घरमनोरंजनआनंदोत्सव आनंदयात्रींचा

आनंदोत्सव आनंदयात्रींचा

Subscribe

लेखक, दिग्दर्शक, अभिनेता म्हणून प्रमोद सुर्वेची ओळख आहे. स्पर्धेतील अनेक नाटकांना दर्जा प्राप्त करून देण्यात त्याचा मोठा वाटा आहे. प्रायोगिक रंगभूमीसाठीसुद्धा त्याने बर्‍यापैकी काम केलेले आहे. ज्योती सावित्री, मनपक्षी या त्याने दिग्दर्शित केलेल्या कलाकृतींचे कौतुक झालेले आहे. प्रमोदमध्ये आणखीन एक गुण दडलेला आहे तो म्हणजे त्याला सामाजिक कामाची आवड आहे. बेस्ट कामगार संघटनेत तो अनेक जबाबदार्‍या पार पाडतो आहे. गेल्या वर्षीपासून त्याच्या संकल्पनेत एक सामाजिक उपक्रम राबविला जात आहे.

या उपक्रमात दिव्यांग, मूक-कर्णबधिर यांच्याबरोबर वृद्धाश्रमात मावळते जीवन जगणार्‍या वृद्धांसाठी दिवसभर सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन तो करत असतो. यानिमित्ताने पंधराहून अधिक वृद्धाश्रमांच्या संस्था यात सहभागी होत असतात. या निमित्ताने दीडशे-दोनशे स्त्रिया या आनंद सोहळ्यात फक्त सहभागी होत नाहीत तर त्या आपली कलाही सादर करतात. नाचायचे, गायचे, मनमुराद आनंदाबरोबर स्नेहभोजन घ्यायचे, गाठीभेटी, जुन्या आठवणी जागवायच्या असा हा कार्यक्रम असतो. प्रेक्षकांसाठी हा कार्यक्रम विनामूल्य असतो. यात नाटक, चित्रपट, मालिका क्षेत्रातील अनेक दिग्गज कलाकार या ज्येष्ठ वृद्धांचे मनोबल वाढवण्यासाठी हजर असतात. प्रायोगिक तत्त्वावर प्रमोदने हा कार्यक्रम केला; पण आता अभय चव्हाण, उदय दरेकर, अविरत साळवी, सुनिल खोबरेकर हेसुद्धा त्याच्या या उपक्रमात सहभागी झालेले आहेत. बुधवार 1 मे रविंद्र नाट्य मंदिरच्या मिनी सभागृहात सकाळी 10 ते संध्याकाळी 7 या दरम्यान हे ज्येष्ठ, वृद्ध कलाकार आपली कला सादर करणार आहेत. प्रमोद आणि त्याची टीम वर्षभर महाराष्ट्रातील वृद्धाश्रमांसाठी त्यांच्या सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आयोजनातही पुढाकार घेत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -