घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

तो महाप्रलयजलधरु | जैसा घडघडिला गंहिरु | तंव अनंतविजयो युधिष्ठिरु | आस्फुरित असे //
त्या शंखाचा भयंकर ध्वनी महाप्रलयकालच्या मेघगर्जनेप्रमाणे होत असतानाच धर्मराजाने अनंतविजय नामक शंख वाजविला.
नकुळें सुघोषु | सहदेवें मणिपुष्पकु | जेणें नादे अंतकु | गजबजला ठाके //
नकुलाने सुघोष नावाचा आणि सहदेवाने मणिपुष्पक नावाचा शंख वाजविला. त्या नादाने प्रत्यक्ष यमही घाबरला!
तेथ भूपति होते अनेक | द्रुपद द्रौपदेयादिक | हा काशीपति देख | महाबाहू //
द्रुपद राजा, महावीर काशिराजा, द्रौपदीचे पुत्र इत्यादी अनेक राजे व वीर त्या ठिकाणी जमले होते;
तेथ अर्जुनाचा सुतु | सात्यकि अपराजितु | धृष्टद्युम्नु नृपनाथु शिखंडी हन //
त्याचप्रमाणे अर्जुनाचा मुलगा अभिमन्यु, अजिंक्य असा सात्यकि, नृपश्रेष्ठ, धृष्टद्युम्न, शिखंडी,
विराटादि नृपवर | जे सैनिक मुख्य वीर | तिहीं नानाशंख निरंतर | आस्फुरिले //
त्याचप्रमाणे विराट व इतर जे जे सेनानायक होते, तेहि आपापले वेगवेगळ्या तर्‍हेचे शंख एकासारखे वाजवू लागले.
तेणें महाघोषनिर्घातें | शेष कूर्म अवचितें | गजबजोनि भूभारातें | सांडूं पाहती //
त्या शंखाच्या महाध्वनीच्या आघाताने शेष व कूर्म दचकले आणि पृथ्वीचा भार टाकून देण्यास सिद्ध झाले.
तेथ तिन्ही लोक डळमळित | मेरु मांदार आंदोळित समुद्रजळ उसळत | कैलासवेरी //
त्या योगाने त्रैलोक्य डळमळू लागले. मेरु व मांदार हे हालू लागले. समुद्राचे पाणी कैलासापर्यंत उसळले.
पृथ्वीतळ उलथों पहात | आकाश असे आसुडत | तेथ सडा होत | नक्षत्रांचा //
पृथ्वी पालथी होते की काय व आकाश कोसळून पडते की काय असे वाटू लागले आणि उल्कापात होऊ लागला !

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -