घरफिचर्सपुण्यकाव्य-परिणाम!

पुण्यकाव्य-परिणाम!

Subscribe

मी विडी ओढली नाही, मी धूर सोडला नाही स्टाइल ‘मी निषेध केला नाही, मी मोर्चा काढला नाही’ असं एक पुण्यकाव्य एव्हाना सर्वांपर्यंत पोहोचलेलं आहे.
कोण विचारतोय की पुण्यकाव्य म्हणजे काय?…अहो, पुण्यकाव्य म्हणजे काय, हा काय प्रश्न झाला?…पुण्यकाव्याची अशी फोड करून सांगायची आधी गरज आहे का?…कायम ‘आम्ही कोण म्हणुनी काय पुसता’ अशा अविर्भावात असणार्‍या पुणेकरांचं काव्य म्हणजे पुण्यकाव्य.
हल्ली हे पुण्यकाव्य पुण्यात जन्माला येतं, पण नंतर ते मार्केटिंगच्या मंथनातून अमेरिकेपर्यंत, म्हणजे अमेरिकन पुणेकरांपर्यंत पोहोचतं…आणि तिथून त्याचा पुणे-मुंबई-पुणे असा परतीचा प्रवास सुरू होतो आणि नंतर तो पुण्यामुंबईत प्रदीर्घ काळ टिकतो. थोडक्यात, पुण्यकाव्य पुण्यातल्या पुण्यात घुमत, घोटाळत, घुटमळत राहत नाही. ते जन्माला येताच त्याला पुण्याच्या पंचक्रोशीच्या बाहेर पडण्याचे डोहाळे लागतात.
…तर ‘मी निषेध केला नाही, मी मोर्चा काढला नाही’ हे खास पुणेरी प्रमाण भाषेतलं सवाई काव्य नुकतंच अमेरिकेच्याही पार पलिकडे तिथे ऑस्ट्रेलियापर्यंत पाहोचलं.
…झालं असं की आपल्या क्रिकेटप्रधान देशातला संघ तिथे कसोटी सामना हरायच्या मार्गावर होता. सामना जिंकणं शक्यच नव्हतं. सामन्याच्या पहिल्या दिवशी पडलेला पाऊस पाचव्या दिवशी हाकेला धावून येण्याचं दुरान्वयेही शक्य नव्हतं…आणि अलिकडल्या काळात शरद पवार सोडले तर बाकी कुणाच्या मदतीला धावून जाण्याचं सौजन्य पावसानेही दाखवल्याचं उदाहरण नाही. बरं, तिथल्या सावध वेधशाळांचे अंदाज खोटे ठरवण्याइतकं तिथलं वातावरणही लहरी नाही. त्यातच जगातल्या सगळ्या क्रिकेटपटूंचा युगानुयुगे जो अवयव घात करतो त्या मांडीच्या स्नायूने हनुमा विहारीचा अवसानघात केलेला.
आता करायचं काय?…प्रसंग बाका होता. आपण जिंकण्याची शक्यता नाही तर नाही, पण ऑस्ट्रेलियाला जिंकू द्यायचं नाही अशा विचारसरणीचा अवलंब करण्याशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नव्हता. हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विननी त्याच विचारसरणीचा झेंडा खांद्यावर घ्यायचं ठरवलं. विचारसरणी म्हटली की झेंडा आलाच, जसं शाम्पू म्हटला की कोंडा आला.
…पण मुळात ही विचारसरणी अंगिकारायची प्रेरणा हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विनला मिळाली कुठून?…प्रश्न उरतोच.
…असो, तर ह्या विचारसरणीचा हा झेंडा घेऊन त्यांनी ‘मी रन काढली नाही, विकेट फेकली नाही’ स्टाइल प्लुटॉनिक बॅटिंंग केली. भरगच्च लोकलमध्ये पुढचा माणूस आपल्यावर आदळू नये म्हणून त्याला अलगद थोपवावा तसं ते दोघं ऑस्ट्रेलियन गोलंदाजांचा चेंडू बॅट टाकून नुसतं हळुवार अडवत बसले. चेंडूंमागून चेंडू, फक्त अडवाअडवी. हाच खेळ ते दोघं खेळत बसले. ना रन घेण्याचा प्रयत्न, ना कोणता तडाखेबंद शॉट मारण्याचा प्रयत्न. एखाद्या नाठाळ विद्यार्थ्याच्या आयुष्यात सेमिस्टरमागून सेमिस्टरं जावीत तशी षटकांमागून षटकं जात होती, पण त्या दोघांनी एक काम केलं, अडवाअडवीचा घेतलेला वसा टाकला नाही.
…पण मुळात हा घेतला वसा न टाकण्यामागची प्रेरणा त्यांना मिळाली कुठून?…प्रश्न उरतोच.
…असो, तर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी हातपाय आपटत तावातावाने गोलंदाजी केली. पण हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन, दोघांनी त्यांना हिंग लावून विचारलं नाही. त्यांच्या उसळत्या चेंडूंसमोर छातीचा कोट केला. पण ‘मी रन काढली नाही, विकेट फेकली नाही’ ह्या विचारसरणीच्या क्रिझपासून ते दोघं किंचितही बाजूला सरले नाहीत. व्हॉट्सअ‍ॅपवर एक शब्द टाइप न करता ते फक्त कोरड्या स्मायली टाकत बसले. त्या दोघांची कडेकोट जोडी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना शेवटपर्यंत फोडताच आली नाही. त्या दोघांवर रागारागात चेंडू भिरकावून फॉलोथ्रु संपल्यावर ऑस्ट्रेलियन गोलंदाज बर्‍याचदा हताशपणे अर्ध्या खेळपट्टीपर्यंत पोहोचले. ते भारतात आयपीएल खेळल्यामुळे त्यांनी भारतातल्या कपड्यासाबणांच्या, शाम्पूसिमेंटच्या जाहिराती पाहिल्या होत्या. त्यातल्याच काहीजणांनी तर ‘भैया, ये दिवार टुटती क्यूं नही?’ असा रोकडा सवाल करत यष्टीरक्षकापुढे आपला सात्विक संतापही व्यक्त केला. पण ‘मी रन काढली नाही, विकेट फेकली नाही’ ही विचारसरणी आपल्या आचारविचारात बिंबवलेल्या हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विननी आपला संयम ढळू दिला नाही.
…पण मुळात हा संयम न ढळण्याची प्रेरणा त्यांना मिळाली कुठून?…प्रश्न उरतोच.
वास्तविक इतकी नापीक बॅटिंग करताना दोघांना कंटाळा आला असेल का? खेळपट्टीकडे पाठ करून दोघांनी दोन षटकांच्या मध्ये गुपचूप एखादी जांभई दिली असेल का? एखादी जांभई गालातल्या गालात लपवली असेल का?
…पण तशी विनाजांभई खेळतानाही त्या दोघांना ह्या प्रेरणेचा स्रोत कुठून मिळाला असेल?…प्रश्न उरतोच.
…तर आता लपवून कशाला ठेवायचं!…स्पष्ट सांगून टाकायला हवं की त्या दोघांना पुण्यभूमीतल्या संदीप खरे आणि सलील कुलकर्णींच्या प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिपचा सुगावा लागला. ‘मी निषेध केला नाही, मी मोर्चा काढला नाही’ ही त्यांची गीतकविता हनुमा विहारी आणि रवीचंद्रन अश्विन दोघांनी कान देऊन ऐकली. ते सगळं ऐकल्यानंतर संदीप खरे आणि सलील कुलकर्णींच्या अभेद्य पार्टनरशिपबद्दल त्यांचं समुपदेशन करण्यात आलं. पुणेरी समीक्षक सुनंदनना तिथून व्हिडिओ कॉल लावण्यात आला. सुनंदननी त्या कवितेचं व्हिडिओतल्या व्हिडिओत ‘मी रन काढली नाही, विकेट फेकली नाही’ असं स्वैर भाषांतर केलं…आणि त्याचा परिणाम तो सामना अनिर्णीत राहण्यात झाला. ह्याला म्हणतात संदीप खरे आणि सलील कुलकर्णींसारखी प्रॉडक्टिव्ह पार्टनरशिप.
असो, पण तिथे अमेरिकेत मात्र ऑस्ट्रेलियासारखं घडलं नाही. अमेरिकेत ‘मी निषेध केला नाही, मी मोर्चा काढला नाही’ पोहोचून आणि त्याची पारायणं होऊन कित्येक वर्षं लोटली. पण त्याचा परिणाम खरंच दिसला नाही. आपल्या डोनाल्ड ट्रम्पनी संदीप खरे आणि सलील कुलकर्णींंचा मोर्चा, निषेध साफ डिलिट करून टाकला आणि ट्रम्पदादाची पोरं हुशार म्हणत अमेरिकेच्या संसदेत ‘खळ्ळखटॅक’ करून टाकलं.
शेवटी कवितेचंसुध्दा असंच असतं. ती कुणाला कळते, कुणाला कळत नसते. कुणाला सपक वाटते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -