घरफिचर्ससुरेल शिकवणी

सुरेल शिकवणी

Subscribe

‘बेटे, तुम जिस स्कूल में पढते हो, हम उसके हेडमास्टर रह चुके है...’ जिंदगीच्या शाळेतले धडे गाण्यातून शिकवण्यात असं अधिकारवाणीनं केवळ राजेश खन्नाच किशोरच्या तोंडून इतर अभिनेत्यांना बोलू शकतो, इतके जगण्याचे धडे त्याने हिंदी पडद्यावरच्या गाण्यातून घालून दिले आहेत.

‘अंदाज’मध्ये राजेश खन्ना चकचकीत स्कूटरवर बसून ‘जिंदगी एक सफर है सुहाना…’असं म्हणतो. तेव्हा तो जीवनाच्या प्रवासाचं तत्वज्ञान किशोरच्या आवाजातून सांगत असतो. त्याच्या मागे साक्षात ड्रिमगर्ल हेमा त्याला बिलगून बसलेली असल्याने त्याचा सफर सुहाना होणारच असतो, हे असं बोलून आपण रोजच्या गर्दीतल्या लोकलवारीतल्या पामर माणसांनी त्याच्या या जीवनप्रवासाचा हेवा करायचा नसतो. जिंदगीची ही भली-बुरी शिकवण हिंदी पडद्यानं कित्येक दशकं गाण्यातून सातत्यानं आपल्याला शिकवली आहे.

राजेश त्याचा लालसर गुलाबी कोटातला अंदाज समुद्रकिनारी उडणार्‍या निळ्या सौंदर्यात गुंडाळून विविधरंगी फुगे उडवत…‘जिंदगी कैसी है पहेली हाए, कभी ये हसाए कभी ये रुलाए…’ म्हणत जगण्याच्या न सुटलेल्या कोड्यातही आनंद साजरा करतो. तर तोच राजेश खन्ना, ‘आपकी कसम’मध्ये ‘जिंदगी के सफर में गुजर जाते है जो मकां…वो फिर नही आते..’ म्हणत मागे सरलेल्या भूतकाळाने, बदललेली वर्तमानातली हतबलता कमालीच्या विपन्नावस्थेत, दाढी वाढवून किशोरच्या आवाजातून पडद्यावर सांगत राहतो. याच गाण्यात पुढे, ‘आदमी ठीक से देख पाता नही, और परदेपे मंजर बदल जाता है…’ म्हणत मागे केलेल्या चुका भविष्यात कशा महाग पडतात हे सांगत राहतो.

- Advertisement -

‘बेटे, तुम जिस स्कूल में पढते हो, हम उसके हेडमास्टर रह चुके है…’ जिंदगीच्या शाळेतले धडे गाण्यातून शिकवण्यात असं अधिकारवाणीनं केवळ राजेश खन्नाच किशोरच्या तोंडून इतर अभिनेत्यांना बोलू शकतो, इतके जगण्याचे धडे त्याने हिंदी पडद्यावरच्या गाण्यातून घालून दिले आहेत. ‘ये जीवन है…इस जीवन का यही है रंग रूप…’ हे गाणंही राजेशचंच. मानवी जगण्याचे विविधरंग दाखवणारं हे आणखी एक उदाहरण ठरावं.

‘जिंदगी ख्वाब है…ख्वाब में, झूठ है क्या, और भला सच है क्या…’ शहरातल्या सडकेवर दारुच्या नशेत धोतर सांभाळत, धडपडत, हेलकांडून चालणार्‍या दिग्गज अभिनेता मोतीलालचा काळ राजेश खन्नाच्या आधीचा. मोतीलालने राज कपूरच्या ‘जागते रहो’ (1956) मध्येच हा आयुष्याच्या बेफिकीरीचा धडा घालून दिलेला. पुढे देव आनंदने ‘मै जिंदगी का साथ निभाता चला गया…’ म्हणत हीच जगण्यातली बेफिकीरी ‘हम दोनो’ मध्ये सिगारेट धुराच्या वलयातून बाहेर सोडली. त्या काळातले नायक व्यवहारीक जीवनाविषयी तुलनेने कमालीचे बेफिकीर असावेत. हळूहळू काळाच्या ओघात जगण्याच्या व्याख्या बदलत गेल्यानं जीवनाची बेफिकीरी संघर्षात बदलली आणि त्यानुसार पडद्यावरची गाणीही बदलत गेली. ‘चलनाही जिंदगी है, चलतीही जा रही है…गाडी बुला रही है…’ म्हणत डोळ्यातली आसवं रोखून आगगाडीत बसलेल्या धर्मेंद्रनं सातत्याने चालत राहाणं म्हणजेच जगणं, थांबला तो संपला, हेच पुन्हा शिकवलं. राजेश खन्नाच्या तुलनेत अमिताभला अशी गाणी पडद्यावर खूपच कमी प्रमाणात वाट्याला आली. ‘मजबूर’मध्ये ‘आदमी जो कहता है, आदमी जो सुनता है…जिंदगीभर वो सदाए पिछा करती है…’ म्हणत त्यानं जगणं शिकवलं. ‘आनंद’मध्ये राजेश खन्नाला कर्करोग होतो. त्यावेळी ‘जिंदगी कैसी है पहेली हाए…कभी ये हसाए, कभी ये रुलाए…’ ही पहेली आपल्या जगणं थांबल्यावरच सुटणार हे त्याला ‘आनंद’मध्ये आधीपासून माहीत असतं. तर ‘मजबूर’मध्ये अमिताभला ब्रेन ट्युमर नावाचा आजार असतो. इथं जिंदगी किंवा मौत कन्फर्म नसते, त्यामुळे मरणाची भीती आणि जगण्याची शक्यता यातल्या कात्रीत मधोमध सापडल्यानं मजबूर झालेला अमिताभ, ‘बहुत जियादा प्यार भी अच्छा नही होता…कभी दामन छुडाना हो, तो मुष्कील हो…’ म्हणत जगण्याची आसक्ती दुःखाला कशी कारण ठरते, हे बुद्धाचं तत्वज्ञानच या गाण्यातून सांगतो.

- Advertisement -

विस्मृतीत गेलेल्या ‘जिंदगी और तुफान’ सिनेमातला साजिद खान नावाचा नायकही विस्मृतीत गेला. मात्र मुकेशच्या आवाजातलं त्याचं गाणं आजही मुंबईतल्या लोकल ट्रेनमध्ये इकतारा किंवा हार्मोनियम घेऊन रोजचं जगणं ढकलणार्‍यांकडून ऐकायला येतं.. ‘एक हसरत थी के आँचल का मुझे प्यार मिले…मैने मंझिल तो तलाशा मुझे बाजार मिले, जिंदगी और बता तेरा इरादा क्या है…’ इथं रोजच्या जिवघेण्या जगण्यालाच मुकेशच्या आवाजातून राम अवतार त्यागी या कवीनं गाण्यातून जबरदस्त आव्हान दिलं होतं. सर्वसामान्यांच्या संघर्षाचं परिणामकारक शब्दरुप असलेल्या या गाण्यासारखं अंगावर येणार दुसरं उदाहरण हिंदी पडद्यावर नाही. मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ रंगकर्मी सुलभा देशपांडे यांचा हा हिंदीतील सुरुवातीचा सिनेमा.

गुलजार, आर.डी. बर्मन (पंचम) आणि जिंदगी हे अद्भूत रसायन आहे. जिंदगीचे अनेक पैलू या तिघांनी तेवढ्याच हळूवारपणे गाण्यातून उलगडले, इथंही सोबत किशोर होताच. ‘आने वाला पल, जाने वाला है…हो सके तो इसमें जिंदगी बिता दो’, म्हणत या फसव्या जीवनाचा गोलमाल कधीही होऊ शकतो. त्यामुळे आताचा मिळालेला क्षण जगून घ्या… हे शिकवणारं हे गाणं नव्याने सांगायला नको, ‘ऐ जिंदगी गले लगाले…’ म्हणत गुलजारनं जिंदगी ही जगण्याची नसून मिठीत घेण्याची गोष्ट असल्याचं तेवढ्याच हळूवारपणे ‘सदमा’तून सांगितलं. तेच पुन्हा शाहरूख आणि आलियाच्या नुकत्याच आलेल्या ‘डिअर जिंदगी’मध्ये नव्याने पुन्हा सांगितलं गेलं.
तर ऐंशीच्या दशकात,‘जिंदगी हर कदम इक नई जंग है…’ असं ज्येष्ठ रंगकर्मी गिरीश कर्नाड आणि अनिल कपूर आणि नूतननं अनुक्रमे नितीन मुकेश आणि शब्बीर कुमार, लता मंगेशकर यांच्या आवाजात ‘मेरी जंग’ मधून स्पष्ट केलं होतं. जावेद अख्तरच्या लेखणीतून उतरलेल्या तडाखेबंद संवादाच्या या वकिली सिनेमाचं संपूर्ण कथानक नायकाच्या संघर्षाचं असल्यानं हे गाणं त्या सिनेमाच्या मध्यवर्ती होतं.

‘जिंदगी प्यार का गीत है.. इसे हर दिल को गाना पडेगा’, म्हणत याच दशकांत पुन्हा राजेश खन्नानं ‘सौतन’मधून आपण अजून जीवनाचे धडे शिकवणार्‍या मास्तरकीचा राजीनामा दिला नसल्याचं पुन्हा ठणकावून सांगितलं. तर ‘जिंदगी की यही रित है.. हार के बाद ही जीत है…’ अशी शिकवण ‘मिस्टर इंडिया’नं याच दशकांत दिली. जीवनाच्या शाळेतली ही गाण्यातली शिकवणी हिंदी पडद्यावर अजूनही सुरू आहे. गुलजार यांना कुणीतरी विचारलं ‘जगणं कसं असायला हवं आणि कसं संपायला हवं?’ त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर या सर्व शिकवणीचं सार होतं. ते म्हणाले, ‘जिंदगी ऐसे खत्म हो जाए…जैसे कागज पर लिखते लिखते कलम की स्याही …’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -