घरफिचर्सदिमाखदार अभिनेता अरुण सरनाईक

दिमाखदार अभिनेता अरुण सरनाईक

Subscribe

अरुण शंकरराव सरनाईक हे मराठी चित्रपट-अभिनेते होते. त्यांचा जन्म 4 ऑक्टोबर 1935 रोजी झाला. अरुण यांच्या घरातच कला होती. त्यांचे वडील शंकरराव सरनाईक हे संगीतज्ज्ञ होते. तर त्यांचे काका निवृत्तीबुवा सरनाईक हे प्रख्यात शास्त्रीय गायक होते. गाण्याचे हे अंग त्यांना या जोडीकडूनच मिळाले. त्यामुळे अभिनयात नावारूपास येण्यापूर्वीच त्यांनी पेटी, तबल्यात मातब्बरी मिळवली होती. संगीताची हीच आवड त्यांना कलाक्षेत्रातील दारे उघडण्यास उपयोगी ठरली.

तत्पूर्वी मुंबईच्या रुईया महाविद्यालयामधून त्यांनी पदवीही मिळवली. त्यानंतर लेखक-दिग्दर्शक अनंत माने यांनी ‘शाहीर परशुराम’ चित्रपटात अरुण यांना एक दुय्यम भूमिका दिली. या भूमिकेपाठोपाठ लेखक-दिग्दर्शक दिनकर द. पाटील यांचा वरदक्षिणा आणि दत्ता धर्माधिकारी यांचा ‘विठू माझा लेकुरवाळा’ हा चित्रपटही अरुण यांना मिळाला. त्यानंतर आलेल्या ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटाने किमया केली आणि अरुण यांचा अरुणोदय झाला. त्यांनी भूमिका साकारलेले ‘रंगल्या रात्री अशा’, ‘एक गाव बारा भानगडी’, ‘मुंबईचा जावई’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ , ‘सिंहासन’ इत्यादी चित्रपट विशेष गाजले. १ सप्टेंबर १९६४ रोजी ‘अपराध मीच केला’ हे नाटक रंगमंचावर आले होते.

- Advertisement -

या नाटकातील कमांडर अशोक वर्टी ही व्यक्तिरेखा खूप गाजली होती. त्यावेळी ही भूमिका अरुण सरनाईक यांनी साकारली होती. त्यांच्यासोबत या नाटकात राजा नेने, शरद तळवलकर, वसंत ठेंगडी, कामिनी कदम हे कलाकारदेखील होते. राजा ठाकूर दिग्दर्शित ‘पाहू रे किती वाट’ या चित्रपटात ते डॉ. चारुदत्त या नायकाच्या व्यक्तिरेखेत झळकले तर ‘सुभद्राहरण’ या चित्रपटात त्यांनी थेट दुर्योधनाचा खलनायक साकारला. ‘सवाल माझा ऐका’मधील त्यांचा ढोलकीवाला जयवंत आजही रसिकांच्या लक्षात आहे. असाच ढोलकीवाला त्यांनी ‘केला इशारा जाता जाता’ या चित्रपटातही साकारला होता.

लेखक अरुण साधू यांच्या ‘सिंहासन’ कादंबरीवर आधारित चित्रपटाची निर्मिती जब्बार पटेल यांनी केली. चित्रपटात सत्तेच्या राजकारणाचे अनेक पैलू बारकाव्याने टिपले आहेत. यात अरुण सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांची साकारलेली व्यक्तिरेखा ही त्यांच्या अभिनय कारकिर्दीतील सर्वोच्च ठरली! दिनकर पाटील यांचा ‘वरदक्षिणा’ (१९६२) सारखे सामाजिक, अनंत मानेंचा ‘एक गाव बारा भानगडी’ (१९६८), ‘गणाने घुंगरू हरवले’ (१९७०) सारखे ग्रामीण तर ‘घरकुल’ (१९७०) सारखे शहरी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका वैशिष्ठ्यपूर्ण ठरल्या! गायक घराण्यातून आल्याने त्यांनी काही चित्रपटांतून गाणीही गायली. अभिनयातील व्यस्तता एकीकडे कायम ठेवत सरनाईकांनी आपण समाजाचे देणे लागतो, या भावनेला छेद दिला नाही. चित्रीकरणातून वेळ मिळाला की कुष्ठरुग्णांसाठी काम करणार्‍या ‘आनंदग्राम’मध्ये ते स्वतःला झोकून द्यायचे. तिथे खर्‍या अर्थाने ते रमले. तिथल्या आबालवृद्धांच्या हाती फळे, खाऊ देताना त्यांच्या चेहर्‍यावरून आनंद ओसंडून वाहायचा. अशा या महान अभिनेत्याचे 21 जून 1984 रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -