घरफिचर्सजारे जारे पावसा...

जारे जारे पावसा…

Subscribe

हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्यावरही लख्ख ऊन पडले. यंदा तर उशिराने दाखल झालेला पाऊस आता इथंच मुक्काम ठोकून भाडेकरुचा मालक होऊ पाहतोय..पावसानं यंदा खूप नुकसान केलंय, हा पाऊस असा का वागतोय, याची राज्यातल्या तपास यंत्रणांनी चौकशी केल्यावर काही दोषींची नावे पुढे आली. त्यावर राजदरबारातील सभागृहात झालेली ही चर्चा आणि ठेवण्यात आलेले आरोप…

दरबार प्रमुख- शिक्षण मंत्र्यांनी शाळांना सुट्टी जाहीर करूनही हा पाऊस नेमका त्या वेळी आला नाही, त्यामुळे या पावसाविरोधात हक्कभंग आणण्यात यावा अध्यक्ष महोदय.

- Advertisement -

आधीच या वर्षी पाऊसराव उशिराने राज्यात दाखल झाले, त्यातही दिलेल्या वेळी न आल्यामुळे वाढलेल्या कामाचा निपटारा करण्यासाठी त्यांना एकाच वेळी डबल ड्युटी करायला लावणार्‍यांची विभागीय चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावेत, अध्यक्ष महोदय.

पाऊसरावांना आम्ही वेळेत येण्याचे फर्मावले असतानाही ते तब्बल एक महिना उशिराने आलेत आणि आता जाण्याचे नाव घेत नाहीत..या पावसाला असं डोक्यावर बसवण्यात आणि बेशिस्त करण्यात इथल्या कवी नावाच्या जमातीचा हातभार राहिला आहे.

- Advertisement -

या पावसाला रोमँटिक, ओला, गारवा म्हणून कवी नावाच्या या बेजबाबदार जमातीने पर्यावरण विघातक कृत्य केलं आहे. मेट्रोसाठी होणार्‍या वृक्षतोडीपेक्षा हे काम गंभीर परिणाम करणारं आहे. तेव्हा राज्यात पावसाळी कविता करणार्‍या सर्वच कवींना तडीपार करावे आणि कवितांची पुस्तके देशद्रोहाच्या आरोपाखाली जप्त करण्यात यावीत, अध्यक्ष महोदय.

स्वतःला सौमित्र म्हणवून घेणारा हुशार कदम नावाचा एक व्यक्ती यातील पहिला आरोपी आहे अध्यक्ष महोदय. या आरोपीने जवळपास एक दशकांपूर्वी ‘गारवा’ नावाची ध्वनिचित्रफीत आणली होती. यातील पाऊस कवितांमुळे तत्कालीन तरुण पिढीने या सौमित्राला डोक्यावर घेतले होते. या सौमित्राने तिच्या आणि त्याच्या मनातला प्रेमळ पाऊस शब्दातून मांडला. त्याला इंगळेंच्या मिलिंदाने संगीत दिले होते. त्यामुळे आज हा पाऊस इतका शेफारण्यात या दोघांचा हात आहे. दुसरे यातील आरोपी आपले बॉलिवूडकर…रिमझिम गिरे सावन म्हणत आजच्या या पावसाला इतकं निर्ढावलेपण या हिंदी पडद्याच्याच मंडळींनी बहाल केलंय. गुलजार, पंचम, अलिकडचा समीर अशी काही नावं या पावसाच्या बेशिस्तीमागे असावीत.

हिंदी पडद्यावर ओले चिंब नायक-नायिका पडद्यावर दिसलेच पाहिजेत असा कायदा या हिंदी पडद्याच्या सिनेनिर्मात्यांनी या सभागृहाच्या बाहेर केला आहे. त्यावर बंदी आणावी.

या शिवाय कवी महाशयही या बेजबाबदार पावसासाठी जास्तच जबाबदार आहेत. आनंदी आनंद गडे, जिकडे तिकडे चोहीकडे..

येरे येरे पावसा तुला देतो पैसा, असं बोलणार्‍या लहान मुलांच्या पालकांना ताबडतोब दंड करण्यासाठी आवश्यक कायद्याचा मसुदा विधी विभागाने तयार करायला घ्यावा, अध्यक्ष महोदय…श्रावणमासी हर्ष मानसी किंवा हिरवे हिरवे गार गालिचे अशा कविता उच्चारणे गुन्हा ठरवण्यात यावा..

बालकवी, बा. सी. मर्ढेकर, सौमित्र अशा पाऊस कविता लिहिणार्‍यांना नजरकैदेत ठेवले जावे.

राज्यात जी भीषण पूर परिस्थिती निर्माण झाली त्याला ही अशी कवी आणि कलाकार मंडळीच जबाबदार आहेत. याच कलाकारांनी या पावसाला इतकं डोक्यावर घेतलं आहे. त्यामुळे तो कमालीचा बिघडला आणि बेफाम वागू लागला. या अशा संवेदनशील माणसांमुळेच पाऊस लाडावला आहे..आणि ज्या ठिकाणी त्याला भाडे करारावर काही दिवसासाठी राहायचे होते. तिथं ठाण मांडण्याची तयारी या पावसाने सुरू केलीय.

हे खरे आहे की पावसामुळे राज्यातील काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय, अन्न धान्य, पशुधन आणि दुर्दैवाने जीवित हानीही झालीय..हे अरिष्ट मोठे आहे. पावसामुळे रस्ते कमालीचे खराब झाले असून खड्डे आणि अपघातही वाढले आहेत. त्याला पाऊस जबाबदार आहे. आणि पावसावर कविता, गाणी, चित्रपट प्रसंग तयार करणारी ही कवी कलाकार जमात पर्यायाने जबाबदार आहे. हवामान खात्यालाही हा पाऊस जुमानत नाही, अध्यक्ष महोदय…त्यामुळे या अशा बिथरलेल्या मुसळधार पावसाला कारण ठरणार्‍या कवी, कलावंत आणि साहित्यिक मंडळींवर लेखन बंदी करण्याचा ठराव या सभागृहात केला जावा, अशी माझी विनंती आहे….धन्यवाद.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -