घरवाणी ज्ञानेश्वरांची
Array

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

अर्जुना वेद विद जर्‍ही जाहला । तरी मातें नेणतां वायां गेला । कणु सांडनि उपणिला । कोंडा जैसा ॥
अर्जुना, ज्याप्रमाणे धान्य काढून घेतलेला कोंडा उफणला असता व्यर्थ होतो, त्याप्रमाणे वेदार्थज्ञानी जरी झाला, तरी मला जाणल्याशिवाय त्याचा जन्म व्यर्थ होय.
म्हणौनि मज एकेंविण । हे त्रयीधर्म अकारण । आतां मातें जाणोनि कांहीं नेण । तूं सुखिया होसी ॥
म्हणून माझ्या एकट्याशिवाय हे तिन्ही वेदोक्त धर्म व्यर्थ आहेत, तेव्हा आता मलाच जाण, दुसरे काही मनात आणू नको, म्हणजे सुखी होशील.
पैं सर्वभावेंसी उखितें । जे वोपिले मज चित्तें । जैसा गर्भगोळु उद्यमातें । कोणाही नेणे ॥
हे पाहा, ज्यांनी आपले चित्त सर्वभावे करून माझ्याच ठिकाणी उक्ते विकले आहे, ज्याप्रमाणे गर्भातील गोळा कोणताही उद्योग करावयाचे जाणत नाही.
तैसा मीवांचूनि कांहीं । आणीक गोमटेंचि नाहीं । मजचि नाम पाहीं । जिणेंया ठेविलें ॥
त्याप्रमाणे ज्यांना माझ्यावाचून दुसरे काहीच चांगले दिसत नाही व ज्यांनी माझ्याकरिता आपला जीव ठेवला आहे.
ऐसे अनन्यगतिकें चित्तें । चिंतितसांतें मातें । जे उपासिती तयांतें । मीचि सेवीं ॥
अशा प्रकारे एकनिष्ठ अंतःकरणाने जे माझे चिंतन करून माझी सेवा करितात, त्यांची सेवा मीच करितो.
ते एकवटूनि जिये क्षणीं । अनुसरले गा माझिये वाहणीं । तेव्हांचि तयांची चिंतवणी । मजचि पडली ॥
ते ऐक्यतेस पावून ज्या वेळेस माझ्याच भजनी लागले, त्याच वेळेस त्यांची चिंता मला पडते.
मग तीहीं जें जें करावें । तें मजचि पडिलें आघवें । जैसी अजातपक्षाचेनि जीवें । पक्षिणी जिये ॥
मग जे जे काही करण्याचे ते मनात आणतात, ते सर्व मला करावे लागते. ज्याप्रमाणे पंख न फुटलेल्या जीवनाकरिता पक्षीणच सारखी खटपट करीत असते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -