घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

पाहें पां ऐसें हन आहे । कीं तो आकारुचि जाये । येर गगन तें गगनींचि आहे । घटत्वाहि आधीं ॥
पहा, खरी गोष्ट अशी आहे की, त्या घटाच्या आकाराचाच नाश होतो; एर्‍हवी घटाकाश हे घट निर्माण होण्याचे पूर्वीपासून मूळचेच आकाशरूपी आहे.
ऐसिया बोधाचेनि सुरवाडें । मार्गामार्गाचें सांकडे । तयां सोहंसिद्धां न पडे । योगियांसी ॥
अशा ज्ञानाच्या परिपूर्णतेने आपण ब्रह्मच आहो, असा अनुभव आलेल्या योग्यास चांगल्या व वाईट मार्गाचे संकट पडत नाही.
याकारणें पंडुसुता । तुवां होआवें योगयुक्ता । येतुलेनि सर्वकाळीं साम्यता । आपैसया होईल ॥
यास्तव हे पंडुसुता, तू योगयुक्त हो. त्या योगाने तुला नेहमी आपोआप ब्रह्मस्वरूपता प्राप्त होईल.
मग भलतेथ भलतेव्हां । देह असो अथवा जावा । परि अबंधा नित्य ब्रह्मभावा । विघडु नाहीं ॥
मग वाटेल त्या ठिकाणी व वाटेल तेव्हा देह असो वा जावो, परंतु निष्प्रतिबंध व नित्य अशा परब्रह्मस्वरूपाला अंतर पडणार नाही.
तो कल्पादि जन्मा नागवे । कल्पांतीं मरणें नाप्लवे । माजीं स्वर्गसंसाराचेनि लाघवें । झकवेना ॥
तो सृष्टीच्या आरंभी जन्माला येत नाही, सृष्टीच्या अंती मरण पावत नाही व सृष्टीच्या स्थितीत स्वर्ग व संसारसुख यांच्या मोहाने कधी फसत नाही.
येणें बोधें जो योगी होये । तयासीचि या बोधाचें नीटपण आहे । कां जे भोगातें पेलूनि पायें । निजरूपा ये ॥
या बोधानेच जो योगी सावध असतो, त्यालाच या बोधाची फलप्राप्त होते. कारण, तो विषयोपभोगाला ओलांडून ब्रह्मरूपाला मिळतो.
पै गा इंद्रादिकां देवां । जयां सर्वस्वें गाजती राणिवा । तें सांडणें मानूनि पांडवा । डावली जो ॥
हे पहा, अर्जुना, इंद्रादिक देवांना स्वर्गात नित्य सर्व प्रकारचे सुखांचा उपभोग मिळतो. ते सुख ओवाळून टाकलेल्या पदार्थाप्रमाणे त्याज्य मानून तो दूर लोटतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -