घरफिचर्सस्पिरिटच्या बैलाला...

स्पिरिटच्या बैलाला…

Subscribe

पिंजर्‍यात कोंबले गेलेले उंदीर किंवा खाटकाकडच्या खुराड्यातल्या कोंबड्या एकमेकींशी जरा अ‍ॅडजस्ट करून घेतात, हे उंदरांचं आणि कोंबड्यांचं स्पिरिट असतं का? आणि असलंच तरी ते निर्माण करण्याचं श्रेय पिंजरे आणि खुराडे तयार करणार्‍यांचं आहे... तद्वत मुंबईकरांमध्ये दर संकटसमयी उफाळून येणार्‍या, किंबहुना एखाद्या आजारासारख्या बळावणार्‍या तथाकथित स्पिरिटचं क्रेडिट मुंबईकरांचा जीव संकटातच राहील, याची तजवीज करणार्‍या सर्व शहरनियोजक महानुभावांचं आणि यंत्रणांचं आहे.

पिंजर्‍यात कोंबले गेलेले उंदीर किंवा खाटकाकडच्या खुराड्यातल्या कोंबड्या एकमेकींशी जरा अ‍ॅडजस्ट करून घेतात, हे उंदरांचं आणि कोंबड्यांचं स्पिरिट असतं का? आणि असलंच तरी ते निर्माण करण्याचं श्रेय पिंजरे आणि खुराडे तयार करणार्‍यांचं आहे… तद्वत मुंबईकरांमध्ये दर संकटसमयी उफाळून येणार्‍या, किंबहुना एखाद्या आजारासारख्या बळावणार्‍या तथाकथित स्पिरिटचं क्रेडिट मुंबईकरांचा जीव संकटातच राहील, याची तजवीज करणार्‍या सर्व शहरनियोजक महानुभावांचं आणि यंत्रणांचं आहे.

दरवर्षीच्या पावसाळ्यात यंदा किती पाऊस होणार हे अन्य देशवासियांना मुंबईकडे पाहून कळतं…
…इकडे मिलन सबवे भरला आणि हिंदमाताला पाणी साठलं की तिकडे कुठल्यातरी कावळे-कुंभार्डे खुर्दमधला शेतकरी हरखतो… पावसाच्या तुफान मार्‍याने दोनचार इमारती कोसळल्या, पूल पडले, रेल्वे बंद पडली आणि मुंबई जलमय झाली की गावोगावच्या जनतेला दिलासा मिळतो की आता आपल्याकडचे सगळे तलाव भरणार आणि पिण्याच्या पाण्यासाठी आयाबायांना हंडे घेऊन मैलो न् मैल चालावंच लागणार असलं तरी उसासाठी आणि जिपडी, फटफट्या धुवायला मॉप पाणी मिळणार आहे….

- Advertisement -

…खूप पाऊस पडल्यानंतर भविष्यातल्या मुंबईतून पाण्याचा निचरा होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे, याचा ब्रिटिशांनी देश आणि मुंबई सोडून जाताना विचारच केला नव्हता (तीव्र निषेध त्या ब्रिटिशांचा, कोणीतरी पाकिस्तानात पाठवून द्या त्यांना). ब्रिटिशांनंतर मुंबईच्या पायाभूत सुविधांचा कोणी विचारच केलेला नाही (दीडशे वर्षं राज्य केलं त्यांनी, त्यामुळे पुढच्या दीडशे वर्षांचीही नीट व्यवस्था लावून जाणं हे त्यांचं कामच होतं! निषेध त्या ब्रिटिशांचा) त्यामुळे मुंबई तुंबते, सार्वजनिक वाहतुकीचा बोर्‍या वाजतो आणि मुंबईकरांचे हाल होतात, तेव्हा मुंबईच्या मनीऑर्डरींवर (आता एनईएफटीवर) जगणार्‍या भागांमधले लोकही ‘मुंबईकर आणि त्यांचं स्पिरिट काय ते पाहून घेतील,’ असं ‘कुत्ता जाने और चमडा जाने’च्या चालीत म्हणून निश्चिंत राहतात… हे मुंबईबद्दलचं उर्वरित महाराष्ट्राचं ‘स्पिरिट’ आहे… त्याला बर्‍याच अंशी मुंबईकरच जबाबदार आहेत… कारण, हाल करून घेण्यासाठीच लोक देशभरातून हौसेने मुंबईला येतात की काय, अशी शंका वाटण्याइतके हाल, पाऊस नसतानाही होत असतात मुंबईकरांचे. घरातून बाहेर पडल्यानंतर रिक्षा मिळणे, ठरलेली ट्रेन ठरलेल्या वेळेत येणे, दोन मुंग्यांना शिरण्याइतक्या जागेतून आत जाऊन एका मुंगीला दोन पायांवर उभा राहता येण्याइतक्या जागेत मावणे इथपासून ते परतीच्या प्रवासात हेच सगळं उलट्या क्रमाने भोगण्यापर्यंत मुंबईकर पदोपदी अपरिमित त्रास सहन करत असतो… माणसांना असं कोंडवाड्यातल्या जनावरांपेक्षा बदतर वागवणारं दुसरं शहर जगाच्या पाठीवर सापडायचं नाही. मात्र, त्यातूनच मुंबईचं सुप्रसिद्ध स्पिरिट जन्म घेतं.

म्हणजे पाहा, इथे लोक चौथ्या सीटवरून इतके भांडतात की एकमेकांना गाडीतून फेकून देण्यापर्यंत त्यांची मजल जाते… तीच ट्रेन पावसात किंवा अन्य काही कारणाने रखडू द्या, आठदहा तास- हेच लोक एकमेकांना आळीपाळीने बसू देतात, पाणी देतात, डबा शेअर करतात, गाडीतून उतरून पायी, मिळेल त्या वाहनाने प्रवास करताना सोबत करतात, अनोळखी सहप्रवाशाला आपल्या घरीही घेऊन जातात एका रात्रीसाठी… वाटेतले लोक जेवणाची, राहण्याची व्यवस्था करतात, चहा वाटतात… सर्वसामान्य माणसांमधलं हे स्पिरिटच मुंबईकरांना कसोटीच्या प्रसंगांत तगायला आणि दुसर्‍या दिवशी पुन्हा त्याच कसोटीच्या प्रसंगांमध्ये उतरायला साह्यकारक ठरतं. या स्पिरिटचं श्रेय अनेकजण या सर्वसामान्य मुंबईकरांना देतात. पण, ते साफ चूक आहे. पिंजर्‍यात कोंबले गेलेले उंदीर किंवा खाटकाकडच्या खुराड्यातल्या कोंबड्या एकमेकींशी जरा अ‍ॅडजस्ट करून घेतात, हे उंदरांचं आणि कोंबड्यांचं स्पिरिट असतं का? आणि असलंच तरी ते निर्माण करण्याचं श्रेय पिंजरे आणि खुराडे तयार करणार्‍यांचं आहे… तद्वत मुंबईकरांमध्ये दर संकटसमयी उफाळून येणार्‍या, किंबहुना एखाद्या आजारासारख्या बळावणार्‍या तथाकथित स्पिरिटचं क्रेडिट मुंबईकरांचा जीव संकटातच राहील, याची तजवीज करणार्‍या सर्व शहरनियोजक महानुभावांचं आणि यंत्रणांचं आहे.

- Advertisement -

हे पडद्यामागचे बहुतेकवेळा अनाम राहणारे हात अतिशय निर्मम,निरलस भावनेतून मुंबईकरांमध्ये स्पिरिट भरत असतात… नंतर कधीतरी स्टोव्हसारखा पंप मारून आपल्या पोळ्या भाजण्याइतकी आग आणि क्वचित नियंत्रित स्फोटही घडवून आणता येतात त्यांना.

विचार करा, मुंबईत देशभरातून माणसं येत असतात. इतक्या भयावह जीवनसंघर्षातही त्यांचे लोंढे येणं थांबत नाही, तर त्यांना एकदम सुविधापूर्ण जीवनमान मिळालं, तर इथे केवढी रीघ लागेल? ही गर्दी नियंत्रित करण्याचं काम स्पिरिटचे जनक करत असतात. येणार्‍या माणसांमध्ये भाषा, जात, धर्म, यांचे अनेक भेद असतात. आपली वृत्ती सुखापेक्षा संकटात भेद विसरण्याची आहे. त्यामुळे संकटं आणि हाल यांचं एक विवक्षित प्रमाण कायम ठेवलं की माणसं एकमेकांना धरून राहतात. शिवाय जगण्याच्या धडपडीत हँगरला लावलेल्या ओल्या शर्टासारखा घामेजून, दमून गेलेला, चुरगळलेला माणूस कसलीही बंडं आणि दंगेधोपे करण्याच्या स्थितीत राहात नाही; सामाजिक सद्भाव आणि शांतता प्रस्थापित करण्याचा हा केवढा चतुर मार्ग आहे?

त्यामुळे आता पाऊस ओसरून आपण सगळे पुन्हा नेहमीच्या हालांना सामोरे जायला सज्ज झालोच आहोत, तर आपल्या तथाकथित स्पिरिटला सलाम करण्याऐवजी हे स्पिरिट निर्माण करणार्‍या अनाम यंत्रणांना, अधिकार्‍यांना, नगरपतींना (सेवक नव्हेत, प्रतिनिधी नव्हेत, पतीच) सलाम करायला हवा! ते पाऊस पाडू शकत नसले म्हणून काय झालं?…

दर पावसाळ्यात बुजवल्यानंतर चार दिवसांत उकरणार्‍या खड्ड्यांचे रस्ते (त्यातही वेगवेगळे प्रकार, छोटे खड्डे शाळकरी मुलांचा जीव घेण्यासाठी, मध्यम आकाराचे खड्डे महिलांसाठी राखीव, मोठ्या खड्ड्यांचा मान पुरुषांना) बांधणं, पाण्याचा निचरा होण्याची व्यवस्थाच न करता उपनगरांमध्ये टोलेजंग इमारती उठवण्याच्या परवानग्या देणं, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था लुळीपांगळी ठेवणं, अशा सेवाभावी उपक्रमांमधून त्यांनीच आपल्यात हे बुळबुळीत स्पिरिट निर्माण केलेलं आहे, याची कृतज्ञ जाणीव ठेवा.

मुकेश माचकर
(लेखक तिरकस लिखाण करणारे स्तंभलेखक आहेत)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -