Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर फिचर्स करोनाचे वादळ उंबरठ्यावर

करोनाचे वादळ उंबरठ्यावर

Related Story

- Advertisement -

जीवघेण्या करोना या विषाणूच्या साथीने संपूर्ण देशात नव्हे तर जगात हाहा:कार माजविला आहे. चीनच्या वुहान शहरातून घोंघावणारे हे वादळ आता ठाणे, पालघर आणि रायगड त्या पल्ल्याड शहरातही पसरू लागलं आहे. घराच्या उंबरठ्यापर्यंत हा धोका येऊन पोहचला आहे. घरी बसा आणि स्वत:बरोबर दुसर्‍याच्या आरोग्याचीही काळजी घ्या. विनाकारण बाहेर पडून स्वत:च्या व दुसर्‍याच्या आरोग्याशी खेळू नका असे आवाहन केंद्र व राज्य सरकारकडून केले जात असतानाही बहुसंख्य लोक आजही रस्त्यावर येताना दिसत आहेत. त्यामुळेच घराचा उंबरठा न ओलांडणे हीच आपल्या सर्वांची खबरदारी बनली आहे. या अस्मानी संकाटावर मात करण्याचा प्रयत्न सर्वचजण आपआपल्या परीने करीत आहेत. त्याला नक्कीच यश येईल, मात्र त्यासाठी शासन- प्रशासनाच्या आदेशाचं पालनं करणे हेच आपले कर्तव्य ठरत आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत करोनाग्रस्त रुग्णांचा आकडा शंभरीपार गेला आहे. मुंबईला लागून असणारी ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड या शहरांनाही या विषाणूंने घेरलं आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही एक कोटीच्या घरात पोहचली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत ठाणे जिल्हा हा मुंबई जिल्ह्याच्या खालोखाल राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. ठाणे जिल्हा राज्यात मुंबई नंतर सर्वाधिक नागरीकरण झालेला जिल्हा आहे. त्यामुळे करोनाचा धोका ठाणे जिल्ह्याला अधिकच जाणवत आहे. ठाण्यात करोनाग्रस्तांचा आकडा 33 तर नवी मुंबईत 30 च्या पुढे पोहचला आहे. तर एकट्या कल्याण डोंबिवलीत हा आकडा 43 येऊन ठेपला आहे. पालघर जिल्ह्यात 17 रूग्ण आढळून आले आहेत. करोनाग्रस्त रूग्णांचे आकडे जसे जसे वाढत आहेत. तसतशी शासन, प्रशासनाची चिंताही वाढत आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली असो वा मुंब्रा कळवा ही दाटीवाटीची वसलेली शहरं आहेत. दाटीवाटीनं वसलेल्या शहरात आढळलेल्या रुग्णांमुळे संसर्ग होण्याचा धोका अधिकच वाढला आहे. ठाणे पालघर असो वा रायगड सर्वत्रच करोनाचे रुग्ण कमी अधिक प्रमाणात आढळून आले आहेत. करोना हा संसर्गाने होणारा आजार असल्याने मुंबईच्या लगत असणारे ठाणे, पालघर आणि आजुबाजूच्या शहरांना हा धोका अधिकच असल्याने खबरदारी घ्यावी लागणार आहे.

- Advertisement -

ठाणे, रायगड आणि पालघर या तिन्ही जिल्ह्यांचा विचार केला तर शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागात विभागली गेली आहेत. शहरी भागात करोनाचे रुग्ण आढळून येत असून ग्रामीण भागात तसे चित्र नाही. या तिन्ही जिल्ह्याला तसा प्राचीन इतिहास आहे. त्यामुळे पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी देश विदेशातील नागरिकांची नेहमीच गर्दी हो असते. सध्या या तिन्ही जिल्ह्यात करोनाने शिरकाव केला आहे. त्यामुळे खबरदारी घेणे हे महत्त्वाचं ठरत आहे. ठाणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुमारे 25 किमी अंतरावर आहे आणि मुंबई शहरापासून 35 किमी अंतरावर आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, उल्हासनगर हे दोन तालुके पूर्णपणे शहरी आहेत, तर कल्याण, भिवंडी, अंबरनाथ शहापूर या तालुक्यात शहरी आणि ग्रामीण भागाचा परिसरही आहे. ग्रामीण भागात प्रत्येक गावाने प्रवेश बंद केल्याने करोनाचा शिरकाव होऊ शकलेला नाही ही समाधानाची बाब आहे. पण शहरी भागात करोनाच्या रुग्णांचा आकडा सातत्याने वाढताना दिसत आहे. विशेष म्हणजे जिल्ह्याच्या पूर्वेला पुणे व अहमदनगर जिल्हे आहेत. उत्तर पूर्वेला नाशिक जिल्हा तर उत्तरेला पालघर जिल्हा आहे. त्यामुळे राज्य सरकारचा सीमा बंदीचा निर्णय निश्चितच पथ्यावर पडला आहे, असेच म्हणावे लागेल.

ठाणे पालघर परिसरात चाकरमणी वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. रेल्वे वाहिनी ही चाकरमान्यांची जीवनवाहिनी समजली जाते. ठाणे आणि आजुबाजूच्या शहरातून लाखोंचे लोंढे दररोज मुंबईकडे जात असतात. चाकरमान्यांच्या दिवसाची सुरुवात ही घडाळाच्या काट्यावर सुरू होते आणि त्याच काट्यावर संपते. सकाळी लोकलच्या गर्दीत स्वत: झोकून द्यायचं आणि त्याच गर्दीचा सामना करीत घर गाठायचं हा चाकरमान्यांचा रोजचा दिनक्रमच. पण लोकल सेवेला ब्रेक मिळाल्यानंतर करोनाच्या संसर्गाचा धोका हा कमी झाला असेच म्हणावे लागेल. केंद्र सरकारने घेतलेल्या लॉकडाऊनच्या निर्णयामुळे व जिल्हा बंदीमुळे निदान करोनाचा संसर्ग इतरत्र पसरण्यास अटकाव बसला आहे हे सर्वांनाच मान्य करावे लागेल. त्यामुळेच भविष्यात हा धोका ओळखूनच पुढची पावले सरकारला उचलावी लागणार आहेत.

- Advertisement -

पालघर जिल्ह्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्याही 21 वर पोहचली असून चौघांचा मृत्यू ओढावला आहे ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे पालघरमध्येही करोनाचा धोका आहे. सागरी, डोंगरी व ग्रामीण अशी वैशिष्ठ्यपूर्ण रचना पालघर जिल्ह्याला लाभली आहे. सागरी किनारा लाभलेला डहाणू, पालघर, वसई हे तालुके तसेच औद्योगिकदृष्ठ्या विकसित असा वाडा व पालघर तालुका आणि अतिदुर्गम डोंगरी भाग असलेला जव्हार, मोखाडा, विक्रमगड, तलासरी हे तालुके आहेत. ग्रामीण भागात करोनाचा अजूनही धोका पसरलेला नाही. मात्र, हाताला काम नसल्याने पोटाची भ्रांत त्यांना स्वस्थ बसू देत नाही. रायगड जिल्ह्यातील पनवेल कामोठे येथे सापडलेला एक करोनाबाधित रुग्ण आढळला आहे. संशयित रुग्ण असले तरीसुध्दा रायगडमध्ये दिलासादायक वातावरण आहे. मुंबई लगतचा कोकणातील औद्योगिक जिल्हा असल्याकारणाने देशाच्या कानाकोपर्‍यातून उदरनिर्वाहासाठी येथे अनेकांनी वास्तव्य केलेेले आहे. पण लॉकडाऊनमुळे अनेकांच्या रोजी रोटीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

संचारबंदीमुळे हाताला काम अन पोटाला अन्न नसल्याने अनेक मजुरांनी मिळेल त्या वाहनाने, काहींनी तर पायीच आपआपल्या राज्यातील गावांकडे पायपीट केल्याचे चित्र ठाणे पालघर जिल्ह्यात दिसून आले. अशाच पायी चाललेल्या सात मजुरांना एका भरधाव ट्रकने धडक दिल्याने त्यांना जीव गमवावा लागला होता ही मन सुन्नं करणारी घटना विरारचीच होती. या तीनही जिल्ह्याचा विचार केला तर इथले 90 टक्के मजूर हे बांधकाम कामगार आहेत सगळीकडे बांधकाम ठप्प झाले आहे रोजच्या दोनवेळच्या खाण्याची आणि निवार्‍याची या मजुरांना भ्रांत आहे. त्यामुळे मुंबईत उपाशी मरण्यापेक्षा गावाकडं जाऊन जिवंत तरी राहू अशी भावना त्यांच्यात आहे. करोनाच्या विषाणुमुळे संपूर्ण अर्थव्यवस्था कोलमडण्याच्या बेतात आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपणार कधी? असा प्रश्न सर्वांपुढे उभा आहे. त्याची प्रतीक्षा प्रत्येकजण करीत आहेत. वेगाने फैलावणार्‍या विषाणूने सार्‍यांना भयभीत केले आहे. गर्दी करू नका, असे आवाहन सरकारकडून वारंवार केले जात आहे. मात्र, पोटाची भूक माणसाला स्वस्थ बसू देत नाही.

- Advertisement -