‘घर बंदूक बिरयानी’चा दिमाखदार म्युझिक लाँच सोहळा संपन्न

बहुप्रतीक्षित ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपटाची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाचे टीझरच इतके उत्कंठा वाढवणारे होते, की आता प्रेक्षक या चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहात आहेत. दरम्यान, या चित्रपटातील गाणी संगीतप्रेमींच्या भेटीला आली आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटातील ‘गुन गुन’ हे प्रेमभावना व्यक्त करणारे गीत प्रदर्शित झाले. या गाण्याला ४० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले. ‘गुन गुन’ला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर आता ‘घर बंदूक बिरयानी’तील आणखी एक गाणं झळकले आहे. नुकताच ‘घर बंदूक बिरयानी’चा भव्य म्युझिक लाँच दिमाखदार सोहळा पार पडला.

यावेळी दिग्दर्शक हेमंत जंगल अवताडे, नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे आकाश ठोसर, सायली पाटील, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र, गीतकार वैभव देशमुख, झी स्टुडिओजचे मंगेश कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. ‘आहा हेरो’ या गाण्याच्या प्रदर्शनासोबतच ‘घर बंदूक बिरयानी’चे मेकिंगही या वेळी दाखवण्यात आले. या म्युझिक लाँच सोहळ्यात ‘आहा हेरो’ या गाण्यावर गाण्यातील कलाकार, ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी ठेका धरला. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित हा चित्रपट येत्या ७ एप्रिल रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटातील प्रत्येक गाणे श्रवणीय आणि सुंदररित्या चित्रित करण्यात आले आहे. व्हॅलेंटाईन डेनिमित्ताने ‘गुन गुन’ हे गाणे प्रदर्शित करण्यात आले होते. आशिष कुलकर्णी आणि कविता राम यांचा सुमधुर आवाज लाभलेले गाणे प्रत्येकाच्या ओठांवर रेंगाळणारे आहे. ‘आहा हेरो’ या जबरदस्त गाण्याला प्रवीण कुवर, विवेक नाईक, संतोष बोटे, राहुल चिटणीस यांचा आवाज लाभला असून ‘घर बंदूक बिरयानी’ हे टायटल सॉन्ग बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक मोहित चौहान यांनी गायले आहे. गणेश आचार्य यांचे नृत्य दिग्दर्शन लाभलेले हे जबरदस्त गाणे सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे.


हेही वाचा :

सुष्मिता सेनला आला होता हृदय विकाराचा झटका; पोस्ट शेअर करत स्वतः दिली माहिती