत. पुढे काही वेगळा विचार ठरला तर तसा निर्णय घेतला जाईल, असे सांगत बच्चू कडू यांनी इशाराही दिला आहे. मंत्रिमंडळाचा लांबलेला विस्तार. भाजपची एकला चलोची तयारी. शिंदे गटासह सोबत असलेल्या आमदारांना दिले जाणारे दुय्यम स्थान यामुळे भाजपची डोकेदुखी नक्कीच वाढणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -