घरसंपादकीयओपेडराजकीय पार्श्वभूमीच्या हिंसाचारामुळे समाजात चिंता!

राजकीय पार्श्वभूमीच्या हिंसाचारामुळे समाजात चिंता!

Subscribe

महाराष्ट्रात एकापाठोपाठ एक अशा खुनाखुनीच्या धक्कादायक घटना घडत आहेत. बेधडक कायदा हाती घेतला जात आहे. राजकारणाचे गुन्हेगारीकरण मोठ्या प्रमाणावर होत असल्याचे चित्र आहे. काही ठिकाणी राजकीय नेते आणि गुन्हेगारांचे कनेक्शन समोर येत आहे. त्यामुळे गुन्हेगारांना राजाश्रय मिळत आहे का? याला नेमके जबाबदार कोण? असे गहन प्रश्न उभे राहिले आहेत. मतदार म्हणून आपल्यालाच यावर विचार करावा लागेल. गँगस्टरऐवजी खुद्द राजकारण्यांच्या हाती शस्त्रे दिसत आहेत. त्यामुळे त्यांना नेमका आळा कसा आणि कोण घालणार? आणि खरोखरंच आळा बसणार आहे का? भविष्यात सर्वसामान्य माणूसदेखील सुरक्षित राहील का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. राजकीय नेत्यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्यक्त होणार्‍यांच्या मागे कायद्याचा ससेमिरा लावला जातो. ही राजकीय नेत्यांची अप्रत्यक्ष गुंडगिरी म्हणावी लागेल.

सर्वसामान्यांसमोर गाड्यांचा एक जत्था थांबतो आणि त्यातील एका गाडीतून एक बाहुबली नेता उतरतो. त्याच्या खांद्याला बंदूक आहे आणि दुसर्‍या गाडीतून हातात दंडुके घेतलेले त्याचे पाळलेले गुंड. हे चित्र भलेही चित्रपटात पाहात असलो तरी अलीकडेच घडत असलेल्या घटनांवरून महाराष्ट्रातही असेच पाहायला मिळेल का, अशी भीती वाटू लागली आहे. जनतेचे सेवक म्हणवणारे राजकारणी खिशात बंदूक घेऊन फिरत आहेत. आपल्या राजकीय वैर्‍याला संपविण्यासाठी बेधडकपणे त्याचा वापर करत आहे. अगदी कायद्याचे रक्षक समजल्या जाणार्‍या पोलिसांसमोरच एखाद्यावर गोळ्या झाडल्या जातात, सोशल मीडियाच्या माध्यमातून असे काही घडवून आणायचे एवढेच सुरू आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात तर कोणाला लपवायचे आणि कोणाला झाकायचे, असा प्रश्न पडायला लागला आहे. प्रत्येक पक्षातील कोणत्या ना कोणत्या नेत्याची दबंगगिरी सुरूच आहे किंवा गुन्हेगारांशी कनेक्शन दिसतच आहेत. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाबाहेर आढळलेली स्फोटके आणि व्यावसायिक मनसुख हिरेन याची हत्या तसेच खंडणीप्रकरणी सध्या कारागृहात असलेला वादग्रस्त माजी पोलीस अधिकारी सचिन वाझे याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाशी घनिष्ठ संबंध असल्याचे समोर आले होते. त्याच्यावर कारवाई करण्याची मागणी तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केल्यावर सचिन वाझे ओसामा बिन लादेन असल्यासारखे विरोधी पक्ष बोलत असल्याची टिप्पणी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. याआधी २००३ मध्ये ख्वाजा युनूस या संशयिताच्या तुरुंगात झालेल्या मृत्यू प्रकरणातदेखील सचिन वाझे याचे नाव गुंतले होते. असे असतानाही २००७ मध्ये त्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता हे उल्लेखनीय.

- Advertisement -

म्हणजेच खाकी वर्दीतील गुंडगिरी पोसली जात होती, हाच त्यातून अर्थ निघतो, मात्र यामुळे इतर पक्षातील नेते धुतल्या तांदळासारखे आहेत, असे म्हणता येणार नाही. जून २०२२ मध्ये शिवसेनेत बंड झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात नवे सरकार स्थापन झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणार्‍या आमदारांची खुलेआम दबंगगिरी सुरू झाली. यात पहिले नाव घ्यावे लागेल ते आमदार संतोष बांगर आणि पणनमंत्री अब्दुल सत्तार यांचे. संतोष बांगर यांनी एका उपहारगृहाच्या व्यवस्थापकाला तसेच एका महाविद्यालयाच्या प्राचार्याला मारहाण केली. इतकेच काय राज्यसभेचे प्रतिनिधित्व करणार्‍या संजय राऊत यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करतानाच त्यांच्या कानशिलात मारण्याची भाषाही त्यांनी केली आहे.

अब्दुल सत्तार हे कायमच वादग्रस्त राहिले आहेत. त्यांनीदेखील थेट खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल अर्वाच्च भाषेत टीका केली होती. अलीकडे एका जाहीर कार्यक्रमात आपल्याच मतदारसंघातील नागरिकांवर लाठीमार करण्याचे आदेश त्यांनी पोलिसांना दिले होते. ‘गोंधळ घालणार्‍यांना कुत्र्यासारखं मारा, त्यांचं कंबरडं मोडा, एक हजार पोलिसांचा बंदोबस्त असून पन्नास हजार लोकांना मारायला काय हरकत आहे,’ असे तारेही त्यांनी तोडले होते. अशा लोकप्रतिनिधी अजूनही उजळमाथ्याने फिरत आहेत, हेच जनतेचे दुर्दैव. आता तर दहिसरमधील दोन नेत्यांमधील जीवघेणा संघर्ष समोर आला आहे. दहिसरमध्ये माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार करण्यात आला. मॉरिस नोरोन्हाने अभिषेक घोसाळकर यांना आपल्याच कार्यालयात एका कार्यक्रमासाठी बोलावले होते. यावेळी फेसबुक लाइव्ह केल्यानंतर अभिषेक घोसाळकर यांच्यावर मॉरिसने गोळ्या झाडल्या, त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर मॉरिसने स्वत:वरही गोळ्या झाडून आत्महत्या केली.

- Advertisement -

शिंदे गटाचेच आमदार सदा सरवणकर यांच्यावर तर थेट गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये प्रभादेवी परिसरात गणपती विसर्जनादरम्यान ठाकरे गट आणि शिंदे गटात वाद निर्माण झाला होता आणि त्यातूनच आमदार सदा सरवणकर यांनी शिवसेना विभागप्रमुख महेश सावंत यांच्यासह शिवसैनिकांना बंदुकीचा धाक दाखवून गोळीबार केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला होता. तथापि, सदा सरवणकर यांच्या बंदुकीतून गोळीबार झाला, पण तो त्यांनी केला नसल्याचे पोलीस अहवालात नमूद करण्यात आले आहे. तर, अन्य एक आमदार प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांच्यासह चार जणांविरोधात व्यावसायिकाचे अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

शिस्तीत वागणारा, साधनशुचिता सांभाळणारा पक्ष म्हणून ओळखल्या जाणार्‍या भाजपाचीही कथा यापेक्षा वेगळी नाही. याच पक्षाचा आमदार सुनील कांबळे यांनी भर कार्यक्रमात एका पोलीस कॉन्स्टेबलच्या श्रीमुखात लगावली. तर, दुसरा आमदार गणपत गायकवाड याने पोलीस चौकीत पिस्तुल काढत शिंदे गटातील पदाधिकारी महेश गायकवाड याच्यावर गोळी झाडली. एका जमिनीच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला. त्यावेळी त्यांनी राज्यात फोफावत असलेल्या गुन्हेगारीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच ठपका ठेवला आहे. मुख्यमंत्री शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे राज्य घडवण्याचे काम करत आहेत. त्यांनी एकनाथ शिंदे यांनी असेच गुन्हेगार राज्यभरात पाळून ठेवले आहेत.

आमच्यासारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदे यांनी गुन्हेगार बनवले आहे, असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. हे सर्व धक्कादायकच आहे. विशेष म्हणजे, ज्या अधिकार्‍याच्या समोर ही घटना घडली, ना तो चौकशीच्या फेर्‍यात अडकला आहे, ना त्याची बदली झाली आहे. मग हे नेमके कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे. मुळात पोलिसांचा आता धाकच राहिला नाही, हेच छोट्या-छोट्या घटनांमधून समोर येत आहे. साधे उदाहरण द्यायचे झाले तर, रस्त्यावरील दुचाकीस्वारांचे देता येईल. एकेकाळी समोर पोलीस दिसल्यावर चुकीच्या लेनने किंवा ट्रिपल सीट जाणारे दुचाकीस्वार लगेचच मागे फिरत असत. पण आता थेट पोलिसांसमोरूनच ते पुढे जातात. एखाद्या कर्तव्यदक्ष पोलिसाने अशा दुचाकीस्वाराला अडवलेच तर, थेट त्याच्यावर हात उचलला जातो. हे झाले, सर्वसामान्यांचे. नामचीन गुंडांच्या लेखी पोलिसांचे किती महत्त्व असेल, हे वेगळे सांगायची गरज नाही.

पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची हत्या झाल्यानंतर भाजपा आमदार नितेश राणे यांनी मोहोळच्या पत्नीची भेट घेऊन सांत्वन केले. त्यानंतर ‘पोलीस माझे काही वाकडे करू शकणार नाहीत, आपला बॉस (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस) सागर बंगल्यावर बसला आहे,’ असेही वक्तव्य करण्यासाठी ते धजावले. यातून काय अर्थ घ्यायचा. अट्टल गुन्हेगार असिफ महंमद इक्बाल शेख ऊर्फ असिफ दाढीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याचा फोटो व्हायरल झाला होता. त्यांचा पुत्र पार्थ पवार यांचाही असाच एक फोटो अलीकडेच समोर आला होता. पार्थ पवार यांनी पुण्यातील कुख्यात गुंड गजानन ऊर्फ गजा मारणे याची त्याच्या घरी जाऊन भेट घेतली होती. पुण्यात अलीकडे वाढलेल्या गुन्हेगारीला यामुळेच पाठबळ मिळत आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येणारच! याउलट या राजकारण्यांच्या विरोधात सोशल मीडियावर व्यक्त होणार्‍याच्या मागे कायद्याचा ससेमिरा लावला जातो, हेही वास्तव नाकारता येणार नाही. गेल्या तीन-चार वर्षांतील घटना हेच सांगतात. ही सुद्धा राजकारण्यांची अप्रत्यक्ष गुंडगिरी म्हणावी लागेल. अगदी ग. दि. माडगुळकरांच्या शब्दांत सांगायचे झाले तर, ‘लबाड जोडिती इमले-माड्या, गुणवंतांना मात्र झोपड्या; पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार…’ असेच म्हणावे लागेल.

एकेकाळी, मुंबई टोळीयुद्धाने वारंवार हादरत होती. पण १९९५ ला शिवसेना-भाजपाची सत्ता आल्यानंतर या टोळीयुद्धाला पायबंद घालण्यासाठी पावले उचलली होती. त्यांनी पोलिसांना पूर्णपणे मोकळीक दिली होती. परिणामी, त्यावेळी पोलिसांनी ‘एन्काऊंटर’चे हत्यार उपसले आणि गुन्हेगारांना थेट यमसदनी पाठविण्यास सुरुवात केल्याने अनेक गुंडांनी इतर देशांमध्ये आश्रय घेतला. अशा रीतीने मुंबईत पुन्हा एकदा शांतता प्रस्थापित झाली. पण आता जवळपास २५-२७ वर्षांनी गुन्हेगारांनी पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. योगायोगाने सत्तेत शिवसेना आणि भाजपा (सोबत राष्ट्रवादी काँग्रेस) हेच पक्ष आहेत. पण गँगस्टरऐवजी खुद्द राजकारण्यांच्या हाती शस्त्रे दिसत आहेत. त्यामुळे त्यांना नेमका आळा कसा आणि कोण घालणार? आणि खरोखरंच आळा बसणार आहे का? भविष्यात सर्वसामान्य माणूसदेखील सुरक्षित राहील का? असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -