घरफिचर्सकरोनाचा कहर अन मुंबईकरांची बेफिकिरी

करोनाचा कहर अन मुंबईकरांची बेफिकिरी

Subscribe

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकारचे आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व बेस्ट कर्मचारी दिवस-रात्र एक करत आहेत. तरीही मुंबईकर या गोष्टी फार गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. करोनाच्या आक्रमणामुळे उत्तर महाराष्ट्रातील लहान-मोठे उद्योग, कृषी प्रक्रिया उद्योग, पोल्ट्री, द्राक्ष, केळी शेती, भाजीपाला व ऊस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. नाशिक विभागातील पोल्ट्री, द्राक्ष निर्यात व वाहन उद्योग यांचे मोठे नुकसान झाले असून कृषी, उद्योग व सेवा क्षेत्राचा विचार केल्यास उत्तर महाराष्ट्राचे दहा हजार कोटींचे नुकसान झाले आहे. मुंबईला लागून असणारी ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि रायगड या शहरांनाही या करोना विषाणूने घेरलं आहे. ठाणे जिल्ह्याची लोकसंख्या ही एक कोटीच्या घरात पोहचली आहे. लोकसंख्येच्या बाबतीत ठाणे जिल्हा हा मुंबई जिल्ह्याच्या खालोखाल राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचा मोठा जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्याच्याही उंबरठ्यावर करोनाचे वादळ पोहोचले आहे. या निमित्ताने तीन भागांचा हा कोलाज...

फेब्रुवारीमध्ये दिल्लीत करोनाचा पहिला रुग्ण सापडला. त्यानंतर देशातील विविध भागात करोनाचे रुग्ण सापडू लागले. महाराष्ट्रात करोनाचा पहिला रुग्ण 9 मार्चला सापडला. तोपर्यंत अनेक राज्यांमध्ये करोनाने आपले अस्तित्व दाखवण्यास सुरुवात केली होती. महाराष्ट्रात करोनाचा रुग्ण आढळताच राज्य सरकारने परदेशातून येणार्‍या प्रवाशांची विमानतळावरच तपासणी करण्यास सुरुवात केली. पुरेपूर काळजी घेऊनही अखेर पुण्या-मुंबईमध्ये करोनाने शिरकाव केला. करोनाचा वाढता प्रभाव पाहता केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला बसणार्‍या फटक्याचा विचार न करता लोकांच्या सुरक्षेसाठी लॉकडाऊनचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. परंतु करोनाचा कहर पाहता सरकारने केलेला लॉकडाऊन नागरिकांनी गांभीर्याने घेतला आहे का? असा प्रश्न सध्या बाहेरील चित्र पाहता निर्माण झाला आहे.

मुंबईमध्ये दिवसेंदिवस करोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा सामना करण्यासाठी देशात लागू केलेल्या लॉकडाऊनदरम्यान करोनाचा प्रसार रोखण्यासाठी मुंबई महापालिका, राज्य सरकारचे आरोग्य विभाग, पोलीस यंत्रणा व बेस्ट कर्मचारी दिवसरात्र एक करत आहेत. हॉस्पिटलमध्ये मास्क, ग्लोव्हज, गाऊन यासारख्या अत्यावश्यक साधनांची कमतरता असूनही डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. तर या कर्मचार्‍यांना हॉस्पिटल ते घर सुखरूप पोहचवण्याचे काम बेस्टकडून करण्यात येत आहे. नागरिकांनी घरातून बाहेर पडू नये यासाठी शहरातील प्रत्येक नाक्यावर तैनात पोलीस आपले काम चोख बजावत आहेत.

- Advertisement -

अमेरिका, चीन, स्पेन, इटली, फ्रान्स आणि जपान यासारख्या प्रगत देशांमध्ये करोनाचे दररोज हजारो बळी जात आहेत. आतापर्यंत संपूर्ण जगामध्ये 14 लाख 36 हजार 198 जणांना करोनाची लागण झाली असून 85 हजार 522 जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेमध्ये सर्वाधिक 2 लाख 73 हजार 808 त्याखालोखाल स्पेन 1 लाख 24 हजार 736, इटली 1 लाख 24 हजार 632, चीन 82 हजार 930 तर फ्रान्समध्ये 67 हजार 757 जणांना करोनाची लागण झाली आहे. भारताच्या तुलनेत कितीतरी पट उत्तम आरोग्य सुविधा असलेल्या देशांनी करोनासमोर हात टेकले असताना भारताची अवस्था फारच बिकट आहे. मात्र अशाही पद्धतीत भारत सरकारने होणार्‍या आर्थिक नुकसानीकडे दुर्लक्ष करत लोकांचे प्राण वाचवण्यासाठी देशात लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केला. जेणेकरून नागरिक घरात राहतील व करोनाचा फैलाव होण्यास अटकाव होईल.

सरकारने लॉकडाऊनचा निर्णय जाहीर केल्यानंतर मुंबईतील चित्र मात्र वेगळेच दिसू लागले. नागरिकांनी घरात राहावे यासाठी जरी हा निर्णय असला तरी प्रत्यक्ष त्याच रात्रीपासून रस्त्यावर गर्दी दिसू लागली. लॉकडाऊनच्या काळात किरणामाल, भाजी घेण्यासाठी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात गर्दी होऊ लागली. नागरिक एकेका गोष्टीसाठी बाहेर पडू लागले. जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून देण्याची राज्य सरकारने हमी दिल्यानंतरही नागरिक भाजी व किरणामाल खरेदीसाठी गर्दी करू लागले. मेडिकलच्या दुकानांमध्ये औषधांपेक्षा साबण, शॅम्पू, डिओ,सौंदर्य प्रसाधने, चॉकलेट, बिस्कीटसाठी गर्दी करू लागले. विशेष म्हणजे ही खरेदी एकाच दिवशी न करता रोज केली जात आहे. राज्य सरकारकडून परोपरीने सांगूनही नागरिक करोनाकडे गांभीर्याने पाहताना दिसत नाहीत. अजूनपर्यंत करोना पहिल्या व दुसर्‍या टप्प्यात असल्याने अशा प्रकारे गर्दी करणे चालून गेले. परंतु, आता करोना तिसर्‍या टप्प्यात जात आहे. यातही मुंबईसारख्या शहरामध्ये तिसर्‍या टप्प्याचे परिणाम किती भयंकर होतील हे अमेरिका, स्पेन, इटली येथील प्रसारमाध्यमात दृश्य पाहिलेल्यांसाठी न सांगितलेच बरे.

- Advertisement -

मुंबईतील धारावी, वरळी कोळीवाडा, दादर, लालबाग, पवई, घाटकोपर, चेंबूर, जोगेश्वरी, अंधेरी, दहिसर, वांद्रे, कुलाबा, विक्रोळी, मुलुंड अशा अनेक ठिकाणी रोज करोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. अजूनपर्यंत परदेशातून आलेले नागरिक आणि त्यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर, परिचारिका, कर्मचारी व त्यांच्या नातेवाईकांची संख्या अधिक होती. परंतु, आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावी आणि वरळी कोळीवाड्यात करोनाचा रुग्ण सापडल्याने परिस्थिती बिकट होण्याची चिन्हे दिसू लागली. धारावीत करोनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर तेथून करोनाबाधित रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. परिणामी रुग्णांची ही संख्या अधिकच वाढताना दिसत आहे. धारावीप्रमाणे मुंबईतील काही झोपडपट्टीमध्ये करोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे करोनाचा भस्मासूर रोखणे सरकारसाठी आता अधिकच अवघड होण्याची लक्षणे दिसू लागली आहेत. करोनाचा फैलाव रोखता यावा यासाठी सरकारने पुढील चार दिवस संचारबंदी अधिक तीव्र केली. मात्र, संचारबंदी तीव्र करताच घरातून बाहेर पडणार्‍यांची संख्याही अधिक वाढली. पुढील चार दिवस काहीच मिळणार नाही म्हणून नागरिकांनी सरकारने दिलेल्या सकाळच्या वेळेत बाजारांमध्ये गर्दी केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले. अत्यावश्यक वस्तू घरात असूनही अनेकजण अधिक वस्तूंचा साठा करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये मध्यम व उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तींची संख्याच अधिक आहे. या वर्गाची मॉल, डी मार्ट, बिग बाजार यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळत आहे. वेशीवर असलेला करोनाचा विषाणू आता दारात आला आहे, तरीही नागरिकांमध्ये त्याबाबत फारसे गांभीर्य दिसून येत नाही. काही दिवसांपूर्वी सलमान खानच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये त्याने ’जो डर गया वो मर गया’ ऐवजी ’जो डर गया वो बच गया’ असा संदेश दिला होता. हा संदेश देण्यामागचा त्याचा एकच उद्देश होता की सर्वांनी घरात राहा, आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. पण आपल्या या आवडत्या कलाकाराच्या संदेशाकडे दुर्लक्षकडेही नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे पाहायला मिळत आहे.

सुरुवातीला मुंबईमध्ये एक, दोन, असे सापडणारे करोनाचे रुग्ण आठवडाभरापूर्वी 35 ते 40 च्या संख्येने सापडू लागले आता हीच संख्या 100 च्या घरात गेली आहे. मुंबईतील करोनाबाधित रुग्ण सापडण्याची संख्या दुपटीने वाढली आहे. योग्य काळजी घेत स्वतः ला घरात बंदिस्त न केल्यास दुपटीने वाढणारी ही संख्या पुढील काळात चार पटीने वाढलेली पाहायला मिळेल. पण त्यावेळी परिस्थिती हाताबाहेर गेलेली असेल व मुंबईतील स्थिती स्पेन व इतलीसारखी व्हायला वेळ लागणार नाही, उलट त्यापेक्षा अधिक गंभीर झालेली पाहायला मिळेल. तिथे करोनामुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह उचलण्यासाठी सैन्याला पाचारण करण्यात आले होते, पण मुंबईची लोकसंख्या पाहता तेही शक्य होणार नाही. त्यामुळे आता नागरिकांनी या जैविक युद्धाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपला व आपल्या कुटुंबीयांचा जीव वाचवण्यासाठी स्वतःला घरात बंद करून घेणे गरजेचे आहे, नाहीतर पुढील पिढीला या जैविक लढ्याचा आपण सामना कसा केला हे सांगायला सुद्धा आपण शिल्लक राहणार नाही.

Vinayak Dige
Vinayak Digehttps://www.mymahanagar.com/author/dvinayak/
१२ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. आरोग्य, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -