घरसंपादकीयवाणी संतांचीवाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

बाहेरी यमनियमांची कांटी लाविली । आंतु वज्रासनाची पाळी पन्नासिली । वरी प्राणायामाचीं मांडिलीं ।
वाहातीं यंत्रें ॥
यापुढे महाराज क्रमाने अष्टांग योगाचे वर्णन करितात- बाहेरून यमनियमांचे कुंपण लावून आत मूळबंधाचा, वज्रासनाचा कोट तयार करितात व त्यावर प्राणायाम रूप सतत चालू असणार्‍या तोफा ठेवतात.
तेथ उल्हाट शक्तीचेनि उजिवडें । मन पवनाचेनि सुरवाडें । सतरावियेचे पाणियाडें । बळियाविलें ॥
मग कुंडलिनी ऊर्ध्वमुख होऊन तिच्या प्रकाशाने मन व प्राण यांच्या अनुकूलतेने चंद्रामृताचे सतराव्या कलेचे तळे स्वाधीन करून घेतात.
तेव्हां प्रत्यहारें ख्याती केली । विकारांची सपिली बोहलीं । इंद्रियें बांधोनि आणिलीं । हृदयाआंतु ॥
त्या वेळी प्रत्याहार हा मोठ्या पराक्रमाने कामक्रोधादी विकारांचा परिवारासह फडशा पाडतो आणि इंद्रिये बांधून हृदयात आणतो.
तंव धारणावारू दाटिन्नले । महाभूतांतें एकवटिलें । मग चतुरंग सैन्य निवटिलें । संकल्पाचें ॥
इतक्यात धारणारूप घोडेस्वार हे हल्ला करून पंचमहाभूतांचे ऐक्य करितात व संकल्पाचे चतुरंग सैन्य (मन, बुद्धि, चित्त व अहंकार) नाहीसे करितात.
तयावरी जैत रे जैत । म्हणोनि ध्यानाचें निशाण वाजत । दिसे तन्मयाचें झळकत । एकछत्र ॥
नंतर ‘जिंकले रे जिंकले’ असे म्हणून ध्यानाचा डंका वाजू लागतो व तद्रूपतेचे एक छत्र झळकत असलेले दिसते.
पाठीं समाधिश्रियेचा अशेखा । आत्मानुभव राज्यसुखा । पट्टाभिषेकु देखा । समरसें जाहला ॥
मागाहून समाधिरूप लक्ष्मीचा अखंड आत्मानुभवरूपी राज्यसुखाच्या ब्रह्मरूप ऐक्यतेने पट्टाभिषेक होतो.
ऐसें हें गहन । अर्जुना माझें भजन । आतां ऐकें सांगेन । जे करिती एक ॥
हे अर्जुना, असे जे माझे कठीण भजन ते कोण करतात हे तुला सांगितले. आता याशिवाय दुसरे भजन करणारे कोण आहेत, ते ऐक.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -