घरफिचर्समखमली आवाजाचे हेमंतकुमार!

मखमली आवाजाचे हेमंतकुमार!

Subscribe

हेमंतकुमारांचा गळा भारतातल्या सर्व भाषांमध्ये गायला तरी मराठी भाषेत मात्र हेमंतकुमार अस्सल मराठी भाषिक वाटले. ‘प्रीतीच्या चांदराती, घेऊन हात हाती, जोडू अमोल नाती, ये ना’ ह्यासारखं मराठी भावगीत हुबहू वठवल्यानंतरही हेमंतकुमार मराठीत जास्त लोकप्रिय झाले ते कोळीगीत-गायक म्हणून! लता मंगेशकरांच्या सोबत त्यांनी गायलेल्या ‘मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ त्या कोळीगीताला अफाट लोकप्रियता मिळाली.

हेमंतकुमारांचा आवाज व्हेलवेट व्हॉइस म्हणजे मखमली आवाज म्हणून प्रसिध्द होता. कुणी कुणी त्या आवाजाला साधुपुरूषाचा धीरगंभीर आवाज म्हणायचे. खरं सांगायचं तर त्यांच्या खर्जातल्या आवाजाला एक वेगळाच दर्जा होता. त्यांचे समकालिन महंमद रफी, मुकेश, किशोरकुमार, महेंद्र कपूर, मन्ना डे ह्या गायकांपेक्षा त्यांच्या आवाजाची जातकुळी पराकोटीची वेगळी होती, त्यांच्या आवाजाचा पोत पूर्णपणे वेगळा होता, म्हणूनच हेमंतकुमारांचं गाणं ह्या सगळ्या गायकांपेक्षा एक वेगळं विश्व, एक वेगळं मायाजाल निर्माण करून गेलं.

- Advertisement -

हेमंतकुमारांची गाणी म्हटली की ‘बेकरार कर के हमे युं न जाइये’, ‘न तुम हमे जाने’, ‘इतना तो कह दो हम को तुम से ही प्यार है’, ‘ना मांगु ये सोना चांदी, मांगे दर्शन देवी तेरे द्वार खडा एक जोगी’, ‘है अपना दिल तो आवारा, ना जाने किस पे आयेगा’ अशी गाणी झर्रकन आठवतात. ह्यातलं प्रत्येक गाणं ऐकताना हेमंतकुमारांच्या अनोख्या आवाजाची अनोखी छाप ऐकणार्‍याच्या मनात कायम घर करून राहिली.

‘बेकरार कर के हमे युं न जाइये’ ह्या गाण्यातला सुरूवातीचा ‘बेकरार’ हा शब्दच मुळी हेमंतकुमारांनी फारच निराळ्या पध्दतीने उच्चारला आहे. ‘बेकरार’ हा शब्द उच्चारल्यानंतर त्यांनी एक दशांश सेकंद जो पॉज घेतला आहे तिथूनच ह्या गाण्याच्या सुंदरतेची सुरूवात होते. ‘बीस साल बाद’ ह्या सिनेमातल्या त्यांनी स्वत:च गायलेल्या ह्या गाण्याला त्यांचंच संगीत लाभलं आहे. ह्या गाण्याचं वैशिष्ठ्य असं आहे की हे गाणं ऐकताना आजच्या डिजिटल युगातली नवी पिढीही फेर धरते, गाण्याच्या तालात ठेका वाजवते. हे गाणं जन्माला येतानाचा एका ऑर्केस्ट्रात खुद्द हेमंतकुमारांनी सांगितलेला किस्सा असा आहे की शुभ्र धोतर नेसलेल्या मांडीवर ताल धरत ह्या गाण्याचे शब्द वाचता वाचता ह्या गाण्याची चाल तिसर्‍या मिनिटाला हेमंतकुमारांना सुचली. समोर हार्मोनियमही नव्हती आणि ह्या गाण्याचा मुखडा सुचल्या सुचल्या त्यांना दोन अंतर्‍याच्या वेगवेगळ्या चालीही तिथल्या तिथल्या सुचल्या. हे गाणं हेमंतकुमार त्यांच्या मैफलीत मूळ रेकॉर्ड केलेल्या गाण्यापेक्षाही थोडं हटके गायचे हे विशेष.

- Advertisement -

हेमंतकुमारांमधल्या गायकाला आणखी एक किनार होती ती ते स्वत: संगीतकार असल्याची. त्यातच शब्दांतलं सौंदर्य, शब्दांतली कविता नीट न्याहाळून घेण्याची त्यांची सवय होती किंवा त्यांना तो छंद होता. त्यामुळे गाण्यातल्या एखाद्या शब्दाला गायक किंवा गायकाकडून विशिष्ट ट्रिटमेंट मिळावी असा त्यांचा आग्रह असायचा. ‘कोहरा’ ह्या सिनेमातलं ‘ओ बेकरार दिल, हो चुका हैं मुझ को आंसु हों से प्यार’ हे कमालीचं काळीज कातरून टाकणारं गाणं करताना त्यांनी कैफी आझमींसारख्या प्रतिभावान कवीच्या त्या शब्दांची अक्षरश: पारायणं केली. ते शब्द त्यांनी आपल्या मनात पूर्णपणे जिरवले, रूजवले आणि मगच ते गाणं त्यांच्याच बंगाली गाण्यात बसवून पाहिलं. ते मूळ बंगाली गाणं होतं, ‘ओ नोदी रे…एक्टी कॉथा शुधायुशुधू तोमारे…बॉलो कोथाय तोमार देस…तोमार नैकी चॉलार शेष.’ ओ नोदी रे म्हणजे ए नदी…एक्टी कॉथा शुधायुशुधू तोमारे म्हणजे एक गोष्ट सारखी सारखी तुला विचारतो आहोत…ती अशी की बॉलो कोथाय तोमार देस…म्हणजे तुझा देश कोणता?…आणि तोमार नैकी चॉलार शेष म्हणजे तुझ्या चालत राहण्याला अंत नाही…

हेमंतकुमार ‘ओ बेकरार दिल..’ हार्मोनियम घेऊन स्टेजवरून गाताना हिंदी गाण्यांचा कार्यक्रम असेल तर ह्या मूळ बंगाली गाण्याची प्रत्येक ओळ गाऊन दाखवायचे, नंतर तिचा असा अर्थ समजावून सांगायचे आणि मग ‘कोहरा’तलं त्या गाण्यावरून बेतलेलं ‘ओ बेकरार दिल…’ गायचे. त्यामुळे त्या गाण्याचं ते काळीज कातरून काढणारं वातावरण अधिकच गडद, अधिकच घनगर्द व्हायचं. हेमंतकुमारांचा गातानाचा आवाज आणि त्या गाण्याबद्दल काही माहिती सांगतानाच आवाज एकदुसर्‍यापेक्षा भिन्न वाटायचा. हेमंतकुमारांचं बोलणं अतिशय शांत आणि संथ असायचं. त्यात कसलीही घाईगर्दी, कसला गडबडगोंधळ नसायचा. ते शांत प्रकृतीचे गृहस्थ होते. त्यामुळेच असेल कदाचित, पण त्यांची बहुतेक गाणी शांत आणि संथ लयीत व्हायची.

हेमंतकुमारांचा गळा भारतातल्या सर्व भाषांमध्ये गायला तरी मराठी भाषेत मात्र हेमंतकुमार अस्सल मराठी भाषिक वाटले. ‘प्रीतीच्या चांदराती, घेऊन हात हाती, जोडू अमोल नाती, ये ना’ ह्यासारखं मराठी भावगीत हुबहू वठवल्यानंतरही हेमंतकुमार मराठीत जास्त लोकप्रिय झाले ते कोळीगीत-गायक म्हणून! हृदयनाथ मंगेशकरांच्या संगीत दिग्दर्शनाखाली लता मंगेशकरांच्या सोबत त्यांनी ‘मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा’ गायल्यानंतर आणि हेमंतकुमारांच्या आवाजातल्या त्या कोळीगीताला अफाट लोकप्रियता मिळाल्यानंतर हेमंतकुमारांच्या नावावर मराठीत एक कोळीगीत-गायक म्हणून शिक्कामोर्तब झालं. हृदयनाथ मंगेशकरांकडे संगीत दिग्दर्शनासाठी ‘हा खेळ सावल्यांचा’ हा सिनेमा आला तेव्हा त्यात जेव्हा कोळीगीताचा एक प्रसंग आला तेव्हा हृदयनाथ मंगेशकरांनी ते कोळीगीतही गाण्यासाठी हेमंतकुमारनाच पाचारण केलं. ह्या कोळीगीताचे शब्द होते ‘गोमू, संगतीनं माझ्या तू येशील काय!’ फक्त ह्यावेळी त्या कोळीगीतासाठी हेमंतकुमारना साथ द्यायला लता मंगेशकरांऐवजी आशा भोसले होत्या.

हे कोळीगीतही हेमंतकुमारांच्या आवाजात असं काही भाव खाऊन गेलं की हेमंतकुमारांच्या आवाजातल्या ह्या कोळीगीतांच्या ऐवजावर त्यांना मराठीत आणखी एक कोळीगीत गाण्याची संधी मिळाली. हे गाणं होतं ‘दर्यावरी रं, तरली होरी रं, तुझीमाजी जोरी बरी, साजना, होरीतून जाऊ घरी’…गाण्याचं संगीत होतं प्रदीप-विलास ह्यांचं…आणि ह्या गाण्याच्या चालीचं एकूण स्वरूप पाहून ह्या संगीतकारांना हेमंतकुमारना बोलवायचा मोह आवरला नाही…आणि विशेष म्हणजे आधीच्या दोन कोळीगीतांप्रमाणेच हेमंतकुमारनी ह्या गाण्याचंही सोनं केलं. ह्यावेळी मात्र त्यांची सहगायिका होती गायिका सुमन कल्याणपूर ह्यांची बहीण श्यामा चित्तार.

काही असो, पण त्यावेळी मराठीत एकापेक्षा एक मराठी भाषिक गायक असताना हेमंतकुमारांसारख्या एका बंगाली गायकाने मराठी गाणी गाऊन मराठी भावसंगीतावर आपली अवीट छाप सोडली होती हे कुणाला नाकारता येणार नाही!

-सुशील सुर्वे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -