Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय अग्रलेख वानखेडेंचा फर्जीवाडा चव्हाट्यावर

वानखेडेंचा फर्जीवाडा चव्हाट्यावर

Subscribe

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यनला ड्रग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर त्याला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागितल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) मुंबईतील तत्कालीन संचालक समीर वानखेडे व अन्य दोन अधिकारी गोत्यात आले आहेत. याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला असून अनेक ठिकाणी धाडसत्र सुरू केले आहे. 2 ऑक्टोबर 2021 मध्ये कॉर्डेलिया क्रूझवर धाड टाकून ‘एनसीबी’ने आर्यन खानसह 20 जणांना अटक केली होती. या सर्वांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा त्यावेळी समीर वानखेडे यांच्याकडून करण्यात आला होता. त्यामुळे आर्यनला तब्बल एक महिना जेलमध्ये रहावे लागले होते. अटकेतील आर्यनला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागण्यात आल्याचा आरोप ‘एनसीबी’च्या पंचानेच केल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी झालेल्या चौकशीत वानखेडे गोत्यात आले आहेत. त्यांच्यासह इतर अधिकारी आणि खासगी व्यक्तींविरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल झाला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर वानखेडे यांच्या घर तसेच अन्य मालमत्तांवर सीबीआयच्या पथकाने छापे टाकले. इतर आरोपींच्या मालमत्तांवरही छापे टाकले गेले आहेत.

कॉर्डेलिया क्रूझवर धाड प्रकरणातील ‘एनसीबी’चे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी 25 कोटींची लाच मागण्यात आली. त्यातील 8 कोटी वानखेडे यांना देण्यात येणार होते. 50 लाख रुपये टोकन म्हणून घेण्यात आले, असा दावा साईल यांनी केला होता. तसेच आर्यन खानला सोडण्यासाठी शाहरुख खानची मॅनेजर पूजा दादलानी हिच्याकडे 25 कोटींची मागणी करण्यात आली आणि 50 लाख रुपये स्वीकारण्यात आल्याचाही गंभीर आरोप तेव्हा झाला होता. त्याची गंभीर दखल घेत ‘एनसीबी’च्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. आर्यन खानला अटक झाल्यापासूनच खरे तर तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंचा फर्जीवाडा सातत्याने उजेडात आणण्याचा प्रयत्न केला होता, पण मलिक यांनाच ईडीने अटक केली.

- Advertisement -

माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचे ड्रग्ज प्रकरण आणि अन्य काही प्रकरणांचाही सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर विशेष पथकाने समीर वानखेडे यांच्या विरोधात अहवाल दिला असून त्यात वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपशील असल्याचे सांगितले जाते. या अहवालाच्या आधारावर सीबीआयने समीर वानखेडे यांच्यासह एनसीबीचे तत्कालीन अधीक्षक विश्व विजय सिंह, एनसीबीचे तत्कालीन गुप्तचर अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांच्यासह एनसीबीचा पंच के. पी. गोस्वामी आणि सॅन्व्हिल डिसुजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि पाठोपाठ छापे टाकले. सीबीआयने वानखेडे यांचे घर, कार्यालयातील दस्तऐवज तपासले व त्यांच्या घराचीही झडती घेतली. विशेष पथकाने आर्यन खान याच्यासह सहाजण पुराव्यांअभावी निर्दोष सुटले. यात एनसीबीच्या सात ते आठ अधिकार्‍यांची भूमिका संशयास्पद होती, असाही निष्कर्ष काढल्याने वानखेडे यांची एनसीबीतून बदली करून वानखेडेंना आर्यन खान प्रकरणातून बाजूला काढण्यात आले होते. वानखेडे यांच्या बदलीनंतर पुन्हा झालेल्या चौकशीत आर्यन खान निर्दोष असल्याचे समोर आले होते. आर्यन प्रकरणाचा पुन्हा तपास करणार्‍या एनसीबीचे उपमहासंचालक संजय कुमार सिंग यांच्या नेतृत्वाखालील विशेष तपास पथकाला (एसआयटी) आर्यन खान या प्रकरणात मोठा भाग असल्याचा पुरावा सापडला नाही. एसआयटीने गेल्यावर्षी मे महिन्यात 14 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. त्यावेळीच आर्यन खानला क्लीन चिट देण्यात आली होती.

एनसीबीच्या मुंबई विभागाचे प्रमुख असताना वानखेडे यांनी अनेकांना खोट्या गुन्ह्यात अडकवून भ्रष्टाचार केल्याचे गंभीर आरोप आहेत. एनसीबीच्या दिल्ली मुख्यालयाने याची गंभीर दखल घेत एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंग यांच्या विशेष पथकाची स्थापना केली होती. एनसीबी दक्षता समितीच्या पथकानेही वानखेडे यांची चौकशी केली. त्यात सर्वाधिक गाजलेले आर्यन खानचे कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्स प्रकरण होते. माजी मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाचे ड्रग्ज प्रकरण आणि अन्य काही प्रकरणांचाही सखोल तपास करण्यात आला. त्यानंतर विशेष पथकाने समीर वानखेडे यांच्या विरोधात अहवाल दिला असून त्यात वानखेडे यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा तपशील असल्याचे सांगितले जाते. या अहवालाच्या आधारे समीर वानखेडे यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर सीबीआयने सुरू केलेल्या कारवाईमुळे नवाब मलिक करत असलेल्या आरोपांना आता पुष्टी मिळू लागली आहे. खरे तर नवाब मलिक समीर वानखेडेंचा फर्जीवाडा चव्हाट्यावर आणू पहात होते. त्यासाठी त्यांनी अनेक पुरावेही सादर केले होते, पण त्यावेळी भाजपकडून वानखेडेंना पाठीशी घालण्याचाच प्रयत्न झाला. त्यानंतर काही दिवसातच ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. परिणामी समीर वानखेडेंविरोधात बोलणारे कुणीच राहिले नाही. जातीचा दाखल्यांसह इतरही अनेक प्रकरणात वानखेडेंवर आरोप झाले. एनसीबीमधून वानखेडेंची डायरेक्टर जनरल ऑफ टॅक्सपेयर्स सर्व्हिसेसच्या चैन्नई येथील कार्यालयात बदली करण्यात आली होती, तर मुंबईत वानखेडेंच्या समर्थनार्थ भाजपच्या नेत्यांनी आंदोलने केली होती. त्यामुळे सत्ताधार्‍यांचा त्यांना वरदहस्त असावा असा संशय येऊ लागला होता. सीबीआयच्या चौकशीत वानखेडेंनी 25 कोटी रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे राज्यातील भाजप नेते तोंडघशी पडले आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -