घरमनोरंजनदादासाहेब फाळके गौरव

दादासाहेब फाळके गौरव

Subscribe

‘भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक’ म्हणून दादासाहेब फाळके यांचे नाव गौरवाने घेतले जाते. आज लाखो कर्मचारी या उद्योगावर अवलंबून आहेत. एकंदरीत भारतीय चित्रपटसृष्टीची प्रदीर्घ कारकीर्द लक्षात घेता चित्र हालचाली, मूकपट, मूकपटाबरोबर प्रत्यक्ष संगीत, वादन व गायन असा प्रवास करत कृष्ण-धवल युगाने भारतीय चित्रपटसृष्टीला वेग दिला आणि आज रंगीत युगाच्या माध्यमातून जगभरातल्या चित्रपटाबरोबर भारतीय चित्रपटाचेही नाव गौरवाने घेतले जाते. ही अनमोल कामगिरी दादासाहेब फाळके यांनी काही दशकांपूर्वी केली आणि त्याचा आनंद प्रेक्षक घेत आहेतच, परंतु कलाकार, तंत्रज्ञ यांच्या कलात्मक दर्जाचे कौतुकही होत आहे. स्मृतीदिनाचे आणि जयंतीचे निमित्त घेऊन निदान वर्षातून दोनदा तरी फाळकेंच्या नावाने कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. एका मराठी माणसाने रोवलेली मुहूर्तमेढ अमराठी लोकांकडूनसुद्धा तेवढीच विकसित केली जात आहे हे विशेष म्हणावे लागेल. १६ फेब्रुवारी हा दादासाहेबांचा ‘स्मृतीदिन’ आहे. या निमित्ताने २० फेब्रुवारीला भव्यदिव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाणार आहे.

दादासाहेब फाळके यांनी फक्त चित्रपट निर्मितीच केली नाही तर दिग्दर्शनाबरोबर तांत्रिक व्यवस्थेलाही एक वेगळी दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. चित्रपट निर्मिती म्हटल्यानंतर त्या अनुषंगाने अनेक गोष्टी एकत्र येतात आणि त्यातून तुम्हाआम्हाला आनंद देणार्‍या एका चांगल्या कलाकृतीची निर्मिती होते. सामूहिकपणे घडवला जाणारा हा कलाविष्कार सर्वांसाठी गौरवशाली व्हावा यासाठी दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म्स महोत्सवाच्यावतीने फाळके पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले जाते. राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते यात सक्रिय होतातच. परंतु बॉलिवूड कलाकारही मोठ्या संख्येने या सोहळ्याला उपस्थित असतात. करिना कपूर, संजय दत्त, सनी लिओनी, सोनम कपूर, मलायिका अरोरा, गोविंदा, शिल्पा शेट्टी, अनिल कपूर, सारा अली खान यांनी येण्याचे मान्य केलेले आहे. बाराव्या पर्वातील ‘बिग बॉस’चे सहभागी कलाकार एकत्रितपणे या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -