Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर संपादकीय वाणी संतांची वाणी ज्ञानेश्वरांची

वाणी ज्ञानेश्वरांची

Subscribe

याकारणें पार्था । होआवी कर्मीं आस्था । हे आणिकाहि एका अर्था । उपकारैल ॥
याकरिता पार्था, कर्माचे ठिकाणी तू आस्था ठेव. कारण त्यापासून आणखीही एक उपयोग होणार आहे;
जे आचरतां आपणपेयांज । देखी लागेल लोका यया । तरी चुकेल अपाया । प्रसंगेंचि ॥
त्या कर्माचे आपल्याकडून तसे आचरण झाले असता या लोकांना वळण लागेल आणि त्यामुळे त्यांची दुःखे अनायासे नाहीशी होतील.
देखैं प्राप्तार्थ जाहले । जे निष्कामता पावले । तयांही कर्तव्य असे उरलें । लोकांलागीं ॥
असे पहा की, जे कृतार्थ होऊन निष्काम झाले आहेत, त्यांनाही लोकांवर उपकार करण्याचे कर्तव्य राहिलेच आहे.
मार्गीं अंधासरिसा । पुढा देखणाही चाले जैसा । अज्ञाना प्रगटावा धर्मु तैसा । आचरोनी ॥
अंधळ्यांच्या रांगेतील पुढारी डोळस मनुष्य जसा त्यांच्याप्रमाणेच मार्ग चालतो, त्याचप्रमाणे ज्ञान्यांनी स्वत: धर्माचे आचरण करून अज्ञानी जनास धर्माचे मार्गास लावावे.
हां गा ऐसें जरी न कीजे । तरी अज्ञानां काय उमजे? । तिही कवणेपरी जाणिजे । मार्गातें या?॥
अरे, जर ज्ञान्यांनी अशाप्रकारचे वर्तन केले नाही, तर अज्ञानी लोकास कसे कळेल? आणि त्यांना हा मार्ग कोणत्या उपायाने समजेल?
एथ वडील जें जें करिती । तया नाम धर्मु ठेविती । तेंचि येर अनुष्ठिती । सामान्य सकळ ॥
या लोकी श्रेष्ठ लोक जे आचरण करितात, त्यालाच धर्म असे नाव ठेवून इतर सर्व लोक त्याचेच आचरण करितात.
हें ऐसें असे स्वभावें । म्हणौनि कर्म न संडावें । विशेषें आचरावें लागें संतीं ॥
स्वभावत:च हे असे आहे, म्हणून कर्माचा त्याग करू नये आणि साधुसंतांना तर कर्माचे आचरण विशेषकरून करावे लागते.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -