घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

ऐसें पार्थु तिये अवसरीं । म्हणे देवा अवधारीं । या कल्मषाची थोरी। सांगेन तुज //
त्या वेळी इतके बोलून अर्जुन श्रीकृष्णास म्हणाला, देवा, हे पातक केवढे मोठे आहे, ते मी तुला सांगतो, ऐक
जैसें काष्ठें काष्ठ मथिजे । तेथ वन्हि एक उपजे । तेणें काष्ठजात जाळिजे । प्रज्वळलेनि //
ज्याप्रमाणे लाकडावर लाकूड घासले असता त्यापासून अग्नी उत्पन्न होतो आणि त्याचा भडका झाला म्हणजे सर्व लाकडे जळून जातात,
तैसा गोत्रींची परस्परें । जरी वधु घडे मत्सरें। तरी तेणें महादोषें घोरें। कुळचि नाशे //
त्याप्रमाणे कुलांतील लोकांनी मत्सराने एकमेकांचा जर वध केला, तर त्या भयंकर महादोषामुळे सर्व कुलाचा नाश होईल.
म्हणौनि येणें पापें | वंशजधर्मु लोपे | मग अधर्मुचि आरोपे। कुळामाजीं //
म्हणून या कुलनाशाच्या पापापासून कुलधर्माचा लोप होतो आणि मग त्या कुलांत अधर्माचा प्रवेश होतो.
एथ सारासार विचारावें । कवणें काय आचरावें । आणि विधिनिषेध आघवे । पारुषती //
असे झाल्यावर मग सारासार विचार, योग्यायोग्य आचरण, कर्तव्याकर्तव्य वगैरे नष्ट होतात.
असता दीपु दवडिजे । मग अंधकारीं राहाटिजे ।तरी उजूचि कां अडळिजे । जयापरी ॥
जवळ असलेला दिवा मालवून मग अंधारात वावरू लागले, तर ज्याप्रमाणे सरळ चालले असता अडखळण्याचा प्रसंग येतो,
तैसा कुळीं कुळक्षयो होय । तये वेळीं तो आद्यधर्मु जाय ।मग आन कांहीं आहे । पापावांचुनी?॥
त्याप्रमाणे ज्यावेळी कुलक्षय होतो त्यावेळी कुळात पहिल्यापासून चालत आलेल्या धर्माचा लोप होतो. मग तेथे पापावाचून दुसरे काय असणार?
जैं यमनियम ठाकती । तेथ इंद्रिये सैरा राहाटती । म्हणौनि व्यभिचार घडती । कुळस्त्रियांसी ॥
ज्यावेळी इंद्रिये व मन यांचा निग्रह थांबतो, त्यावेळी इंद्रिये स्वैर सुटतात आणि मग सहजच कुलीन स्त्रियांच्या हातून व्यभिचार घडतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -