‘गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार’ प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन

२०१५मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले

Famous violin artist and musician Prabhakar Jog passed away
'गाणाऱ्या व्हायोलिनचे जादूगार' प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन

प्रसिद्ध व्हायोलिनवादक प्रभाकर जोग यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८९ वर्षांचे होते. पुण्याच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रविवारी दुपारी ११ ते ४ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर पुण्यातील वैकुंठधामात अत्यसंस्कार केले जाणार आहेत.  प्रभाकर जोग यांच्या जाण्याने संगीत क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.  प्रभाकर जोग यांनी सहा दशकांहून अधिक काळ व्हायोलिन वादक म्हणून आपली कारकीर्द गाजवली. व्हायोलिन तसेच संगीतकार आणि संगीत संयोजक म्हणून त्यांनी मराठीच नाही तर हिंदी सिनेसृष्टीवर आपली छाप सोडली.  प्रभाकर जोग यांना वादनातून गाण्याचे शब्द ऐकू येतात असे म्हटले जायचे म्हणूनच त्यांना ‘गाणाऱ्या व्हायोलिनचा जादूगार’, असे म्हटले जायचे. तर त्यांचे चाहते त्यांना प्रेमाने ‘जोगकाक’ असे म्हणायचे. प्रसिद्ध गीतरामायणात प्रभाकर जोग यांच्या व्हायोलिनच्या आवाजाने अजरामर झाले.


प्रभाकर जोग यांनी वयाच्या पाचव्या वर्षापासून व्हायोलिन वादन शिकायला सुरुवात केली. गजाननराव जोशी आणि नारायणराव मारुलीकर यांच्याकडे व्हायोलिन शिकले. वयाच्या बाराव्या वर्षांपासून ते अनेक ठिकाणी कार्यक्रमांसाठी देखील जात. प्रभाकर जोग यांचे भाऊ वामनराव जोग देखील उत्तम व्हायोलिन वादक होते. पुढे त्यांनी संगीतकार सुधीर फडके यांच्यासोबत त्यांचे सहाय्यक म्हणून काम केले. सुधीर फडके यांच्यासोबत त्यांनी गीतरामायणाच्या पाचशेहून अधिक कार्यक्रमांना साथ केली होती.

अनेक मानाच्या पुरस्कारांनी प्रभाकर जोग यांना गौरवण्यात आले आहे. २०१३मध्ये प्रभाकर जोग यांना ‘वसुंधरा पंडित पुरस्कार’ने सन्मानित करण्यात आले. त्यानंतर २०१५मध्ये त्यांना महाराष्ट्र सरकारकडून देण्यात येणाऱ्या गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे ‘कैवारी’, ‘चांदणे शिंपीत जा’ आणि ‘सतीची पुण्याई’ या सिनेमांना त्यांनी दिलेल्या संगितामुळे त्यांना ‘सूरसिंगार पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता. २०१७मध्ये त्यांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वतीने ‘नेत्रदीपक चित्रकर्मी पुरस्काराने’ गौरवण्यात आले. तब्बल ६ दशके संगिताची सेवा करणारे गाणारे व्हायोलिन आज कायमचे शांत झाले आहे.


हेही वाचा – Puneeth Rajkumar : कन्नड सुपरस्टार अभिनेता पुनीत राजकुमार यांच हृदयविकाराच्या झटक्याने निधन