घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

म्हणौनि कौरव हे वधिजती । मग आम्हीं भोग भोगिजती । हे असो मात अघडती | अर्जुन म्हणे //
म्हणून देवा, या कौरवांचा वध करावा आणि मग आम्ही राज्याचा उपभोग घ्यावा या न घडणार्‍या गोष्टींचे तर नावच घेऊ नका, असे अर्जुन म्हणाला.
हे अभिमानमदें भुलले | जरी पां संग्रामा आले | तर्‍ही आम्हीं हित आपुलें | जाणावें लागे //
हे कौरव अभिमानाने उन्मत्त होऊन जरी युद्ध करण्यास आले आहेत तरी आम्हाला आपले हित पाहिले पाहिजे.
हें ऐसें कैसें करावें? । जे आपले आपण मारावे? । जाणत जाणतांचि सेवावें । काळकूट //
आपले नातेवाईक आपणच मारावे ही गोष्ट कशी करावी? असे पहा की, समजून उमजून कालकूट विष कसे घ्यावे?
हां जी मार्गीं चालतां । पुढां सिंहृु जाहला अवचिता । तो तंव चुकवितां। लाभु आथी //
अहो, वाट चालत असताना जर अकस्मात आपल्या समोर सिंह आला, तर त्याला चुकवून जाणे हेच श्रेयस्कर आहे.
असता प्रकाश सांडावा । मग अंधकूप आश्रावा । तरी तेथ कवणु देवा | लाभु सांगें? //
प्रकाशात बसण्याऐवजी मुद्दाम अंधारकोठडीत जाऊन बसावे यात कोणता लाभ आहे, ते देवा सांगा बरे.
कां समोर अग्नि देखोनी। जरी नवचिजे वोसंडोनी । तरी क्षणा एका कवळूनी | जाळूं सके //
किंवा समोर विस्तव पेटला आहे असे पाहून जर आपण त्यास सोडून दूर न झालो, तर एका क्षणांत तो आपल्यास सभोवार वेढून जाळू शकेल.
तैसे दोष हे मूर्त। अंगीं वाजों असती पहात। हें जाणतांही केवीं एथ । प्रवर्तावें? //
त्याप्रमाणे हे दोष आम्हाला प्रत्यक्ष लागू पाहात आहेत, असे कळल्यावरही आम्ही हे युद्ध करण्यास कसे प्रवृत्त व्हावे?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -